आठवड्याच्या पहिल्या व्यवहाराच्या दिवशी बाजाराची सुरुवात मंदावल्याचं पाहायला मिळत आहे. आजही शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण सुरूच राहिली, कारण इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या संघर्षामुळे गुंतवणूकदारांनी शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याची जोखीम टाळली. BSE सेन्सेक्स आणि निफ्टी ५० लाल निशाणीवर उघडले. यूएस फेडरल रिझर्व्हद्वारे व्याजदर कपात करण्यात विलंब झाल्याची चिंता आणि नुकत्याच झालेल्या भारत-मॉरिशस कर कपातीमधील दुरुस्तीने गुंतवणूकदारांवर परिणाम झाला.

सेन्सेक्स आणि निफ्टी किती घसरले?

३० शेअर्सचा सेन्सेक्स ९३० अंकांनी म्हणजेच १.२५ टक्क्यांनी घसरून ७३,३१५.१६ वर उघडला. तो गेल्या आठवड्यात ७४,२४४.९ बंद झाला होता. NSE चा निफ्टी ५० निर्देशांक गेल्या आठवड्यातील २२,५१९.४ च्या तुलनेत १८०.३५ अंकांनी म्हणजेच ०.८ टक्क्यांनी घसरून २२,३३९.०५ वर उघडला. दोन्ही निर्देशांकांनी दुपारच्या व्यवहारात काही तोटा भरून काढला. दुपारी १२.४५ वाजता सेन्सेक्स ७३,७२८.५ आणि निफ्टी २२,३७७ वर व्यवहार करीत होते.

शेअर बाजार आज का घसरला?

सीरियातील इराणच्या दूतावासावर इस्रायलने केलेल्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी शनिवारी इराणने इस्रायलच्या दिशेने ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली. इस्रायल आणि इराण यांच्यातील नव्या तणावाचा सोमवारी गुंतवणूकदारांच्या भावनांवर नकारात्मक परिणाम झाला. आज बाजारावर अनेक चढउतार पाहायला मिळत आहेत. मध्य पूर्वेतील संघर्ष, भारत-मॉरिशस कर कपातीमधील प्रस्तावित बदल आणि यू एस फेडरल रिझर्व्हद्वारे व्याजदर कपात करण्यात झालेल्या विलंबाचा बाजारावर परिणाम झाला आहे,” असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक धोरणकार व्ही. के. विजयकुमार म्हणाले.

हेही वाचाः काँग्रेसच्या ‘महालक्ष्मी योजने’ला भाजपाकडून ‘लखपती दीदी’चं प्रत्युत्तर; काय आहेत जाहीरनाम्यात महिलांसाठीच्या योजना

इराणकडून घेतलेला बदला अपेक्षित असल्याने आणि शुक्रवारी (१२ एप्रिल) उच्च अमेरिकन चलनवाढ कमी करण्याच्या प्रयत्नाने बाजारावर परिणाम झाला आहे. “शुक्रवारच्या व्यापार सत्राच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेमधील CPI चलनवाढीच्या चिंतेमुळे निफ्टीला मंदीचा सामना करावा लागला. २०२४ साठी फेड व्याजदरात कपात करण्याची शक्यता कमी असल्यानं त्याचाही बाजारावर परिणाम झाला आहे, असंही मेहता इक्विटीज लिमिटेडचे वरिष्ठ उपाध्यक्ष (संशोधन) प्रशांत तपासे म्हणाले.

भारताने अलीकडेच मॉरिशसबरोबरच्या करासंदर्भातील करारात सुधारणा करून करचोरी अन् कराचा दुरुपयोग टाळण्याच्या उद्देशाने दुरुस्ती करारावर स्वाक्षरी केली. सुधारित कराराच्या मजकुरावर मार्चमध्ये स्वाक्षरी करण्यात आली होती. परंतु बुधवारी (एप्रिल १०) ही बाब सार्वजनिक करण्यात आली, त्यामुळे बाजारातील गुंतवणुकीवर त्याचा परिणाम झाला. तसेच विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीही केली होती. एफपीआयने शुक्रवारी निव्वळ आधारावर ८०२७ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या इक्विटी ऑफलोड केल्या होत्या. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) कडून सुधारित कर करारांतर्गत फायदे लागू होण्याबाबत अधिक स्पष्टता येईपर्यंत FPI बाहेर जाणे चालू राहण्याची शक्यता आहे.

आज कोणत्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली?

दुपारच्या व्यवहारात सर्वाधिक घसरण झालेल्या NSE कंपन्यांमध्ये श्रीराम फायनान्स लिमिटेड, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड आणि टेक महिंद्रा यांचा समावेश आहे.

शेअर बाजारात नेमके चाललंय काय?

बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस यांच्या मते, इराणने इस्रायलवर आठवड्याच्या शेवटी केलेल्या हल्ल्यामुळे बाजारात अनिश्चितता निर्माण झाली. तसेच सध्याच्या इराण आणि इस्रायलच्या हालचालींचाही बाजारावर परिणाम होत आहे. जर इस्रायलने इराणविरोधातील बदल्याच्या भावनेचा त्याग केला तर येत्या काही दिवसांत बाजारातील परिस्थिती सामान्य होण्याची शक्यता आहे, असंही सबनवीस यांनी सांगितले. अमेरिका इस्रायलवरील हल्ल्यात हस्तक्षेप करणार नसली तरी उर्वरित जी ७ मधील इतर राष्ट्रांनी हल्ल्याचा निषेध केला आहे. तसेच इराणवर अमेरिकेनं अनेक निर्बंध लादलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या आर्थिक हालचालीत फार काही मोठे बदल होणार नाहीत. परंतु जर इराणच्या हल्ल्याला इस्रायलने प्रतिसाद दिला. म्हणजे इस्रायलने इराणवर प्रतिहल्ला केला तर त्याचा बाजारावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. दोन्ही राष्ट्रांमधील संघर्ष विकोपाला गेला तर इतर देशही दोन्ही राष्ट्रांतील पाठिंब्यामुळे विभागले जाऊ शकतात. भारतासह सर्व बाजारपेठा या घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत. सध्याचे संकट लवकर दूर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आरबीआयही चिंतीत असून, अशा घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे, असंही सबनवीस म्हणाले.