प्रदीप नणंदकर
लातूर पॅटर्नची उत्सुकता राज्यातच नव्हे तर देशभरात गेल्या तीन-चार दशकांपासून आहे. पिढ्या बदलतात मात्र शिक्षणातील लातूर पॅटर्नचे नाव मात्र कायम आहे. हा लातूर पॅटर्न नेमका निर्माण कसा झाला, तो विकसित कसा होत गेला हे समजून घेणे नक्कीच औत्सुक्याचे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय आहे लातूर पॅटर्न?

सुमारे ४५ वर्षांपूर्वी लातूरच्या देशी केंद्र शाळेचे मुख्याध्यापक शि. वै. खानापुरे यांनी आपल्या शाळेतील शिक्षकांना एकत्र बोलावून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी, यासाठी एक योजना शिक्षकांसमोर मांडली. अतिरिक्त मानधन न घेता शाळेच्या व्यतिरिक्त सायंकाळी विशेष वर्ग घ्यावेत, विद्यार्थ्यांना बोलावून त्यांचा अभ्यास करून घेताना, त्यांच्या शंकांचे निरसन करावे, एवढेच नव्हे, तर विद्यार्थ्यांना घरी पोहोचवण्यापर्यंत लक्ष द्यावे अशी कल्पना मांडली. त्या वेळचे चंद्रशेखर भोगडे, विजय दबडगावकर अशा अनेक शिक्षकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

केंद्र शाळांची गुणवत्ता वाढ कशी?

देशी केंद्र शाळेची गुणवत्ता वाढायला लागल्यानंतर, अन्य शाळांनीही हीच कल्पना उचलून धरली. परिणामी लालबहादूर शास्त्री विद्यालयातील विद्यार्थी संपूर्ण राज्यात दहावीच्या परीक्षेत गुणवत्तेत पहिला आला व त्यानंतर लातूर पॅटर्नची चर्चा सुरू झाली. पुढील अनेक वर्ष लातूरचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत दिसू लागले. शाळांचा हा प्रयोग महाविद्यालयात सुरू झाला. दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य क. हे. पुरोहित यांनी यासाठी अतिशय परिश्रम घेतले व तेव्हा बारावीच्या परीक्षेत दयानंद विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकू लागले. दयानंद विज्ञान महाविद्यालयाबरोबरच राजर्षी शाहू महाविद्यालयानेही विशेष परिश्रम घेत विद्यार्थ्यांकडे अधिक लक्ष द्यायला सुरुवात केली डॉ. जनार्दन वाघमारे, अनिरुद्ध जाधव यांच्या परिश्रमामुळे राजर्षी शाहू महाविद्यालयाचे विद्यार्थीही गुणवत्तेत यायला सुरू झाले. लातूरबरोबर अहमदपूर येथील महात्मा गांधी महाविद्यालयाचे विद्यार्थीही राज्यस्तरावर झळकायला लागले.

अल्पावधीत यशाची चर्चा?

या नव्या अध्यापन योजनेची चर्चा सुरू झाली आणि लातूरमधील शाळांना राज्यातीलच नव्हे, तर परराज्यातीलही शिक्षक भेटी देऊ लागले. लातूरमधील शिक्षकांना ही कल्पना समजावून सांगण्यासाठी अनेक शहरांमधून निमंत्रणेही येऊ लागली. शाळेत येताना घड्याळ बघायचे मात्र घरी परतताना घड्याळ बघायचे नाही म्हणजे लातूर पॅटर्न, अशी विलासराव देशमुख यांनी केलेली लातूर पॅटर्नची व्याख्या सतत चर्चेत येऊ लागली. त्याचा उलटा परिणामही होत गेला. लातूरच्या गुणवत्तेबद्दल शंका घेण्यास सुरुवात झाली. लातूरच्या विद्यार्थ्यांस्या उत्तरपत्रिका अन्य विभागात तपासण्यासाठी पाठवण्यात आल्या मात्र त्यातूनही लातूरची गुणवत्ता सिद्ध झाली.

विद्यार्थीकेंद्रित संकल्पना म्हणजे काय?

