Skin diseases from Bindi भारतीय संस्कृतीत टिकलीला फार महत्त्व आहे. पूर्वी महिला सौभाग्याचे प्रतीक म्हणून कपाळावर कुंकू लावायच्या, मात्र आता कुंकवाची जागा टिकलीने घेतली आहे. असे असले तरी त्याचे महत्त्व कायम आहे. आज वेगवेगळ्या रंगाच्या आणि आकाराच्या टिकल्या बाजारात मिळतात. केवळ विवाहित स्त्रियाच नाही, तर पारंपरिक सौंदर्याची हौस पूर्ण करण्यासाठी तरुणीही टिकली लावतात. परंतु, हीच टिकली आता अनेक तरुणी आणि महिलांच्या त्र्यागाचे कारण ठरत आहे. त्वचाविकारतज्ज्ञांनी टिकलीमुळे उद्भवणाऱ्या गंभीर आजाराचा इशारा दिला आहे. काय आहे हा आजार? आरोग्यतज्ज्ञ काय म्हणाले? त्याविषयी सविस्तर जाणून घेऊयात…
टिकलीमुळे त्वचाविकार
कृत्रिम टिकल्या दीर्घकाळ त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात, यामुळे ‘बिंदी ल्युकोडर्मा’ हा आजार उद्भवू शकतो, असे त्वचाविकारतज्ज्ञ सांगतात. आजकाल बहुतेक टिकल्यांमध्ये पी-टर्शियरी ब्युटिल फिनॉल (PTBP) नावाचा चिकट पदार्थ लावलेले कापड किंवा प्लास्टिकचे तुकडे असतात. हेच त्वचेवर गंभीर परिणाम करू शकतात. “प्रकाशित झालेल्या अनेक अभ्यासांमध्ये असे नमूद केले आहे की, बिंदी ल्युकोडर्मा हा आजार टिकलीतील चिकट पदार्थांमध्ये असलेल्या ‘मेलॅनोसायटोटॉक्सिक रसायनांमुळे’ होतो. त्यामुळे त्वचेतील रंगद्रव्य नष्ट होतात,” असे दिल्लीतील ‘इन्फ्ल्युएन्झ क्लिनिक’च्या त्वचाविकारतज्ज्ञ आणि संस्थापिका डॉ. गीतिका श्रीवास्तव स्पष्ट करतात.
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास कपाळावर जिथे तुम्ही या टिकल्या नियमितपणे लावता, त्या भागाचे रंगद्रव्य कालांतराने कमी होऊ लागतात, ज्यामुळे त्वचेवर ‘कोड’ (Vitiligo) सारखे पांढरे डाग दिसू लागतात. टिकलीचा चिकट पदार्थ तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पी-टर्शियरी ब्युटिल फिनॉल (PTBP) या रसायनमुळे हे घडते. हे रसायन त्वचेचे रंगद्रव्य (पिगमेंट) तयार करणाऱ्या पेशींसाठी अत्यंत विषारी आहे आणि ते संपर्काच्या ठिकाणी कायमस्वरूपी रंगद्रव्य नष्ट होण्यास (Permanent depigmentation) कारणीभूत ठरू शकते.”
भारतात टिकली मोठ्या प्रमाणात लावली जाते, भारतातील हवामान उष्ण आणि दमट असते, त्यामुळे हा धोका अधिक वाढतो. याचे कारण म्हणजे उष्णतेमुळे टिकलीतील रसायन सहज शोषले जाते. रसायनाचे त्वचेत शोषण वाढते. व्यक्तीची संवेदनशीलता आणि संपर्काचा कालावधी हेदेखील यात महत्त्वाची भूमिका बजावतात. “तुम्ही चिकट टिकली जितक्या जास्त काळ लावाल, तितकी जास्त तुम्हाला ही समस्या होण्याची शक्यता जास्त असते,” असे डॉ. श्रीवास्तव सांगतात.
महिलांनी काय खबरदारी घ्यावी?
तज्ज्ञ सुचवतात की, घरी तयार करण्यात आलेल्या टिकल्या या एक योग्य पर्याय ठरू शकतात. “बाहेरून खरेदी केलेल्या या चिकट टिकल्यांचा वापर फक्त अधूनमधून करा,” असे तज्ज्ञ सांगतात. तुमची त्वचा संवेदनशील असेल तर अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे. “त्वचेची ॲलर्जी किंवा बाजारातील टिकल्यांपासून पूर्वी प्रतिक्रिया झालेल्या लोकांनी कुंकू किंवा घरी तयार केलेल्या टिकल्या वापरण्यावर भर द्यावा.
