पुढील महिन्यात १० फेब्रुवारी रोजी पाच राज्यांच्या निवडणुकीतील पहिला टप्पा पार पडणार आहे. एकूण ७ टप्प्यांमध्ये होणाऱ्या या निवडणुकांसाठी आता सर्वच पक्षांनी कंबर कसली असून करोनाच्या नियमावलीचं पालन करून प्रचाराची कसरत करताना उमेदवार दिसू लागले आहेत. प्रचारसभा, नुक्कड सभांवर बंदी घालण्यात आल्यामुळे मोजक्या कार्यकर्त्यांसोबत उमेदवार दारोदारी हिंडून प्रचार करताना दसत आहेत. उत्तर प्रदेशमध्ये देखील उमेदवार अशीच काट्यावरची कसरत करत असताना अनेक अजब प्रकार घडत असून त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. असाच एक प्रकार उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये घडला असून सध्या चर्चेचा विषय ठरत आहे!

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कानपूरमधील भाजपा आमदार सुरेंद्र मैथियानी हे सध्या त्यांच्या मतदारसंघात जोरदार प्रचार करताना दिसत आहेत. प्रचारसभांना बंदी असल्यामुळे दारोदारी फिरून ते मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. तसेच, या भेटीगाठींचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून ऑनलाईन प्रचार देखील करत आहेत. पण या गडबडीत त्यांचा एक व्हिडीओ मात्र व्हायरल होऊ लागला आहे. अर्थात हा व्हिडीओ त्यांनी स्वत: पोस्ट केलेला नाही.

नेमकं घडलं काय?

भाजपा आमदार सुरेंद्र मैथियानी शुक्रवारी त्यांच्या मतदारसंघात फिरत असताना थेट एका घरात गेले. तिथे विचारपूस करता करता ते घराच्या आतल्या भागात गेले. व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे आतल्या भागात एक व्यक्ती आंघोळ करत होती. आणि त्या व्यक्तीशी मैथियानी यांचा संवाद सुरू होता. मैथियानी यांनी विचारलं, “सर्वकाही ठीक आहे ना? तुमचं घर व्यवस्थित बांधलं गेलं आहे ना? तुम्हाला रेशन कार्ड मिळालं आहे ना?”

आता इतर वेळी आमदार समोर उभे असताना सामान्य नागरिक देखील अदबीनं बोलताना दिसतात. पण इथे आंघोळ करतानाच समोर आमदार येऊन उभे राहिल्यामुळे त्या माणसाला देखील क्षणभर काय बोलावं सुचलं नसेल. त्याने साबण लावत लावतच “सगळं आहे”, असं म्हटलं. त्यामुळे याक्षणी त्याच्या मनात काय सुरू असेल, याचा अंदाजच लावता येऊ शकेल!

यासंदर्भात एक फोटो ट्विटरवर पोस्ट करून मैथियानी म्हणतात, “मी एका लाभार्थ्याच्या घरी गेलो होतो. हाऊसिंग योजनेत यशस्वीरीत्या घर बांधून पूर्ण केल्याबद्दल त्याचं अभिनंदन करायला. मी त्याला मला मत देण्याची विनंती केली”, असं त्यांनी म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशमध्ये १० फेब्रुवारी रोजी पहिल्या टप्प्याचं मतदान होत असून ७ मार्च रोजी शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. १० मार्च रोजी मतमोजणी होईल.

मराठीतील सर्व निवडणूक २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjp mla candidate surendra maithani viral video barged in man bathing pmw
First published on: 14-01-2022 at 11:39 IST