History Behind the Selection of 13 Dalai Lamas: तेनझिन ग्यात्सो म्हणजेच १४ वे दलाई लामा यांचा ६ जुलै रोजी ९० वा वाढदिवस आहे. ते आतापर्यंतचे सर्वांत दीर्घायुषी दलाई लामा ठरले आहेत. त्यांच्यानंतरचा दलाई लामा कोण असेल, हे गदेन फोद्रांग ट्रस्टकडून ठरवले जाईल. तेनझिन ग्यात्सो यांच्यापूर्वीचे सर्व १३ दलाई लामा पूर्वीच्या दलाई लामांच्या मृत्यूनंतर लगेच पुढच्याच वर्षी जन्मले. त्यांची वयाच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षीच दलाई लामा म्हणून निवड झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर पूर्वीच्या १३ दलाई लामांची ओळख कशी पटवली गेली याचाच घेतलेला हा आढावा.

पहिले दलाई लामा: गेदुन द्रुपा (१३९१–१४७४)

  • गेदुन द्रुपा यांचा जन्म १३९१ मध्ये त्सांग भागातील साक्याजवळच्या ग्युरमे रुपा येथे झाला. त्यांचे मूळ नाव पेमा दोर्जे होते. त्यांचे वडील गोंपो दोर्जे आणि आई जोमो नाम्खा क्यी हे भटके जीवन जगणाऱ्या कुटुंबातील होते. १४७४ साली ते ८४व्या वर्षी ताशी ल्हुन्पो मठात ध्यानस्थ अवस्थेतच निवर्तले. १४१६ साली गेदुन द्रुपा हे तिबेटी बौद्ध भिक्षु, तत्त्वज्ञ आणि तांत्रिक योगी असलेल्या थोंगखा पा यांचे शिष्य झाले. थोंगखा पा यांच्या प्रयत्नांमुळे तिबेटी बौद्ध धर्मातील गेलुग परंपरेची स्थापना झाली.
  • थोंगखा पा यांच्याप्रती असलेली गेदुन द्रुपांची निष्ठा आणि भक्ती यामुळे त्यांना ‘प्रधान शिष्य’ हे बिरूद मिळाले. थोंगखा पा यांनी त्यांना नवीन भिक्षु वस्त्र देऊन तिबेटभर बौद्ध धर्माचा प्रचार करण्यास सांगितले.
  • १४४७ मध्ये गेदुन द्रुपा यांनी शिगात्से येथे ताशी ल्हुन्पो मठाची स्थापना केली. हा मठ गेलुग परंपरेतील एक प्रमुख विद्यापीठ मानले जाते. (तिबेटी बौद्ध धर्मात न्यिंगमा, कग्यु, साक्या आणि गेलुग या चार प्रमुख परंपरा आहेत.)

दुसरे दलाई लामा: गेदुन ग्यात्सो (१४७५–१५४२)

  • गेदुन ग्यात्सो यांचा जन्म १४७५ साली त्सांग भागातील शिगात्सेजवळील तानग सेक्मे येथे झाला. त्यांचे वडील कुंगा ग्यात्सो आणि आई माचिक कुंगा पेमो हे शेती करणाऱ्या कुटुंबातील होते.
  • बोलण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांनी आपल्या पालकांना सांगितले की, त्यांचे नाव पेमा दोर्जे आहे (हे पहिले दलाई लामा यांचे मूळ नाव होते) आणि ते ताशी ल्हुन्पो मठात राहणार आहेत.
  • १५२५ मध्ये गेदुन ग्यात्सो सेरा मठाचे प्रमुख (अ‍ॅबट) झाले. १५४२ मध्ये त्यांचे वयाच्या ६७व्या वर्षी निधन झाले.

तिसरे दलाई लामा: सोनम ग्यात्सो (१५४३–१५८८)

  • सोनम ग्यात्सो यांचा जन्म १५४३ मध्ये ल्हासाजवळील तोलुंग या गावात झाला. त्यांचे वडील नामग्याल ड्रक्पा आणि आई पेलझोम भुटी हे एका श्रीमंत कुटुंबातील होते. त्यांच्या इतर मुलांचे निधन झाले होते, त्यामुळे कोणताही अपशकुन टाळण्यासाठी सोनम ग्यात्सो यांना पांढऱ्या शेळीचे दूध पाजण्यात आले आणि त्यांचे नाव रणु सिचो पेलझांग असे ठेवले. रणु सिचो पेलझांग म्हणजे “शेळीच्या दूधामुळे वाचलेला समृद्ध बालक”.
  • ते जेव्हा तीन वर्षांचे होते, तेव्हा तिबेटचे तत्कालीन शासक सोनम डक्पा ग्यात्सेन यांनी दुसरे दलाई लामा यांचा पुनर्जन्म म्हणून त्यांना ओळखले. त्यानंतर त्यांना सोनम ग्यात्सो हे नाव देण्यात आले.
  • १५८८ साली, ते मंगोलियामध्ये उपदेश करत असताना त्यांचे निधन झाले.

