– संदीप कदम
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने बांगलादेशविरुद्धच्या अखेरच्या एकदिवसीय सामन्यात पंचांच्या कामगिरीवर नाराजी व्यक्त करत टीका केली होती. तसेच बाद दिल्यामुळे नाराज होऊन यष्टीही उद्ध्वस्त केल्या. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) तिला दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी निलंबित केले. हे प्रकरण नेमके काय आहे, तिच्यावर याप्रकरणी कोणती कारवाई होऊ शकते आणि याचा परिणाम भारतीय संघावर कसा होऊ शकतो, याचा घेतलेला हा आढावा…
हरमनप्रीतचे नेमके प्रकरण काय?
भारत आणि बांगलादेशदरम्यान नुकतीच तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील अखेरचा सामना चुरशीचा झाला आणि तो अनिर्णित राहिला. भारतीय संघ या सामन्यात २२६ धावांचा पाठलाग करत होता आणि भारताला २२५ धावाच करता आल्या. या सामन्यात मुहम्मद कमरुज्जमान आणि तन्वीर अहमद हे दोन्ही पंच बांगलादेशचेच होते, मात्र हा सामना हरमनप्रीतच्या वागणुकीमुळे चांगलाच चर्चेत राहिला. हरमनप्रीतने बाद झाल्यानंतर पंचाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आणि रागात बॅट स्टंपवर मारली. यानंतरही हरमनप्रीतचा राग शांत झाला नाही. सामना संपल्यावर आयोजित पुरस्कार सोहळ्यात बांगलादेश संघाच्या कर्णधाराला करंडक घेण्यासाठी पंचांनाही बोलवा, असे खोचकपणे सांगितले. हरमनप्रीतनुसार सामना बरोबरीत राखण्यात पंचांचाही तितकाच हातभार आहे. या वागणुकीनंतर माजी भारतीय क्रिकेटपटू आणि चाहत्यांनी तिच्यावर टीका केली आहे. यापूर्वीही हरमनप्रीतच्या आक्रमक वक्तव्यांमुळे तिच्यावर टीका करण्यात आली होती.
बांगलादेशची कर्णधार निगार सुल्तानाची हरमनप्रीतच्या वागणुकीवर काय प्रतिक्रिया होती?
बांगलादेश महिला क्रिकेट संघाची कर्णधार निगार सुल्तानाने हरमनप्रीत चांगल्या पद्धतीने वागू शकली असती असे म्हटले आहे. ‘‘ही हरमनप्रीतची समस्या आहे. मला त्याच्याशी काहीही देणे नाही. एक खेळाडू म्हणून तिची वागणूक आणखी चांगली असणे अपेक्षित होते, मात्र आपल्या संघासह बक्षीस सोहळ्याला उपस्थित राहणे योग्य वाटले नाही. स्थिती योग्य नसल्याने आम्ही तेथून निघून गेलो. क्रिकेट शिस्त आणि सन्मानाचा खेळ आहे,’’ असे सुल्तानाने सांगितले. ‘‘हरमनप्रीत बाद झाली नसती, तर ती खेळपट्टीवर असली असती तिला संघाचे पाच झेल आणि दोन धावचीत खेळाडूंबाबत काही बोलायचे नाही. या दोन्ही पंचांनी पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पंचगिरी केली आहे. त्यामुळे ते चांगले पंच आहेत. पंचांचा निर्णय हा अंतिम असतो, मग ते आपल्याला पसंत असो की नसो, असे सुल्ताना म्हणाली.
हरमनप्रीतवर कोणती कारवाई झाली?
हरमनप्रीतवर दोन आंतरराष्ट्रीय सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. भारतीय महिला क्रिकेट संघ २३ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबरदरम्यान हांगझो येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होत आहे. यामधील महिला क्रिकेट सामन्यांना १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघाने ‘आयसीसी’च्या क्रमवारीनुसार थेट उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे. हरमनप्रीतच्या नावे चार ‘डिमेरिट’ गुण जमा झाल्यास, तिला कदाचित उपांत्यपूर्व आणि उपांत्य सामन्यात मुकावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतीय संघाने अंतिम फेरी गाठल्यास त्या सामन्यात हरमनप्रीतला खेळण्याची संधी मिळू शकते.
खेळाडूच्या वागणुकीबाबत ‘आयसीसी’चा नियम काय सांगतो?
‘आयसीसी’च्या नियामानुसार कोणत्याही खेळाडूचे २४ महिन्यांच्या कालावधीच्या आत चार किंवा त्याहून अधिक ‘डिमेरिट’ गुण झाल्यास त्याच्यावर निलंबनाची कारवाई होऊ शकते. अशात खेळाडूंवर सामन्यावर बंदीची कारवाई होऊ शकते. दोन निलंबन गुण एक कसोटी किंवा दोन एकदिवसीय किंवा दोन ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या बंदी समान असतात. कोणत्याही खेळाडूचे ‘डिमेरिट’गुण हे २४ महिने त्याच्याशी संबंधित असतात, मात्र त्यानंतर हे गुण वगळले जातात. या प्रकरणात हरमनप्रीतवर ‘आयसीसी’ने दुसऱ्या स्तरावरील नियमाच्या उल्लंघनाअंतर्गत कारवाई केली. या स्तरावर दोषी ठरणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू ठरली.
हेही वाचा : हरमनप्रीतचा राग टीम इंडियाला पडला महागात, आशियाई स्पर्धेतून पडली बाहेर
सामनाधिकाऱ्यांच्या अहवालात काय म्हटले आहे?
हरमनप्रीत बाद झाल्यानंतर तिने सर्वप्रथम आपल्या बॅटने स्टम्प्सवर प्रहार केला. यानंतर बक्षीस वितरण सोहळ्यात सामनाधिकारी आणि बांगलादेश क्रिकेट अधिकाऱ्यांना सुनावले. सामनाधिकाऱ्यांनी याप्रकरणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) एक अहवाल सादर केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हरमनप्रीत कौरने आपली चूक मान्य केली आहे. तिच्यावर प्रतिबंधाची कारवाई केल्यानंतर तिला या कारवाईविरोधात अपील करण्याचा अधिकार आहे. याबाबत ‘आयसीसी’चे सामनाधिकारी सुनावणी करतील.