भक्ती बिसुरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना महासाथीतून देश आता कुठे सावरून पूर्वपदावर येत आहे, तोच ओमायक्रॉनच्या बीए.४ आणि बीए.५ या उपप्रकारांमुळे रुग्णांची संख्या काही प्रमाणात वाढू लागली आहे. खरे तर करोना प्रतिबंधक लस घेतल्यामुळे बहुसंख्य भारतीयांना कोविडच्या गंभीर लक्षणांपासून संरक्षण मिळाल्याचे काही संशोधनांतून समोर येत आहे. तरीही लसीकरणाला नकार देणारे, पहिल्या दोन मात्रा घेतल्यानंतर वर्धक मात्रा घेण्यात टाळाटाळ करणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीय आहे.

वर्धक मात्रा कशासाठी?

रोगाचा संसर्ग होण्यापूर्वीच त्याविरोधातील रोगप्रतिकारशक्ती शरीरात निर्माण व्हावी, म्हणून लस दिली जाते. लसीमुळे शरीरात जी प्रतिपिंडे निर्माण होतात, त्यांचे प्रमाण काही काळाने कमी होत जाते. हे प्रमाण कायम राखले जावे यासाठी सामान्यपणे अशा लशींच्या वर्धक मात्रा दिल्या जातात. भारतातील करोना लसीकरण मोहिमेत पुण्यातील ‘सीरम इन्स्टिटय़ूट’ने तयार केलेली ‘कोव्हिशिल्ड’ आणि हैदराबादच्या ‘भारत बायोटेक’ने तयार केलेल्या ‘कोव्हॅक्सिन’ या दोन प्रमुख लशींचा वापर करण्यात आला. साथीची तीव्रता आणि त्या काळातील प्राधान्यक्रम यांचा विचार करुन टप्प्याटप्प्याने वेगवेगळय़ा वयोगटांतील लाभार्थीसाठी ही लसीकरण मोहीम खुली करण्यात आली. त्यापुढच्या टप्प्यात पूर्वी घेतलेल्या लशीची तिसरी म्हणजे वर्धक मात्रा घेण्याची सूचना करण्यात आली. ओमायक्रॉनच्या बीए.४ आणि बीए.५ या उपप्रकारांमुळे वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर लशीची वर्धक मात्रा घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. देशातील विविध भागांमध्ये करोना रुग्णांची संख्या वाढत आहे आणि त्यापैकी सर्वाधिक रुग्ण हे लसीकरण न झालेले आणि वर्धक मात्रा न घेतलेले असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. लसीकरण झाल्यानंतरही करोना संसर्ग झालेल्या रुग्णांत आजाराची लक्षणे सौम्य आहेत, मात्र  सहव्याधीग्रस्त असूनही लस न घेतलेल्या रुग्णांना करोनाचा संसर्ग झाला असता त्या रुग्णामध्ये गुंतागुंत वाढण्याचा धोका आहे.

पात्र असूनही मात्रेकडे पाठ

वर्धक मात्रेसाठी पात्र नागरिकांचे ती घेण्यासाठी पुढे येण्याचे प्रमाण फारसे समाधानकारक नाही. १८ ते ६० वर्षे वयोगटातील केवळ सात टक्के तर ६० वर्षांवरील वयोगटातील केवळ ४० टक्के नागरिकांनी आतापर्यंत वर्धक मात्रा घेतल्या आहेत. भारत सरकारने वर्धक मात्रा लसीकरणासाठी राखीव ठेवलेल्या मात्रांचे प्रमाण तब्बल चार कोटी २२ हजार (४२.२ दशलक्ष) एवढे आहे. त्या तुलनेत मात्रा घेणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे. १८ वर्षांवरील प्रत्येक जण वर्धक मात्रेसाठी पात्र आहे, असे गृहीत धरल्यास ही संख्या ९५ कोटी (९५० दशलक्ष) एवढी आहे. आरोग्यसेवेतील ५५ लाख (५.५ दशलक्ष) कर्मचारी वर्धक मात्रेचे लाभार्थी आहेत. इतर क्षेत्रांतील ९७ लाख (९.७ दशलक्ष), १८ ते ६० वर्ष वयोगटातील ४३ लाख (४.३ दशलक्ष) आणि ६० वर्षांवरील दोन कोटी २६ लाख (२२.६ दशलक्ष) व्यक्तींना वर्धक मात्रा देण्यात आली असल्याची माहिती केंद्र शासनाकडून देण्यात आली आहे.

मात्रेसाठी पात्रतेचे निकष

करोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी पात्र असलेल्या प्रत्येक व्यक्तीने लशीची वर्धक मात्रा घेणे आवश्यक आहे. दुसरी मात्रा घेऊन नऊ महिने पूर्ण झालेल्या व्यक्तीला वर्धक मात्रा घेता येते. त्यातही प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक, सहव्याधीग्रस्त रुग्ण, रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या व्यक्ती यांनी तातडीने वर्धक मात्रा घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. श्वसनरोग, रक्तदाब, फुप्फुसाचे विकार, कर्करोग, मधुमेह अशा दीर्घकालीन आजारांचा सामना करत असलेल्या व्यक्तींनी वर्धक मात्रा घेण्यात कोणतीही टाळाटाळ करू नये असा सल्ला डॉक्टर देतात.

वर्धक मात्रेचे महत्त्व

भारतात पहिल्या दोन लस मात्रा पूर्ण केलेल्या नागरिकांमध्ये वर्धक मात्रा घेण्याबाबत फारसा उत्साह दिसत नाही. या पार्श्वभूमीवर ‘न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’ या नियतकालिकातील एका शोधनिबंधात या संदर्भातील निष्कर्ष मांडण्यात आले आहेत. ओमायक्रॉनचे प्रकार असलेले बीए.४ आणि बीए.५ हे विषाणू पहिल्या दोन मात्रांतून निर्माण होत असलेल्या रोगप्रतिकारशक्तीमधून आपली सुटका करून घेण्यात यशस्वी होत आहेत. यावर उपाय म्हणून वर्धक मात्रेचे संरक्षण उपयुक्त ठरत असल्याचे या संशोधनातील निष्कर्षांतून समोर आले आहे. भारतात ओमायक्रॉन विषाणूमध्ये उत्परिवर्तनाची प्रक्रिया सातत्याने सुरू असल्याने वर्धक मात्रा अत्यावश्यक असल्याचे या संशोधनामुळे अधोरेखित होत आहे.

वर्धक मात्रा घेतलेले अधिक सुरक्षित?

सध्या राज्याच्या काही भागांमध्ये ओमायक्रॉनचे उपप्रकार असलेल्या बीए.४ आणि बीए.५ चे रुग्ण वाढताना दिसत आहेत. प्रामुख्याने मुंबई, पुणे, ठाणे या भागात हे प्रमाण अधिक आहे. बीए.४ आणि बीए.५ मुळे करोना होणाऱ्या रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण हे दोन लशींची मात्रा आणि वर्धक मात्रा न घेतलेले असल्याचे निरीक्षण डॉक्टरांकडून नोंदवण्यात येत आहे. त्यामुळे संसर्गाचा धोका टाळण्यासाठी करोना लसीकरण पूर्ण करावे, ज्यांनी वर्धक मात्रा घेतलेली नाही त्यांनी ती प्राधान्याने घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणा करत आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained indians backs patients vaccine corona print exp 0622 ysh
First published on: 30-06-2022 at 00:11 IST