चौथे दलाई लामा: योंतेन ग्यात्सो (१५८९–१६१७)

  • योंतेन ग्यात्सो यांचा जन्म १५८९ साली मंगोलियामध्ये झाला. ते चोकार जमातीचे प्रमुख त्सुलत्रिम चोजे यांचे पुत्र होते. त्सुलत्रिम चोजे हे अल्तान खान यांचे नातू होते आणि त्यांच्या दुसऱ्या पत्नी फा-खेन नुला यांचे पुत्र होते.
  • तिबेटमधील राज्यवर्तवय oracle (दैवी भविष्यवाणी करणारे भिक्षू) यांच्या भाकितांनुसार आणि जन्मावेळी दिसलेल्या शुभ संकेतांनुसार, गदेन मठाचे प्रमुख भिक्षू यांनी त्यांना तिसरे दलाई लामा यांचा पुनर्जन्म म्हणून ओळखले आणि त्यांचे नाव योंतेन ग्यात्सो ठेवले.
  • १६१७ मध्ये, वयाच्या २७व्या वर्षी त्यांचे निधन ड्रेपुंग मठात झाले.

पाचवे दलाई लामा: लोबसांग ग्यात्सो (१६१७–१६८२)

  • लोबसांग ग्यात्सो यांचा जन्म १६१७ साली ल्हासाच्या दक्षिणेला स्थित ल्होका चिंगवार ताक्तसे येथे झाला. त्यांचे वडील दुदुल रब्तेन आणि आई कुंगा ल्हान्झी हे होते.
  • चौथ्या दलाई लामांचे प्रमुख सेवक सोनम चोपेल यांनी एका चोंग-ग्या नावाच्या मुलाबद्दल असामान्य क्षमतेच्या बातम्या ऐकून त्याला भेट दिली. त्यांनी त्या मुलाला चौथ्या दलाई लामांशी संबंधित काही वस्तू दाखवल्या. त्या मुलाने लगेच त्या वस्तू आपल्याच असल्याचे सांगितले.
  • त्या काळातील अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे सोनम चोपेल यांनी या पाचव्या दलाई लामाच्या पुनर्जन्माबाबतचा शोध काही काळ गुप्त ठेवला. परिस्थिती स्थिर झाल्यानंतर, पाचव्या दलाई लामाला ड्रेपुंग मठात नेण्यात आले, जिथे तिसरे पंचेन लामा लोबसांग चोग्याल यांनी त्यांना दीक्षा दिली आणि त्यांचे नाव निगवांग लोबसांग ग्यात्सो असे ठेवले.
  • ते दलाई लामा झाल्यानंतर ल्हासामधील प्रसिद्ध पोटला राजवाड्याच्या बांधणीचे आदेश दिले. मात्र, १६८२ मध्ये वयाच्या ६५व्या वर्षी त्यांचे निधन झाले आणि पोटला राजवाडा पूर्ण होण्यापूर्वीच ते जग सोडून गेले.

सहावे दलाई लामा: त्सांग्यांग ग्यात्सो (१६८२–१७०६)