सातत्याने विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे, त्यांच्या अडचणी सोडवणे हा लातूर पॅटर्न विकसित झाला. लातूरच्या दयानंद व शाहू या महाविद्यालयांनी विशेष परिश्रम घेतल्यामुळे विलासराव देशमुख यांनी या महाविद्यालयाला मान्यताप्राप्त तुकड्यांमध्ये वाढ करून दिली व विनाअनुदानित तुकड्यादेखील दिल्या, त्यातून या महाविद्यालयात अधिक गुणवत्तेचे प्राध्यापक अन्य प्रांतातून आणण्यास सुरुवात झाली. विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क घेणे सुरू केले व पॅटर्नमध्ये पैशाचा खेळ सुरु झाला. याचदरम्यान खाजगी शिकवणी वर्ग सुरू होते मात्र त्यांना फारसे महत्त्व नव्हते. बारावीच्या गुणांवर वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रवेश बंद झाला आणि केंद्रीय परीक्षा (सीईटी) सुरू झाली त्यावेळी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांवर यामुळे अन्याय होईल अशी भूमिका येथील संस्थाचालक, प्राचार्यांनी घेतली. मोर्चे काढले मात्र केंद्रस्तरावरचा निर्णय असल्यामुळे त्यात बदल झाला नाही. त्यानंतर पुन्हा या महाविद्यालयांनी मेहनत घेण्यास सुरुवात केली. सीईटी नंतर नीट अशा स्पर्धा परीक्षा सुरू झाल्या त्याची काठीण्य पातळी वाढू लागली व या महाविद्यालयाबरोबर खाजगी शिकवणी वर्गही सुरू झाले.

खासगी शिकवण्यांचे पेव कशामुळे फुटले?

विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी देशातील विविध भागांतून उच्च विद्याविभूषित प्राध्यापक लातुरात यायला सुरुवात झाले. त्यांनी काहीच वर्षांत स्वतःचे खाजगी शिकवणी वर्ग सुरू केले किंवा अन्य खाजगी शिकवणी वर्गात दुप्पट पगारावर नोकरी पत्करली. त्यातून शिकवणी चालकांमध्ये स्पर्धा सुरू झाली. यामध्ये राजकीय मंडळीचा, खंडणीखोरांचा हस्तक्षेप सुरू झाला. अविनाश चव्हाण या शिकवणी चालकाचा खून हा स्पर्धेतून झाला. आपल्यापेक्षा अन्य पुढे जातो आहे ही असुया निर्माण झाली. अविनाश चव्हाण यांनी एक कोटी रुपयाची बक्षिसे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी जाहीर केली होती, त्यातूनच अनेक समस्या निर्माण झाल्या.

खासगी शिकवण्याची आजची स्थिती काय?

आता देशातील अनेक नामवंत खाजगी शिकवणी वर्ग, आपल्या शाखा लातूरमध्ये सुरू करत आहेत. एक-दोन वगळता जवळपास सर्व शिकवणी वर्गाच्या शाखा आता सुरू झालेल्या आहेत. महाविद्यालयाच्या प्रवेशाबरोबरच खाजगी शिकवणी वर्गातील प्रवेशासाठीही विद्यार्थी ताटकळत असतात. लातूरचे नाव आता देशभर गाजते आहे व ते अद्यापही टिकून आहे. सर्वाधिक डॉक्टर व इंजिनियर तयार करणारे गाव म्हणून लातूरची ओळख आहे. एकट्या लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयातून पाचशेपेक्षा अधिक वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला दरवर्षी प्रवेश घेतात. लातुरातून दरवर्षी सुमारे एक हजार विद्यार्थ्यांपेक्षा अधिक विद्यार्थी वैद्यकीय व अभियांत्रिकी अभ्यासक्रमाला प्रवेश घेत आहेत. त्यामुळे हमखास यश मिळवून देणारे गाव अशी कोटा या शहराप्रमाणे लातूरचीही ओळख निर्माण झाली.

शिक्षण क्षेत्रातही पळवापळवी?

राजकारणाप्रमाणे शिक्षण क्षेत्रातही जीवघेणी स्पर्धा असल्यामुळे, शिकवणी वर्गातील शिक्षकांना आपल्याकडे ओढून घेण्याची स्पर्धा या क्षेत्रात आहे. वीस वर्षांपूर्वी लातूरमध्ये उमाकांत होनराव यांनी शिकवणी वर्ग सुरू केला व दक्षिणेतील प्राध्यापक शिकवण्यासाठी आणले होते. सहा महिन्यातच त्यांचे सर्व प्राध्यापक एका महाविद्यालयाने आपल्याकडे नेले. लातूरमध्ये वर्षाला एक कोटी रुपये पगार घेणाऱ्या शिक्षकांची संख्या शंभरीपार झाली आहे, हे या स्पर्धेमुळेच घडते आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained is the quality of latur teaching pattern still outstanding today print exp abn