‘इ़ट्स नॉट अवर वॉर’ अशी भूमिका अफगाणिस्तान, रशिया-युक्रेन, इस्रायल-हमास अशा अनेक युद्धांबाबत घेणारे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणबाबत मात्र अपवाद केलेला दिसतो. २१ जूनच्या मध्यरात्रीनंतर अमेरिकी लढाऊ विमाने आणि पाणबुड्यांनी इराणच्या तीन अण्वस्त्र विकास प्रकल्पांवर हल्ले केले आणि इराणविरुद्धच्या युद्धात इस्रायलबरोबर अमेरिकेनेही उडी घेतल्याचे दाखवून दिले. इराण हा पश्चिम आशियातला मोठा आणि तेलसमृद्ध देश आहे. या भागातून प्राधान्याने पूर्व व दक्षिण आशिया तसेच काही प्रमाणात आफ्रिका आणि युरोपकडे ज्या होर्मुझ खाडीतून खनिज तेल जाते, त्या खाडीवर नियंत्रण मिळवण्याची क्षमता बाळगून आहे. त्यामुळे इराणने या व्यापारी जलमार्गावर तसेच अमेरिकेच्या पश्चिम आशियातील तळांवर प्रतिहल्ले करायचे ठरवल्यास या हल्ल्याचे दूरगामी परिणाम संभवतात.
इस्लामी जगत
शिया बहुल इराणला तेलसमृद्ध सुन्नी अरब विश्वात फार सहानुभूती नाही. पण इस्रायलच्या हल्ल्यांविषयी सौदी अरेबियासह बहुतेक अरब देशांनी सौम्य शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली आहे. समग्र इस्लामी जगतात मुस्लिम भ्रातृभावाची भावना जागृत करण्यात इराण यशस्वी ठरला तर अमेरिका आणि इस्रायलसाठी इराणचा संपूर्ण पाडाव करणे फार सोपे राहणार नाही. पाकिस्तानने इराणच्या अणुकार्यक्रमाला सुरुवातीस मदत केली होती. इस्रायलविरोधात इराणला पाठिंबा द्यावा ही भावना पाकिस्तानमध्ये तीव्र आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांनी नुकतीच ट्रम्प यांची भेट घेतली असली, तरी ९/११ नंतर झालेले ‘वॉर ऑन टेरर’ किंवा अफगाणिस्तान युद्धामध्येही अमेरिकेला पाकिस्तानमध्ये स्थानिक समर्थन अजिबात मिळाले नव्हते. तशीच काहीशी परिस्थिती इराण हल्ल्यांबाबतही दिसून येईल. सौदी अरेबिया अमेरिकेला कधीही थेट विरोध करणार नाही. पण इराणला जेरीस आणून इस्रायलचे शिरजोर होणे सौदी अरेबियाच्या पचनी पडणार नाही.