  • त्सांग्यांग ग्यात्सो यांचा जन्म १६८२ साली सध्याच्या अरुणाचल प्रदेशातील मोन तवांग भागात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव ताशी तेनझिन आणि आईचे नाव त्सेवांग ल्हामो होते.
  • पाचव्या दलाई लामांच्या इच्छेप्रमाणे पोटला राजवाड्याचे काम पूर्ण व्हावे यासाठी त्यांच्या मृत्यूची बातमी १५ वर्षे गुप्त ठेवण्यात आली. जनतेला सांगण्यात आले की ‘महान पाचवे दलाई लामा’ ध्यानधारणेत गुंतले आहेत. विशेष प्रसंगी दलाई लामांच्या सिंहासनावर त्यांचे विधीवत वस्त्र ठेवले जाई. त्या दरम्यान मंगोल राजकुमारांनी दलाई लामांची भेट घेण्याचा आग्रह धरला होता. त्यावेळेस दलाई लामांसारख्या दिसणार्‍या नामग्याल मठातील देपा डेयराब नावाच्या एका वृद्ध भिक्षूला दलाई लामा म्हणून उभे केले होते.
  • १६९७ साली, १४ वर्षांचे त्सांग्यांग ग्यात्सो यांना सहावे दलाई लामा म्हणून अधिकृतरीत्या गादीवर बसवण्यात आले. १७०६ साली त्यांना चीनमध्ये बोलावण्यात आले होते, मात्र त्या प्रवासातच त्यांचे निधन झाले.

सातवे दलाई लामा: केलसांग ग्यात्सो (१७०८–१७५७)

  • असे मानले जाते की, त्सांग्यांग ग्यात्सो यांनी आपल्या पुढील जन्माबाबत लीथांग (खाम भागात) येथेच होईल, असे एका गाण्यातून सूचित केले होते. “पांढऱ्या बगळ्या, मला तुझे पंख दे, मी फार दूर जात नाही, फक्त लीथांगपर्यंत आणि तिथून पुन्हा परत येतो.” १७०८ साली लीथांग येथे सोनम दार्ग्य आणि लोबसांग चोत्सो या दांपत्याच्या घरी एक मुलगा जन्मला, जो पुढे सातवे दलाई लामा ठरणार होता.
  • तिसऱ्या दलाई लामांनी स्थापलेल्या थुपतेन जंपालिंग मठातील भिक्षूंना त्या मुलामध्ये असामान्य लक्षणे जाणवली. त्याचप्रमाणे लीथांगमधील भिक्षूंनीही भविष्यवाणी केली होती की हा नवजात बालक दलाई लामांचा पुनर्जन्म आहे. त्या काळातील अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे त्याला तातडीने ल्हासाला न नेता कुंबुम मठात नेऊन दीक्षा देण्यात आली. नंतर १७२० साली त्यांना पोटला राजवाड्यात गादीवर बसवण्यात आले.
  • १७५१ साली, वयाच्या ४३ व्या वर्षी, दलाई लामांनी ‘काशग’ किंवा मंत्री परिषद स्थापन केली. ही परंपरा केंद्रीय तिबेटी प्रशासन आजही पाळते. केलसांग ग्यात्सो यांनी तिबेटचे आध्यात्मिक आणि राजकीय नेतृत्वही स्वीकारले. १७५७ साली त्यांचे निधन झाले.

आठवे दलाई लामा: जाम्फेल ग्यात्सो (१७५८–१८०४)

  • जाम्फेल ग्यात्सो यांचा जन्म १७५८ साली त्सांग भागातील वायव्य तिबेटमधील थोबग्याल, ल्हारी गंग येथे झाला. त्यांचे वडील सोनम धार्ग्ये आणि आई फुंत्सोक वांगमो हे मूळचे खाम भागातील होते. त्यांची वंशपरंपरा गेसर महाकाव्यातील प्रसिद्ध वीर ध्रला त्सेग्याल यांच्याशी जोडली जाते.
  • प्रचलित कथेनुसार जाम्फेल यांच्या गर्भधारणेच्या वेळी ल्हारी गंग परिसरात भरघोस पिके आली होती. बार्लीच्या प्रत्येक कणसाला तीन, चार, पाच फुलारलेल फुटवे होते. हे अद्वितीय मानले गेले. त्यांची आई आणि नातेवाईक बागेत जेवण करत असताना आकाशात एक प्रचंड इंद्रधनुष्य दिसले आणि त्याचे एक टोक थेट त्यांच्या आईला स्पर्श करून गेले. हा एक अत्यंत शुभशकुन मानला गेला.
  • जन्मानंतर जाम्फेल यांना आकाशाकडे पाहून हसताना आणि ध्यानमुद्रेत बसण्याचा प्रयत्न करताना अनेकदा पाहिले गेले. बोलायला लागल्यावर ते म्हणाले,“मी तीन वर्षांचा झाल्यावर ल्हासाला जाईन.”

