Indian Railways Total Lncome: भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वांत मोठे रेल्वे नेटवर्क आहे. भारतीय रेल्वेच्या या नेटवर्कद्वारे दररोज १३,००० पेक्षा जास्त प्रवासी गाड्या आणि नऊ हजारांहून अधिक मालगाड्या चालवल्या जातात. तसेच काही वर्षांपासून या यंत्रणेकडून नवीन सुविधा राबविण्यात येत आहेत. त्यामुळे लांब पल्ल्याचा प्रवास किंवा पर्यटनासाठी अधिकाधिक प्रवासी रेल्वे प्रवासाकडे आकर्षित होत आहेत. सणांच्या काळात रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या दुप्पट होते.
भारतातील रेल्वेमार्गांची लांबी १,२६,३६६ किलोमीटर आणि त्यातील रनिंग ट्रॅकची लांबी ९९,२३५ किलोमीटर आहे. यार्ड व साइडिंगसह मार्गांची एकूण लांबी १,२६,३६६ किमी आहे. भारतात रेल्वेस्थानकांची संख्या ८,८०० पेक्षा जास्त आहे.
दररोज किती फायदा?
दररोज लाखो लोक ट्रेनने प्रवास करतात. रेल्वे विभागाच्या मते, दरवर्षी तीन कोटींहून अधिक लोक रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे विभाग सर्व प्रवाशांकडून तिकिटांचे शुल्क वसूल करतो. कोणताही प्रवासी तिकिटाशिवाय प्रवास करू शकत नाही. हा रेल्वेचा कडक नियम आहे. रेल्वे विभागाच्या माहितीनुसार, रेल्वे विभागाचे दररोजचे उत्पन्न ६०० कोटी रुपये आहे. २०२१-२०२२ मध्ये ही रक्कम ४०० कोटी रुपये होती; पण हे सर्व उत्पन्न फक्त तिकिटांमधूनच येत नाही. रेल्वेच्या महसुलात प्रवासी तिकिटांचा वाटा फक्त २०.०२% आहे. रेल्वे विभागाला बाकी महसुलापैकी ७५.०२% उत्पन्न मालवाहतुकीतून आणि ४.६% उत्पन्न विविध स्रोतांमधून मिळते.
रेल्वेचे वार्षिक उत्पन्न
पुढील आर्थिक वर्षात रेल्वेचे एकूण उत्पन्न तीन लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त होण्याची अपेक्षा आहे. त्यापैकी ९२ हजार कोटी रुपये प्रवाशांकडून येण्याची अपेक्षा आहे. एसी गाड्यांची मागणी वाढल्याने ‘वंदे भारत’सारख्या गाड्या आल्यानंतर, कमाईत सातत्याने वाढ होत आहे. प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी रेल्वे विभाग अधिकाधिक नवीन योजना आखण्याच्या तयारीत आहे.
२०२५-२६ मध्ये रेल्वेने एसी ३ क्लास प्रवाशांकडून जास्तीत जास्त ३७,११५.३२ कोटी रुपये कमावण्याचे लक्ष्य ठेवले आहे. २०२४-२५ मध्ये एसी ३ श्रेणीने ३०,०८८.५९ कोटी रुपयांचा महसूल मिळवला होता. २०२५-२६ मध्ये स्लीपर क्लास प्रवाशांकडून मिळणारा महसूल सुमारे ६% वाढून १६,५०८.५५ कोटी रुपये होण्याची अपेक्षा आहे.
© IE Online Media Services (P) Ltd