बंगळूरु : बंगळूरु शहराला माहिती-तंत्रज्ञान नगरी (आयटी हब) संबोधले जाते. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अनेक कंपन्यांची कार्यालये या शहरात असून देशभरातील हजारो कर्मचारी येथे काम करतात. या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना विधानसभा निवडणुकीविषयी विचारले असता नव्या सरकारने शहरातील वाहतुकीची समस्या सोडवावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कर्नाटकात येणाऱ्या नव्या सरकारने शहरातील दळणवळणासंबंधी समस्यांचे निराकरण करणे आवश्यक आहे. वाहतूक कोंडीची समस्या शहराची डोकेदुखी ठरत असून ही समस्या सोडविण्यावर भर देणे आवश्यक आहे. रस्ते, मेट्रो, रेल्वेची प्रलंबित कामे लवकर पूर्ण करणे गरजेचे असून सार्वजनिक वाहतूक सुधारण्यासाठी मोठय़ा संख्येने विद्युत बस उपलब्ध करणे आवश्यक असल्याचे मत माहिती तंत्रज्ञान उद्योगातील तज्ज्ञ टी. व्ही. मोहनदास पै यांनी सांगितले.
पै यांनी राज्यातील वाढत्या भ्रष्टाचारावर गंभीर चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, ‘‘सत्तेवर कोणताही पक्ष आला तरी प्रत्येक सरकार मागील सरकारपेक्षा अधिक भ्रष्ट होते. विधानसभा निवडणुकीतील उमेदवार त्यांच्या मतदारसंघात निवडणुकीसाठी कोटय़वधी रुपये खर्च करत आहेत. मात्र निवडणुकीत विजयी झाल्यानंतर विकासकामांकडे दुर्लक्ष केले जाते.’’
माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील तरुण निवडणुकीत मतदान करत नाहीत, हा गैरसमज असून या क्षेत्रातील अनेक कर्मचारी मोठय़ा संख्येने मतदानाचा हक्क बजावतात, असे इन्फोसिस लिमिटेडच्या माजी प्रमुख वित्तीय अधिकाऱ्याने सांगितले. नवीन सरकारने बंगळूरुमधील सर्वात मोठी समस्या म्हणजे वाहतूक समस्या सोडविण्यासाठी मदत केली पाहिजे, असे आरिन कॅपिटलच्या अध्यक्षाने सांगितले.