नववे दलाई लामा: लुंगटोक ग्यात्सो (१८०५–१८१५)

  • लुंगटोक ग्यात्सो यांचा जन्म १८०५ साली खाम भागातील डान चोखोर या छोट्याशा गावात झाला. त्यांचे वडील तेनझिन चोक्योंग आणि आई धोन्दुप दोल्मा होत्या.
  • १८०७ साली त्यांना दलाई लामांचा पुनर्जन्म म्हणून ओळखण्यात आले आणि १८१० मध्ये त्यांना पोटला राजवाड्यात गादीवर बसवण्यात आले. मात्र, १८१५ साली केवळ ९ वर्षांचे असतानाच त्यांचे निधन झाले.

दहावे दलाई लामा: त्सुलत्रिम ग्यात्सो (१८१६–१८३७)

  • त्सुलत्रिम ग्यात्सो यांचा जन्म १८१६ साली खाम भागातील लीथांग येथे झाला. त्यांचे वडील लोबसांग दाख्पा आणि आई नामग्याल भुटी होत्या.
  • १८२२ साली त्यांना ओळखण्यात आले आणि त्याच वर्षी पोटला राजवाड्यात त्यांचा राज्याभिषेक झाला. मात्र, त्यांना सतत प्रकृतीच्या तक्रारी होत्या, आणि १८३७ साली त्यांचे निधन झाले.

अकरावे दलाई लामा: खेड्रुप ग्यात्सो (१८३८–१८५६)

  • खेड्रुप ग्यात्सो यांचा जन्म १८३८ साली खाम मिन्याकमधील गाथर येथे झाला. त्यांचे वडील त्सेतान धोन्दुप आणि आई युंगद्रुंग भुटी होत्या.
  • १८४१ साली त्यांना ओळखण्यात आले आणि पुढच्या वर्षी पोटला राजवाड्यात त्यांचा राज्याभिषेक झाला.
  • १८५६ साली त्यांचे पोटला राजवाड्यातच निधन झाले.

बारावे दलाई लामा: त्रिन्ले ग्यात्सो (१८५६–१८७५)

  • त्रिन्ले ग्यात्सो यांचा जन्म १८५६ साली ल्हासाजवळील ल्होका येथे फुंत्सोक त्सेवांग आणि त्सेरिंग युदोन या दांपत्याच्या घरी झाला. १८५८ मध्ये त्यांना ल्हासाला आणण्यात आले आणि त्यांना थुप्तेन ग्यात्सो हे नाव देण्यात आले.
  • १८७३ साली त्यांनी तिबेटचे आध्यात्मिक व राजकीय नेतृत्व पूर्णपणे स्वीकारले. मात्र, केवळ २०व्या वर्षी, १८७५ साली त्यांचे पोटला राजवाड्यात निधन झाले.

तेरावे दलाई लामा: थुप्तेन ग्यात्सो (१८७६–१९३३)

  • थुप्तेन ग्यात्सो यांचा जन्म १८७६ साली ‘फायर माऊस’ वर्षात, तिबेटच्या मध्य भागातील थाक्पो जिल्ह्यातील डग्पो येथील लँगदुन गावी झाला. त्यांचे वडील कुंगा रिनचेन आणि आई लोबसांग दोल्मा हे शेतकरी कुटुंबातील होते.
  • १८७७ साली नेचुंग या राज्यवर्तवय भविष्यवक्त्याच्या भाकितांनुसार आणि जन्मस्थळी दिसलेल्या शुभ संकेतांवरून त्यांना दलाई लामांचा पुनर्जन्म मानण्यात आले. १८७९ साली त्यांचा पोटला राजवाड्यात राज्याभिषेक झाला.
  • १९१४ साली त्यांनी तिबेटी सैन्याची ताकद वाढवण्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला. १९१७ साली ल्हासामध्ये ‘मेन-त्सी-खांग’ (तिबेटी वैद्यकीय व ज्योतिष संस्थान) स्थापन करून पारंपरिक वैद्यकशास्त्र व ज्योतिषशास्त्र टिकवण्याचा प्रयत्न केला.
  • १९२३ साली त्यांनी ल्हासामध्ये पोलिस मुख्यालय स्थापन केले, जे तिबेटी जनतेच्या सुरक्षेसाठी होते. त्याच वर्षी त्यांनी ग्यात्से येथे तिबेटमधील पहिली इंग्रजी शाळा सुरू केली.
  • १९३३ साली , वयाच्या ५८व्या वर्षी त्यांचे निधन झाले.