Shravan 2024: आजपासून श्रावणाला सुरुवात झाली आहे. श्रावण महिन्यातील सोमवार हे अत्यंत पवित्र मानले जातात. या श्रावणी सोमवारांना शिवभक्त ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतात, शिवमंदिरांमध्ये अभिषेक करतात. पण, अनेकदा श्रावण केव्हा सुरू होणार यावरून गोंधळ होतो. कारण उत्तर भारतात व महाराष्ट्रात श्रावण वेगवेगळ्या तारखांना सुरू होतो. पण, याचं नेमकं कारण काय? असा प्रश्न तुम्हालाही पडतो का? हो… तर याच प्रश्नाचं उत्तर आपण या लेखातून अगदी सोप्या पद्धतीत जाणून घेऊ या… सुरुवातीला श्रावणाचे महत्त्व जाणून घेऊ : श्रावण हा सण विशेषत: महादेवाची उपासना करण्यासाठी हा सर्वात पवित्र महिना मानला जातो. या महिन्यात चार ते पाच सोमवार (भगवान शिवाला समर्पित) आणि शनिवार (देवी पार्वतीला समर्पित) असतात. हा महिना विविध धार्मिक कार्ये, विधी आणि सणांचा असतो; जे प्रत्येकाला भक्ती, उत्सव साजरे करण्यास एकत्र आणतो. कॅलेंडर फरक : उत्तर भारत आणि महाराष्ट्र यांच्यातील श्रावणाच्या वेगवेगळ्या तारखांचे प्राथमिक कारण प्रत्येक प्रदेशातील कॅलेंडरच्या प्रकारात आहे. प्रत्येक मराठी महिन्यात प्रतिपदेपासून ते पौर्णिमा, अमावास्येपर्यंत तिथींची कालगणना केली जाते. मराठी महिन्यांचे दोन भाग पडतात. हेही वाचा…National Pension System: नॅशनल पेन्शन सिस्टीम म्हणजे काय? फक्त करबचत नाही, तर प्रत्येकासाठी ठरेल लाभदायी; योजनेंतर्गत पैसे गुंतवण्याचे आहेत ‘हे’ चार फायदे एका महिन्यातील दोन्ही पक्ष चंद्रकलेच्या आकारावर विभागले जातात. पौर्णिमेनंतर वद्य आणि अमावस्येनंतर शुल्क पक्ष सुरू होतो. त्यामुळे उत्तर आणि पूर्व भारतातील पंचांगानुसार, कृष्ण पक्षापासून महिना सुरू करण्याची परंपरा आहे, तर पश्चिम भारतासह अन्य भागांत शुद्ध पक्षापासून महिना सुरू करण्याची परंपरा आहे. त्यामुळे देशभरात सण-उत्सव सारखे असले तरीही ते साजरे करण्याच्या कालावधीत वा तारखांमध्ये फरक दिसून येतो. तर उत्तर भारतातील पौर्णिमंता दिनदर्शिकेनुसार, पौर्णिमेला चांद्रमासाचा शेवट होतो. म्हणून २०२४ च्या श्रावणाला (Shravan 2024) २२ जुलै रोजी सुरुवात झाली. तसेच श्रावणी सोमवारच्या तारखा : २२ जुलै, २९ जुलै, ५ ऑगस्ट, १२ ऑगस्ट, १९ ऑगस्ट अशा आहेत. तर महाराष्ट्र व दक्षिणी अमंता कॅलेंडरनुसार, चांद्रमास अमावस्येला संपतो, म्हणून महाराष्ट्रात श्रावणाला ५ ऑगस्टपासून सुरुवात झाली. तसेच श्रावणी सोमवारच्या तारखा ५ ऑगस्ट, १२ ऑगस्ट, १९ ऑगस्ट, २६ ऑगस्ट, २ सप्टेंबर अशा आहेत. तर दिनदर्शिकेतील या फरकामुळे दोन्ही प्रदेशांमध्ये श्रावण महिन्यामध्ये सुमारे १५ दिवसांचा फरक दिसून येतो. म्हणून श्रावण हा सण एकच असला तरीही तो महाराष्ट्रात आणि उत्तर भारतात वेगवेगळ्या तारखांना साजरा होतो. महाराष्ट्रात, उदाहरणार्थ, नारळी पौर्णिमा हा एक प्रमुख कार्यक्रम आहे. विशेषत: मुंबईसारख्या किनारपट्टीच्या प्रदेशात, जिथे तो पारंपरिक गाणी, नृत्य आणि समुद्राजवळील विधींनी साजरा केला जातो. दुसरीकडे उत्तर भारतात, विस्तृत कौटुंबिक मेळावे आणि समारंभांसह रक्षाबंधन केंद्रस्थानी असतो.