Explained How is IPL auction who decides the base price of players abn 97 | विश्लेषण : आयपीएलचा लिलाव नक्की होतो तरी कसा? कोणाला किती पैसे मिळणार ठरवतात कसं?; जाणून घ्या... | Loksatta

विश्लेषण : आयपीएलचा लिलाव नक्की होतो तरी कसा? कोणाला किती पैसे मिळणार ठरवतात कसं?; जाणून घ्या…

यावेळी आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये १० संघ सहभागी होत असून एकूण ५९० खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे.

विश्लेषण : आयपीएलचा लिलाव नक्की होतो तरी कसा? कोणाला किती पैसे मिळणार ठरवतात कसं?; जाणून घ्या…
(प्रातिनिधीक छायाचित्र/IPL)

आयपीएल २०२२ साठी लिलाव १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे होणार आहे. यावेळी आयपीएलच्या मेगा ऑक्शनमध्ये (लिलाव) १० संघ सहभागी होत आहेत. या मेगा ऑक्शनमध्ये एकूण ५९० खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. यापैकी ३२० भारतीय आणि २७० विदेशी खेळाडू आहेत. २००८ मध्ये सुरु झालेल्या आयपीएलचा यावेळी १५वा हंगाम खेळला जाणार आहे. सकाळी ११ वाजता स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर याचे थेट प्रक्षेपण केले जाईल. आयपीएल २०२२ मेगा ऑक्शन दुपारी १२ वाजल्यापासून सुरु होईल. अधिकृत प्रसारकावर याचे लाइव्ह कव्हरेज दोन्ही दिवशी सकाळी ११ वाजल्यापासून सुरु होणार आहे. पण हे ऑक्शन होणार कसे? जाणून घेऊया..

आयपीएलच्या खेळाडूंचा लिलाव होतो म्हणजे काय होते?

आयपीएल लिलावात कोणता खेळाडू कोणत्या संघाकडून खेळायचा हे ठरवले जाते. हा एक खुला लिलाव आहे ज्यामध्ये सर्व संघ भाग घेऊ शकतात आणि त्यांना खरेदी करू इच्छित असलेल्या कोणत्याही खेळाडूसाठी बोली लावू शकतात. बीसीसीआयला खेळाडूंची यादी पाठवताना एखाद्या संघाने त्या खेळाडूमध्ये स्वारस्य दाखवले नसले तरी ते त्या खेळाडूवर बोली लावून त्याला लिलावात खरेदी करू शकते.

विश्लेषण : आयपीएलचा मायाबाजार…; महालिलावाचा आलेख उंचावणार?

लिलावासाठी येणारे संघ पूर्ण तयारीनिशी येतात. ज्या खेळाडूंना लिलावात खरेदी करायचे आहे त्यांची यादी ए,बी,सी,डी या क्रमाने संघाकडे असते. संघ ज्या खेळाडूंना खरेदी करण्याचा विचार करतात ते विकत घेतात, जर ते यशस्वी झाले नाहीत, तर ते त्यांच्या प्लॅन बी मध्ये समाविष्ट असलेले खेळाडू खरेदी करतात आणि नंतर इतर खेळाडू खरेदी करतात.

ऑक्शनमध्ये खेळाडूंचे वाटप कसे होते?

ऑक्शनमधील खेळाडूंना इंडियन कॅप्ड, इंडियन अनकॅप्ड आणि परदेशी खेळाडू अशा तीन श्रेणींमध्ये विभागले जाते. या खेळाडूंना नंतर गोलंदाज, वेगवान गोलंदाज, फिरकी गोलंदाज, अष्टपैलू आणि यष्टीरक्षक अशा त्यांच्या वैशिष्ट्यांच्या आधारे वेगवेगळ्या गटांमध्ये ठेवले जाते. ज्या खेळाडूने अद्याप देशासाठी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही त्याला अनकॅप्ड म्हणतात.

ऑक्शन कसे होते?

आयपीएलचे ऑक्शन हे इतर ऑक्शनप्रमाणेच आहे. आयपीएल लिलावादरम्यान, लिलावकर्ता किंवा ऑक्शनर खेळाडूच्या नावाची घोषणा करतो. लिलावकर्ता सांगतो की खेळाडू काय करतो, म्हणजे तो फलंदाज आहे की गोलंदाज आणि कोणत्या देशाचा आहे आणि त्याची मूळ किंमत किती आहे. त्यानंतर संघ त्या खेळाडूच्या बेस प्राईजनुसार (आधारभूत किंमत) बोली लावतात.

महिला ‘आयपीएल’ लवकरच. वास्तव काय? आव्हाने कोणती?

समजा एखाद्या खेळाडूची मूळ किंमत १ किंवा २ कोटी रुपये असेल तर त्या खेळाडूची पहिली बोली १ किंवा २ कोटी रुपयांपासून सुरू होईल. यानंतर, इतर संघांच्या बोलीमुळे त्या खेळाडूची किंमत वाढते. कोणत्याही खेळाडूला त्याच्या मूळ किमतीपेक्षा कमी किमतीत खरेदी करता येत नाही. तथापि, कोणताही संघ त्याच्या आधारभूत किमतीवर खेळाडू खरेदी करू शकतो.

