दाऊद टोळी फार पूर्वीपासून अमली पदार्थ तस्करी व विक्रीमध्ये सक्रिय होती. पण आता मेफेड्रोन सारख्या रासायनिक अमली पदार्थांच्या निर्मितीतही दाऊद टोळीचा हात असल्याचे पुरावे पोलिसांना सापडले आहेत. पाकिस्तानात लपून बसलेला छोटा शकीलचा भाऊ अन्वर बाबू मुंबईत ड्रग्स निर्मितीत मोठ्या प्रमाणात अर्थपुरवठा करीत असल्याची माहिती अटक आरोपींच्या चौकशीतून उघड झाली आहे. संयुक्त अरब अमिराती (यूएई) येथे प्रत्यार्पण केलेले दोन अमली पदार्थ तस्कर व अमली पदार्थ निर्मीतीचा गुन्हा असलेल्या व्यक्तीचे दाऊद टोळीशी संबंधीत गुंडांकडून अपहरण या प्रकरणामुळे हा संशय अधिक दृढ झालाय

दाऊद टोळीकडून कोणाचे अपहरण?

अमली पदार्थ निर्मितीच्या एका प्रकरणात आरोपी असलेल्या साजिद इलेक्ट्रिकवाला याचे अपहरण दाऊदशी संबंधित टोळीने केले होते. या प्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या कक्ष-३ च्या पोलिसांनी त्याची सुटका उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातून केली होती. इलेक्ट्रिकवालाला या टोळीने ३० दिवसांहून अधिक काळ डांबून ठेवले होते. इलेक्ट्रिकवाल्याला दाऊद टोळीशी संबंधित सरवर खानने ५० लाख रुपये होते. एमडी हे अमली पदार्थ बनवण्यासाठी ती रक्कम देण्यात आल्याचा आरोप आहे. पण इलेक्ट्रिकवालाने ती रक्कम परत केली नाही. त्यानंतर त्याचे अपहरण करून आरोपींनी ५० लाखांंची खंडणी वसूल केली. त्यानंतर आणखी तीन कोटी रुपयांची मागणी केली. गुन्हे शाखा आता या संपूर्ण टोळीच्या पार्श्वभूमीचा तपास करत असून याप्रकरणी १० हून अधिक आरोपींना अटक करण्यात आली आहे.

छोटा शकीलच्या भावाचा काय संबंध?

दाऊद टोळीशी संबंधित संशयित टोळीकडून अपहरण करण्यात आलेल्या शब्बीर सिद्दीकीने याबाबत माहिती दिली होती. त्याला अपहरण करणारा सरवर खान हा त्या टोळीचा म्होरक्या होता. सरवर त्याला मारहाण करताना, ‘तुला माहीत नाही का, मी छोटा शकीलचा भाऊ अन्वरसाठी काम करतो. तुला दिलेले पैसे अन्वरचे आहेत. पैसे दिले नाही, तर तुला जिवंत ठेवणार नाही’,असे धमकावत होता. यावेळी या टोळीने शब्बीर व अमली पदार्थ निर्मितीत सहभागी असलेल्या साजीद इलेक्ट्रिकवाला याचे अपहरण केले होते. त्यावेळी त्यांना पट्टा आणि लाकडी काठ्यांनी मारहाण करण्यात आली, नग्न करून नाचवले आणि त्याचे चित्रीकरण करण्यात आले. सरवर खानने असेही सांगितले की,अन्वर भाई एमडी (ड्रग्ज) विकत घेण्यासाठी पैसे पुरवतो आणि उमेदुर रहमान व सलीम डोला हे त्याची विक्री करतात.

कोण आहे अन्वर बाबू?

अन्वर बाबू शेख १९८४ साली भारतातून फरार होऊन पाकिस्तानात पळून गेला होता. त्याच्यावर खून, खंडणीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. एका बांधकाम व्यावसायिकाला २०२१ मध्ये धमकावण्याच्या प्रकरणातही सहभाग असल्याची माहिती मिळाली होती. अन्वर छोटा शकीलचा भाऊ आहे. गुन्हे शाखेने अमली पदार्थ निर्मितीचा गुन्हा असलेल्या साजिद इलेक्ट्रिकवाला याची तब्बल एका महिन्यानंतर उत्तर प्रदेशमधील बांदा जिल्ह्यातून सुटका केली. त्याच्या अपहरणाच्या तपासात आता शकीलचा भाऊ अन्वर बाबूचे नाव आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरण करण्यात आलेल्या साजिद इलेक्ट्रिकवाला याला २०१५ साली अंधेरी येथून महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने अमली पदार्थ निर्मिती प्रकरणात अटक केली होती, त्यानंतर तो कारागृहात होता. त्याच काळात सरवर खानदेखील त्या कारागृहात होता. तेव्हाच दोघांची ओळख झाली आणि तिथूनच दोघांनी एकत्र येऊन अमली पदार्थ बनवून मोठा पैसा कमावण्याची योजना आखली. त्या संपूर्ण योजनेसाठी छोटा शकीलचा भाऊ अन्वर बाबू शेख याचे पैसे पुरवले, असा आरोप आहे.

सोलापूर एमडी कारखान्याशी डी कंपनीचा संबंध?

सोलापूर येथील मेफेड्रोनच्या (एमडी) कारखान्यावर मुंबई पोलिसांनी गेल्या वर्षी केलेल्या कारवाईत २५६ कोटी रुपयांचे मेफेड्रोन (एमडी) जप्त केले होते. या प्रकरणातील फरार आरोपी ताहेर सलीम डोला व मुस्तफा कुब्बावाला यांना यूएई येथून प्रत्यार्पण करून भारतात आणण्यात आले. आरोपीविरोधात रेड कॉर्नर नोटीस देण्यात आली होती. आरोपी ताहिर डोलाचे प्रत्यर्पण अमली पदार्थ विरोधी मोहिमेतील भारताचे मोठे यश मानले जाते. आरोपीचा वडील सलीम डोला हाही अमली पदार्थ तस्करीच्या अनेक गुन्ह्यांत सहभागी होता. ताहिरच्या सूचनेनुसार सुरू असलेल्या विविध कारखान्यांमध्ये १० दिवसांमध्ये २०० किलो एमडीची निर्मिती होत होती. दोन वर्षांपासून तो एमडी निर्मितीत सक्रिय होता. सलीम डोलाचे दाऊद टोळीशी संबंध असल्याचे आरोप त्यावेळी झाले होते. गुन्हे शाखेने नुकतीच यूएई येथून सलीमचा मुलगा ताहिर डोला आणि पुतण्या मुस्तफा कुब्बावाला यांना अटक करून भारतात आणले आहे. छोटा शकीलचा भाऊ अन्वर, सलीम डोला आणि इतर संबंधितांच्या अटकेसाठी प्रयत्न सुरू आहेत.