बलात्कार करणाऱ्यांना उलटे लटकवून त्यांना फटके द्यायला हवेत, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी केले आहे. ‘बलात्कार करणाऱ्यांची चामडी सोडून काढायला हवी. यानंतर त्यांच्या जखमांवर मीठ आणि मिरची लावायला हवी. मी मुख्यमंत्री असताना याचप्रकारे बलात्कार करणाऱ्यांना फोडून काढले होते,’ असे उमा भारती यांनी म्हटले आहे.
आग्रा येथे एका रॅलीमध्ये भाषण करताना केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या उमा भारती यांनी बलात्कार करणाऱ्यांना अद्दल घडवायला हवी, असे म्हटले. ‘बलात्कार करणाऱ्या व्यक्तीने भीक मागितली पाहिजे, अशी त्याची अवस्था करायला हवी. बलात्काऱ्यांना पीडितेसमोरच वेदना द्यायल्या होत्या. मी मुख्यमंत्री असताना असेच केले होते. त्यावेळी काही पोलीस अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला होता. मात्र मी त्या अधिकाऱ्यांना बलात्कार करणाऱ्यांना मानवाधिकार नसतात, असे सांगितले होते,’ अशा शब्दांमध्ये उमा भारती यांनी बलात्कार करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, असे मत व्यक्त केले.
बुलंदशहरात झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणावर भाष्य करताना उमा भारती यांनी समाजवादी सरकारच्या कालावधीतील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बलात्कार करणाऱ्यांवर कोणत्या प्रकारची कारवाई व्हावी, यासाठी त्यांनी स्वत: मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री असतानाचे उदाहरण दिले. ‘बलात्कार करणाऱ्यांना उलटे लटकवून जोपर्यंत तो वेदनेने विव्हळत नाही तोपर्यंत त्याला पट्ट्याने फोडून काढा, अशा सूचना मी मुख्यमंत्री पोलिसांना केल्या होत्या. पीडित महिलेला बलात्कार करणाऱ्यांची ही अवस्था पोलीस ठाण्याच्या खिडकीतून दिसायची,’ असे उमा भारती यांनी सांगितले.
रॅलीला संबोधित करताना उमा भारती यांनी अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांच्यावरही निशाणा साधला. ‘डिंपल यादव त्यांच्या पक्षासाठी मते मागत फिरत आहेत. मात्र त्यांच्याकडे बलात्कार पीडितांना भेटण्यासाठी वेळ नाही,’ असे उमा भारती यांनी म्हटले. उत्तर प्रदेशातील १५ जिल्ह्यांमधील ७३ विधानसभांसाठी ११ फेब्रुवारीला मतदान होणार आहे.