रशिया आणि चीन
इराण-इस्रायल संघर्षाच्या निमित्ताने तिसरे महायुद्ध सुरू होऊ शकते असा इशारा काही विश्लेषक देऊ लागले आहेत. याचे कारण म्हणजे रशिया आणि चीन या देशांनी नेहमीच अमेरिकेच्या विरोधात इराणला समर्थन दिले आहे. रशिया हा गेली अनेक वर्षे इराणचा दोस्त होता. अमेरिकेने सुन्नी अरब देशांना मदत केली, त्यावेळी इराणला तत्कालीन सोव्हिएत रशियाचा आधार होता. चीनने इराणमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्या बदल्यात इराणचे जवळपास ६० टक्के खनिज तेल चीनला मिळते. अमेरिकेने हल्ले केल्यामुळे ते या युद्धात उतरले असे मानले जात आहे. आता इराणच्या बाजूने रशिया आणि चीनने युद्धात उतरायचे ठरवले, तर बिकट प्रसंग उद्भवेल. मात्र ती शक्यता कमी आहे. याचे कारण म्हणजे रशिया सध्या पूर्णपणे युक्रेन युद्धात अडकला आहे. इराणसाठी कोणत्याही स्वरूपाची युद्धसामग्री पाठवण्याची रशियाची सध्या तरी क्षमता नाही. पुन्हा अमेरिकेविरोधात थेट उतरण्याचे दुःसाहस रशिया सध्या तरी करेल असे वाटत नाही. इराणला क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणा किंवा क्षेपणास्त्रे पाठवण्यासाठी खूप वेळ लागू शकतो, ते इराणला परवडणारे नाही. राजनैतिक आघाडीवरच अमेरिका आणि इस्रायलविरुद्ध रशिया भूमिका घेऊ शकतो. जोपर्यंत अमेरिकेचे हल्ले इराणच्या अण्वस्त्र प्रकल्पांवर होताहेत तोवर चीन एका मर्यादेपेक्षा फार विरोध करणार नाही. पण यातून एक गंभीर शक्यता संभवते. रशियाचा युक्रेनवरील हल्ला आणि आता अमेरिकेचा इराणवर हल्ला चीनला तैवानवर त्याच स्वरूपाचे हल्ले करण्यास उद्युक्त करू शकतो. अशा प्रकारचे हल्ले हे अलीकडे नित्याचे झाले आहेत. चीनने तैवानवर हल्ला किंवा हल्ले केले, तर मात्र तिसऱ्या महायुद्धाची शक्यता बळावते. कारण तैवानच्या मदतीस अमेरिका उतरू शकते. पण चीनही अत्यंत शस्त्रसज्ज असल्यामुळे सध्याच्या या दोन महासत्ता परस्परांना भिडल्या तर विध्वंसक युद्ध संभवते.
इराणचा प्रतिहल्ला
अमेरिकेने इराणच्या नातान्झ, इसफाहान आणि फोर्डो या प्रमुख अण्वस्त्र प्रकल्पांवर अमेरिकेने हल्ले केले आहेत. यांतून नुकसान किती झाले आणि इराणची क्षमता किती कोलमडली हे सुरुवातीस स्पष्ट झालेले नव्हते. मात्र इराण हा मोठा देश असून गेली अनेक वर्षे क्षेपणास्त्र विकास कार्यक्रम राबवत आहे. इस्रायलच्या सुरुवातीच्या झपाट्यानंतरही हा देश सावरला आणि इस्रायलवर प्रतिहल्ले करू लागला, हेही दिसून आले. अमेरिकेचे तळ पश्चिम आशियात विशेषतः अरब देशांमध्ये विखुरलेले आहेत. अमेरिकेकडे दीर्घ पल्ल्याचे हल्ले करण्याची क्षमता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे इराणच्या प्रतिहल्ल्यांना मर्यादा आहेत. पण होर्मुझच्या आखाताची नाकेबंदी करून थेट हल्ल्यांपेक्षा अधिक मोठा आणि दूरगामी परिणाम साधता येतो हे इराणला ठाऊक आहे. अमेरिकेला इराणने गेले काही दिवस तीव्र शब्दांत इशारे दिले होते. त्या निव्वळ डरकाळ्या नाहीत हे इस्रायलवरील या देशाच्या हल्ल्यांनी दाखवून दिले आहे. दुसरीकडे, इस्रायलची मनुष्यहानी आणि अमेरिकेची मनुष्यहानी यांच्या परिणामांमध्ये फरक आहे. जिवावर उदार होऊन इराणने खरोखरच अमेरिकी आस्थापनांवर – जमिनीवरील आणि समुद्रातील – हल्ले केलेच आणि त्यातून अमेरिकेची जीवितहानी झाली तर त्याची तीव्र प्रतिक्रिया अमेरिकेत उमटेल. पण हा मार्ग इराण शेवटचा म्हणून वापरण्याची शक्यताच अधिक आहे. त्याऐवजी इराणकडून इस्रायलवरील हल्ले अधिक तीव्र होण्याची शक्यता अधिक संभवते.