चिन्मय पाटणकर
राजस्थानातील कोटा शहरात विद्यार्थ्यांच्या गेल्या काही वर्षांतील सर्वाधिक आत्महत्यांची नोंद यंदा झाली आहे. या अनुषंगाने कोटा शहरातील शिकवणी वर्ग, तिथे शिकणारे विद्यार्थी, कोटा शहरातील शिकवणी वर्गांची उलाढाल, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या या सगळ्याचा आढावा घेणे महत्त्वाचे ठरते.

राजस्थानातील कोटा शहर खासगी शिकवणी वर्गांसाठी प्रसिद्ध का?

देशातील प्रतिष्ठित अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशाचे स्वप्न उराशी बाळगून देशभरातील लाखो विद्यार्थी राजस्थानातील कोटा शहरात जातात. कारण कोटा हे शहर खासगी शिकवणी वर्गांचे देशातील प्रमुख केंद्र (कोचिंग हब) म्हणून प्रसिद्ध झाले आहे. एकट्या कोटा शहरात १५०हून अधिक खासगी शिकवणी वर्ग आहेत. या खासगी शिकवणी वर्गांची वार्षिक उलाढाल सुमारे दहा हजार कोटींहून अधिक आहे. त्यामुळे कोटा शहरात खासगी शिकवणी वर्ग, खानावळी, निवास व्यवस्था अशी परिसंस्थाच (इकोसिस्टीम) निर्माण झाली आहे. इतकेच नाही, तर कोटातील काही शिकवणी वर्गांनी देशभरातील अन्य शहरांमध्येही शाखा सुरू केल्या आहेत. कोटा शहरातील खासगी शिकवणी वर्गांमध्ये लाखो रुपये शुल्क भरून विद्यार्थी संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई), राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा (नीट) अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. खासगी शिकवणी वर्गात तयारी केल्यावर आयआयटी, एम्स अशा संस्थांमध्ये निवड होण्याची विद्यार्थी-पालकांची अपेक्षा असते. त्यासाठी विद्यार्थी कोटा शहरात शिक्षणासाठी जातात.

विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची आकडेवारी काय?

गेल्या काही वर्षांमध्ये कोटा शहरात सातत्याने विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची नोंद झाली आहे. यंदाच्या वर्षात आतापर्यंत २३ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. नुकतीच दोन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. त्यातील एक विद्यार्थी महाराष्ट्रातील लातूर येथील होता. तो कोटा शहरात बारावीमध्ये शिकत होता. गेल्या काही वर्षांतील कोटा शहरातील विद्यार्थी आत्महत्येच्या आकडेवारीचा आढावा घेतल्यास २०१५मध्ये १७, २०१६मध्ये १६, २०१७मध्ये ७, २०१८मध्ये २०, २०१९मध्ये ८ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. करोना काळात हे प्रमाण काहीसे कमी झाले. २०२०मध्ये चार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, तर २०२१मध्ये एकाही आत्महत्येची नोंद झाली नाही. मात्र २०२२मध्ये पुन्हा १५ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. गेल्या काही वर्षांत यंदा कोटा शहरातील विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी सर्वाधिक आहे.

नुकत्याच झालेल्या आत्महत्येनंतर काय झाले?

विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांबाबत चिंता व्यक्त करत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी समिती स्थापन करून उपाययोजना सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याशिवाय कोटा जिल्हा प्रशासनाने सर्व वसतिगृहे, पेईंग गेस्ट सुविधा पुरवणाऱ्यांना खोल्यांमध्ये स्प्रिंग असलेले पंखे बसवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच जिल्हा प्रशासनाने शिकवणी वर्गांना पुढील दोन महिने कोणतीही परीक्षा न घेण्याचा आदेश दिला आहे.

कोटामध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची कारणे काय?

विद्यार्थी घरापासून दूर राहत असतात. त्यामुळे मानसिक आधार देण्यासाठी जवळपास कोणी नसते. त्याशिवाय विद्यार्थ्यांवर अभ्यासासाठी काटेकोर शिस्तीची जीवनशैली, अभ्यासाचा ताण, स्पर्धा परीक्षांमध्ये प्रवेशासाठी असलेली गळेकापू स्पर्धा आणि पालकांच्या अपेक्षांचे ओेझे असते. या सगळ्याचा परिणाम म्हणून विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर ताण निर्माण होऊन विद्यार्थ्यांनी आत्महत्या करण्याच्या घटना कोटामध्ये सातत्याने घडल्या आहेत. गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमुळे विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी शिकवणी वर्गांकडून काही उपाययोजनाही करण्यात आल्या आहेत. त्यात विद्यार्थ्यांसाठी समुपदेशकांची उपलब्धता, ताण घालवण्यासाठी मनोरंजक उपक्रम, आठवड्याला सुटी, शुल्कपरतावा धोरण, विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन अशा उपाययोजनांचा समावेश आहे. मात्र, आतापर्यंत या उपाययोजना पुरेशा ठरल्याचे दिसून येत नाही.

हेही वाचा : अग्रलेख : पालक की मारक?

आत्महत्येबाबत मानसिक आरोग्यतज्ज्ञांचे म्हणणे काय?

ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. उल्हास लुकतुके म्हणाले, की आज सगळीकडे यशाला मागणी आहे. चमकदार यश ही सर्वांची अपेक्षा आहे. चमकदार यश सर्वांनाच शक्य असते असे नाही आणि काही मुलांना ते हवे असते असेही नाही. मुलांची क्षमता, अभ्यास करण्याची क्षमता, केलेला अभ्यास टिकवून आठवण्याची क्षमता, केलेल्या अभ्यासाची मांडणी करण्याची क्षमता हे घटक महत्त्वाचे आहेत. मात्र या बाबत लक्ष दिले जात नाही. त्यामुऴे मुलांची ओढाताण होते. यश मिळणे आवश्यक झाल्याने त्याचा ताण येऊन विद्यार्थी आत्महत्येपर्यंत जातात. आजच्या काळात करिअरचे वेगळे पर्याय उपलब्ध आहेत. मात्र मुलांकडून असलेल्या अपेक्षांना समाजमान्यतेची झालर लागल्याने त्याचा ताण मुलांवर येतो. क्रमिक शिक्षणाला सध्या तरी अन्य पर्याय नसल्याने मुलांची मुस्कटदाबी होते.

chinmay.patankar@expressindia.com