Which is best tiger safari in india: वाघाला भारताच्या राष्ट्रीय प्राण्याचाही दर्जा देण्यात आला आहे. जंगलतोडीमुळे पूर्वीच्या तुलनेत अनेक वन्य प्राण्यांची संख्या कमी होत चालली आहे. परंतु या प्राण्यांना पाहण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक असतो. भारतामध्ये जगातील वन्य वाघांची जवळपास ७०% लोकसंख्या आहे, ज्यामुळे भारत वाघांना पाहण्याच्या दृष्टीने सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक देश ठरला आहे. आपल्या देशात जैवविविधतेने समृद्ध अनेक राष्ट्रीय उद्याने आहेत. मध्य प्रदेशातील घनदाट जंगलांपासून ते पश्चिम बंगालच्या खारफुटीपर्यंत प्रत्येक उद्यान एक अद्वितीय वन्यजीव अनुभव देते. व्याघ्र सफारीसाठी भारतातील १० सर्वोत्तम राष्ट्रीय उद्याने कोणती हे आज आपण या बातमीच्या माध्यमातू जाणून घेऊ

व्याघ्र सफारीसाठी भारतातील १० सर्वोत्तम राष्ट्रीय उद्याने

१. जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड

१९३६ मध्ये स्थापन झालेले जिम कॉर्बेट हे भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान आहे आणि बंगाल टायगर्सच्या निरोगी संख्येसाठी प्रसिद्ध आहे. उत्तराखंडमध्ये स्थित येथे गवताळ प्रदेशांपासून ते घनदाट जंगलांपर्यंत विविध लँडस्केप्स आहेत. ढिकाला आणि बिजराणी झोनमध्ये वाघ पाहण्याच्या जागा आहेत.

२. रणथंबोर राष्ट्रीय उद्यान, राजस्थान

राजस्थानमधील सवाई माधोपूर येथे असलेले रणथंभोर हे राष्ट्रीय उद्यान तेथील वैशिष्ट्यपूर्ण भूप्रदेश, प्राचीन अवशेष आणि वाघांची वाढती संख्या यांसाठी ओळखले जाते. तेथील टी-१९, टी-३९ व टी १०१ या वाघांच्या दर्शनासाठी प्रसिद्ध अशा जागा आहेत. या उद्यानातील किल्ल्याचे अवशेष वन्यजीव छायाचित्रणासाठी एक अतुलनीय पार्श्वभूमी निर्माण करतात.

३. बांधवगड राष्ट्रीय उद्यान, मध्य प्रदेश

मध्य प्रदेशात असलेले बांधवगड हे भारतातील सर्वाधिक वाघांची संख्या असलेले ठिकाण आहे. खुला गवताळ प्रदेश आणि घनदाट झाडे यांमुळे हे उद्यान वाघदर्शनासाठी लोकप्रिय आहे. येथील ताला, मगधी व खितौली हे भाग वाघ पाहण्यासाठी सर्वोत्तम आहेत.

४. कान्हा राष्ट्रीय उद्यान, मध्य प्रदेश

मध्य प्रदेशातील कान्हा हे राष्ट्रीय उद्यान उंच साल वृक्षांसाठी ओळखले जाते. रुडयार्ड किपलिंगच्या ‘द जंगल बुक’साठी हे उद्यान प्रेरणास्थान होते.

५. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प, महाराष्ट्र

महाराष्ट्रातील ताडोबा हे भारतातील वाघ पाहण्यासाठी सर्वोत्तम स्थळ आहे. हे ठिकाण पाण्याच्या विहिरींजवळ वारंवार वाघ दिसण्यासाठी आणि तुलनेने कमी गर्दी असलेल्या सफारी अनुभवांसाठी ओळखले जाते.

६. पेंच राष्ट्रीय उद्यान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या राज्यांमध्ये पसरलेले पेंच हे ‘जंगल बुक’चे आणखी एक प्रेरणास्थान आहे. येथे वाघांची संख्या वाढत आहे आणि त्याचा मोकळा भूभाग फोटोग्राफी व सफारी टूरसाठी आदर्श ठरतो.

७. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान, पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालमधील सुंदरबन हे खारफुटीच्या परिसंस्थेशी जुळवून घेतलेल्या वाघांचे एकमेव घर आहे. इतर उद्यानांप्रमाणेचे येथेही तुम्ही बोट सफारी आणि जीप सफारीचा आनंद घेऊ शकता, ज्यामुळे वाघांच्या प्रदेशाचा शोध घेण्याचा एक अनोखा मार्ग सापडतो.

८. नागरहोल राष्ट्रीय उद्यान, कर्नाटक

कर्नाटकातील निलगिरी बायोस्फीअर रिझर्व्हचा एक भाग, नागरहोल, त्याच्या निर्जन जंगलांसाठी आणि वाघांच्या संख्येसाठी प्रसिद्ध आहे. येथे मोठ्या संख्येने हत्ती, बिबटे आणि इतर वन्यजीवदेखील आहेत.

९. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम

काझीरंगा हे त्याच्या एकशिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध असले तरी येथे वाघांची संख्याही मोठी आहे. आसाममधील या उद्यानात हत्ती गवत आणि दलदलीचा प्रदेश असल्याने वाघांना पाहणे पर्यटकांसाठी अधिक आव्हानात्मक आहे.

१०. सातपुडा राष्ट्रीय उद्यान, मध्य प्रदेश

मध्य प्रदेशातील सातपुडा येथे एक अनोखा, कमी गर्दीचा वाघ सफारीचा अनुभव मिळतो. इतर उद्यानांप्रमाणे अनेकजण या ठिकाणी चालत जंगल सफारीचा आनंद लुटतात. ज्यामुळे ते भारतातील सर्वांत साहसी वन्यजीव अनुभवांपैकी एक बनते.