कुंकवामध्ये ‘ॲझो रंग’ असू शकतात, तोदेखील संवेदनशील व्यक्तींमध्ये ल्युकोडर्मास कारणीभूत ठरू शकतो, ” असे तज्ज्ञ सांगतात. परंतु, याचे लगेचच त्वचेवर नुकसान होत नाही. डॉ. श्रीवास्तव सांगतात, “अनेक अभ्यासांनुसार, चारपैकी तीन महिलांना प्रत्यक्ष रंगद्रव्य नष्ट होण्यापूर्वी ॲलर्जी झाल्याचे लक्षात आले आहे. जर या टप्प्यावर टिकलीचा वापर थांबवला, तर ल्युकोडर्मा बऱ्याचदा टाळता येऊ शकतो.”
डॉ. श्रीवास्तव ठामपणे सांगतात की, सेंद्रिय कुंकू हा सर्वात सुरक्षित पर्याय आहे. “पारंपरिकरित्या टिकल्या, कुंकू वनस्पतीजन्य किंवा खनिज रंगांपासून तयार केले जात होते आणि त्यात हानिकारक रसायने नव्हती, त्यामुळे रंगद्रव्य नष्ट होण्याचा धोका नव्हता.” पर्यायी उपाय म्हणून तुम्ही हळदीचा वापर करून घरी तुमचे स्वतःचे कुंकू तयार करू शकता. “यामुळे जास्तीत जास्त तुमच्या त्वचेवर तात्पुरता पिवळसर रंग राहील, पण ते हानिकारक नसेल,” असेही त्या सांगतात.
ल्युकोडर्मा म्हणजे नक्की काय?
ल्युकोडर्मा या आजारामुळे त्वचेवरील रंगद्रव्य (pigmentation) कमी होते. या स्थितीमुळे त्वचेवर पांढरे डाग दिसू लागतात आणि गडद त्वचा असलेल्या लोकांमध्ये ते अधिक स्पष्टपणे ओळखता येतात. यालाच ‘कोड’ (vitiligo) असेही म्हणतात. जेव्हा हे डाग संपूर्ण शरीर, डोक्याची त्वचा (scalp), डोळे आणि जननेंद्रियांवर पसरतात, तेव्हा ही स्थिती गंभीर मानली जाते. हा दीर्घकाळ टिकणारा त्वचेचा आजार आहे. योग्य वैद्यकीय निदान आणि विविध उपचारांच्या संयोगाने रुग्ण या आजारावर नियंत्रण ठेवू शकतात. हा आजार उद्भवण्याची मूळ कारणे भिन्न असल्यामुळे सर्व रुग्णांमध्ये उपचाराचे परिणाम वेगळे असतात.
ल्युकोडर्माची लक्षणे काय?
एखाद्या व्यक्तीला ‘कोड’ (vitiligo) झाला आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी, खालील लक्षणे दिसू शकतात:
- सूर्यप्रकाशात आलेल्या त्वचेच्या भागांचे रंगद्रव्य नष्ट होणे (Depigmentation).
- त्वचेवर पांढरे डाग आधीपासून अस्तित्वात असताना, दुखापत झाल्यास ते डाग पसरणे.
- जे पांढरे डाग सामान्यतः त्रासदायक नसतात, त्यावर सूर्यप्रकाश, जास्त उष्णता किंवा घाम आल्यास खाज येण्यास सुरुवात होते.
- चेहरा, हात आणि शरीराच्या इतर भागांवर रंगद्रव्य नष्ट होणे स्पष्टपणे दिसू लागणे.
- केस अकाली पांढरे होणे (Premature greying of hairs).
- डोळ्यातील पडद्याचा (retina) रंग बदलणे.
- रंगद्रव्य नष्ट होण्याची प्रक्रिया सहसा वेदनाशून्य असते. त्याची सुरुवात शरीरावर ठिपक्यांच्या स्वरूपात सुरू होऊ शकते आणि नंतर त्यांचा आकार वाढू शकतो.