Did You Know Why is Sri Lanka represented on the Indian map scsg 91 | लोकसत्ता विश्लेषण : भारताच्या नकाशामध्ये श्रीलंका का दाखवतात माहितीय? | Loksatta

लोकसत्ता विश्लेषण : भारताच्या नकाशामध्ये श्रीलंका का दाखवतात माहितीय?

पाकिस्तान, चीन किंवा उत्तरेकडील सीमांना लागून असणारे इतर कोणतेही देश भारताच्या नकाशात दाखवले जात नाहीत.

Indian map
भारताच्या नकाशामध्ये श्रीलंकाचाही नकाशा दाखवला जातो (प्रातिनिधिक फोटो सौजन्य पिक्साबे डॉटकॉम वरुन साभार)

तुम्ही भारताचा नकाशा अनेकदा पाहिला असेल. त्यावेळी एक गोष्ट तुम्हाला प्राकर्षाने जावणली असेल की, भारताच्या नकाशामध्ये अनेकदा श्रीलंकेचा नकाशाही दाखवला जातो. सध्या श्रीलंकेतील आर्थिक संकट, महागाई हा जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. पण भारताचा शेजारी असणारा हा चिमुकला देश भारताच्या नकाशात का दाखवला जातो असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? अगदी भूगोल विषय शिकवताना वापरल्या जाणाऱ्या नकाशांमध्येही श्रीलंका दाखवला जातो. मात्र त्याचवेळी भारताच्या उत्तरेकडील सीमांना लागून असणारे पाकिस्तान, चीन किंवा इतर कोणतेही देश भारताच्या नकाशात दाखवले जात नाहीत. सामान्यपणे भारताच्या नकाशासोबत श्रीलंका वगळता इतर कोणताही देश अगदी स्पष्टपणे दाखवला जात नाही. मात्र असं का आहे याचा कधी तुम्ही विचार केलाय का? भारत आणि श्रीलंकेचे चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत, हे या मागील कारण नाहीय. भारताच्या नकाशामध्ये तळाशी अनेकदा श्रीलंकेचा नकाशा दाखवण्यामागे एक विशिष्ट कारण आहे.

एका विशेष कारणामुळे भारताच्या नकाशामध्ये अनेकदा श्रीलंका प्रामुख्याने आणि ठसठशीतपणे दाखवला जातो. नक्की कोणत्या कारणामुळे असं केलं जातं आपण जाणून घेऊयात. बरं या निर्णयामागे हिंदी महासागराची भूमिका कशी महत्वाची आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊयात.

असं का केलं जातं?
भारताच्या नकाशामध्ये श्रीलंका दाखवला जाण्याचा असा अर्थ नाहीय की श्रीलंकेवर भारताचा अधिकार आहे किंवा दोन्ही देशांमध्ये नकाशांसंदर्भात काही करार झालाय. खरं तर अशाप्रकारे भारताच्या नकाशामध्ये श्रीलंकेचा नकाशा दाखवण्याचं कारण आहे, समुद्रासंदर्भातील आंतरराष्ट्रीय नियम आणि कायदा म्हणजेच ओशियन लॉ. या कायद्याची निर्मिती तसेच ते जगभरामध्ये लागू करण्याचं काम संयुक्त राष्ट्र संघाने केलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या पुढाकारानेच हा कायदा अस्तित्वात आलाय.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: ‘या’ देशांमध्ये करोनाचा एकही रुग्ण आढळला नाही; यादीतील शेवटचे दोन देश पाहून आश्चर्य वाटेल

कधी आणि कसा बनवला हा कायदा?
हा कायदा बनवण्यासाठी सर्वात आधी सन १९५६ मध्ये संयुक्त राष्ट्र संघामध्ये ‘यूनायटेड नेशन्स कनव्हेक्शन ऑन द लॉ ऑफ द सी’ या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यानंतर १९५८ साली या संम्मेलनामधील चर्चा आणि मतांचा अभ्यास करुन अहवाल सादर करण्यात आला. समुद्रामधील सीमा आणि निर्बंधांबद्दल जगभरातील देशांचं एकमत असावं या हेतूने हा कायदा बनवण्यात आला होता. त्यानंतर १९८२ साली तीन वेगवेगळ्या संम्मेलानांचं आयोजन करुन समुद्रातील सीमांसंदर्भातील कायद्यांना मान्यता देण्यात आली.

नक्की पाहा हे फोटो >> Petrol Price : भारतात शंभरीकडे वाटचाल पण ‘या’ देशांमध्ये अगदी १.४५ रुपये प्रती लीटर दरात मिळतं पेट्रोल

काय सांगतो हा कायदा?
या कायद्यानुसार असं निश्चित करण्यात आलं की किनारपट्टी असणाऱ्या देशांच्या समुद्र किनाऱ्यांपासून त्या देशांची बेस लाइन ही २०० नॉटिकल माइल इतकी असेल. या बेस लाइनच्या आतील भागामध्ये येणारी बेटं आणि भौगोलिक ठिकाणं देशाच्या नकाशामध्ये दाखवणं बंधनकारक करण्यात आलं. अगदी सोप्या शब्दांमध्ये सांगायचं झाल्यास, एखाद्या देशाला समुद्रकिनारा लाभला असेल तर त्या समुद्रकिनाऱ्यापासून समुद्रामध्ये २०० नॉटिकल माइल अंतरांवरील गोष्ट नकाशात दाखवणं या कायद्यानुसार अनिवार्य आहे. याच कारणामुळे भारताच्या नकाशामध्ये श्रीलंकेचा नकाशाही दाखवला जातो. भारत आणि श्रीलंकेमधील अंतर हे २०० नॉटिकल माइलहून कमी आहे. भारताच्या समुद्रकिनाऱ्यांपासून २०० नॉटिकल माइलच्या आतील सर्व भौगोलिक गोष्टी नकाशामध्ये दाखवल्या जातात.

नक्की पाहा ही यादी >> या दहा देशांकडे आहे सर्वाधिक सोनं, पहिल्या स्थानावर आहे…

२०० नॉटिकल माइल म्हणजे किती?
२०० नॉटिकल माइल म्हणजे किती हे किलोमीटरमध्ये सांगायचं झाल्यास गणित सोपं आहे. एक नॉटिकल माइल म्हणजेच १.८२४ किलोमीटर. या हिशोबाने २०० नॉटिकल माइलचं अंतर हे ३७० किलोमीटर इतकं होतं. म्हणजेच भारतीय समुद्रकिनाऱ्यांपासून ३७० किमी अंतरांवरील सर्व गोष्टी भारताच्या नकाशामध्ये दाखवल्या जातात. त्यामुळेच श्रीलंका एक स्वतंत्र देश असला तरी तो भारताच्या नकाशामध्ये दाखवला जातो.

भारत आणि श्रीलंकेमधील अंतर किती?
भारत आणि श्रीलंकेमधील अंतर किती या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झाल्यास भारताचं शेवटचं टोक असणारं धनुषकोडी हे श्रीलंकेपासून १८ मैलांवर आहे. त्यामुळेच भारताच्या नकाशामध्ये श्रीलंका दाखवणं हे महत्वाचं आहे. त्यामुळेच भारताच्या नकाशासोबत श्रीलंकाही दाखवल्याने वाद होत नाही आणि जगभरामध्ये हाच नियम पाळला जातो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-01-2022 at 17:19 IST
Next Story
लोकसत्ता विश्लेषण: डिसेंबरमध्ये बेरोजगारीचा उच्चांक; शहरातील बेरोजगारी वाढल्याने काय परिणाम होणार?