खेळाडूसाठी सर्वाधिक बोली लावल्यानंतर, लिलावकर्ता सर्व संघांना खेळाडूवर लावलेल्या शेवटच्या बोलीबद्दल तीन वेळा सूचित करून आणि कोणत्याही संघाने स्वारस्य न दाखविल्यास त्याची विक्री करून त्या खेळाडूची लिलाव प्रक्रिया पूर्ण करतो. जो संघ सर्वाधिक किंवा शेवटची बोली लावतो तो खेळाडू विकत घेतो आणि त्याच्या संघात सामील होतो.

काही वेळा खेळाडू विकत घेण्यासाठी दोन संघांमध्ये स्पर्धा होते, याला बिडिंग वॉर म्हणतात. यामुळे अनेक वेळा खेळाडूंना त्यांच्या मूळ किमतीपेक्षा जास्त किमतीला विकले जाते.

खेळाडूंची बेस प्राईज म्हणजे काय आणि कशी ठरवली जाते?

मूळ किंमत ही लिलावात खेळाडूवर बोली लावलेली सर्वात कमी किंमत असते. लिलावापूर्वी खेळाडू बेस प्राईज ठरवतो आणि ती बीसीसीआयला सादर करतो. खेळाडू त्याच्या बोर्डाकडून बीसीसीआयकडे ना-हरकत प्रमाणपत्र देखील सादर करतो, ज्यामध्ये त्याला आयपीएलमध्ये सामील होण्यासाठी त्याच्या बोर्डाकडून परवानगी मिळाली आहे, असे लिहिलेले असते.

कॅप्ड भारतीय खेळाडू आणि परदेशी खेळाडू, सर्वसाधारणपणे, त्यांची मूळ किंमत जास्त ठेवतात, कारण त्यांना लिलावात जास्त किंमत मिळण्याची अपेक्षा असते. दुसरीकडे, अनकॅप्ड आणि कमी प्रसिद्ध खेळाडू त्यांच्या मूळ किमती तुलनेने कमी ठेवतात. बेस प्राईज ठरवताना खेळाडू त्यांची मागील कामगिरी, त्यांची लोकप्रियता, सोशल मीडिया फॉलोअर्स इत्यादी गोष्टी विचारात घेतात.

अनसोल्ड खेळाडू म्हणजे काय?

अनसोल्ड खेळाडू असा असतो ज्याच्यावर लिलावादरम्यान कोणताही संघ बोली लावत नाही किंवा ज्याला कोणताही संघ खरेदी करू इच्छित नाही. संपूर्ण लिलाव प्रक्रियेदरम्यान एखादा खेळाडू विकला गेला नाही तर त्याला अनसोल्ड खेळाडू असे म्हणतात. लिलावाच्या पहिल्या फेरीत विक्री न झालेल्या खेळाडूचे नाव लिलावाच्या शेवटी किंवा जलद लिलाव प्रक्रियेदरम्यान पुन्हा समोर आणले जाऊ शकते. जेव्हा संघ त्या खेळाडूमध्ये स्वारस्य दाखवतात तेव्हा असे होते. एखाद्या संघातील जखमी किंवा अनुपलब्ध खेळाडूची बदली म्हणून स्पर्धेदरम्यान विक्री न झालेला खेळाडू निवडला जाऊ शकतो.

जलद लिलाव म्हणजे काय?

यामध्ये बीसीसीआयला एक यादी देण्यात येते, ज्यामध्ये त्या न विकल्या गेलेल्या खेळाडूंची नावे असतात, ज्यामध्ये संघ स्वारस्य दाखवतात. लिलावात न विकलेल्या खेळाडूंची पुन्हा बोली लावली जाते तेव्हा लिलाव प्रक्रिया अतिशय जलद होते, लिलावकर्ता पटकन खेळाडूंची नावे घेतो, ज्यापैकी काही संघांकडून विकत घेतले जाते. या जलद लिलावात, बहुतेक खेळाडू मूळ किंमतीवर खरेदी केले जातात. काही वेळा या प्रक्रियेत खेळाडू विकत घेण्यासाठी दोन संघांमध्ये स्पर्धाही होते. पण  हे सहसा फार दुर्मिळ आहे.

खेळाडूंना किती पैसे मिळतात?

जर एखाद्या खेळाडूला तीन वर्षांच्या करारावर पाच कोटी रुपयांना विकत घेतले असेल, तर त्याला प्रतिवर्षी पाच कोटी रुपये मिळण्याचा हक्क आहे. कोणत्याही परिस्थितीत खेळाडूला पूर्ण पैसे मिळतात. एखादा खेळाडू संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध असल्यास, त्याने कितीही सामने खेळले आहेत याची पर्वा न करता त्याला पूर्ण रक्कम मिळते.

हंगाम सुरू होण्यापूर्वी एखादा खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडला तर संघाला कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत. एखादा खेळाडू संपूर्ण हंगामाऐवजी काही सामन्यांसाठी उपलब्ध असल्यास, उपलब्धतेच्या आधारावर संघ त्याला १० टक्के रिटेनरशिप फी देतात.

जर एखाद्या संघाला हंगामाच्या मध्यभागी खेळाडूला सोडायचे असेल तर त्याला संपूर्ण हंगामासाठी पैसे द्यावे लागतील. एखाद्या खेळाडूला स्पर्धेच्या मध्यभागी दुखापत झाल्यास त्याचा वैद्यकीय खर्च संघाला करावा लागतो.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-02-2022 at 17:41 IST
Next Story
विश्लेषण : अमेरिकेतील महागाईमुळे भारतातल्या शेअर बाजाराचे नुकसान का होत आहे?; जाणून घ्या..