देशातील सर्वात श्रीमंत अशा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे. त्या दृष्टीने राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. मुंबई महापालिकेतील सत्ता मिळवायचीच असा निर्धार करीत भाजपने व्यूहरचना करण्यास सुरुवात केली  आहे. रस्ते, स्वच्छता, सागरी किनारा मार्ग प्रकल्प आदींच्या कामांमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत भाजपने शिवसेनेला खिंडीत पकडण्याचा यापूर्वी अनेक वेळा प्रयत्न केला. निवडणुका जवळ आल्यामुळे भाजप भलतीच आक्रमक झाली आहे. त्यात आता टिपू सुलतान नामकरण प्रकरणाची भर पडली आहे. गेले दोन दिवस नामकरण प्रकरणावरुन राजकारण तापू लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न?

करोना संसर्गामुळे मुंबई महापालिका सभागृह, वैधानिक समित्यांच्या बैठका दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सुरू होत्या. या बैठकांमध्ये बोलण्याची संधी मिळत नसल्याचा आक्षेप नोंदवत भाजपकडून वारंवार नाराजी व्यक्त होत होती. करोना संसर्गाचा जोर ओसरू लागताच पालिका सभागृह व समित्यांच्या बैठका प्रत्यक्षात घ्याव्या अशी मागणी वारंवार भाजपकडून करण्यात येऊ लागली. अखेर बैठका प्रत्यक्षात सुरू झाल्या आणि भाजपने आक्रमक भूमिका घेतली. कधी रस्त्यांच्या कामांवरून, तर कधी स्वच्छता, पाणीपुरवठा अशा निरनिराळ्या सुविधांतील त्रुटींवर बोट ठेऊन भाजप नगरसेवकांनी शिवसेनेवर आरोपांची सरबत्ती सुरूच केली. त्यातच स्थायी समितीमध्ये विविध विषयांच्या प्रस्तावांवर चर्चा करण्यास संधी देण्यात येत नसल्याचा मुद्दा उपस्थित करून भाजप नगरसेवकांनी बैठकीतच ठिय्या आंदोलन केले. गेल्या काही दिवसांतील आक्रमकतेवरून एकूणच शिवसेनेला जेरीस आणण्याचा पवित्रा भाजपने घेतल्याचे निदर्शनास आले. आता काँग्रेसच्या मंत्र्यांनी मैदानाचे उद्घाटन करून टिपू सुलतान नामकरण केले तरीही त्यावरून उफाळून आलेल्या वादात भाजपने शिवसेनेलाच खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला.

हिंदुत्वाचा मुद्दा केंद्रस्थानी

एकेकाळी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना आणि भाजप एकत्र आले आणि राज्यात हिंदुत्ववादी पक्षांची युती जन्माला आली. अगदी अयोद्धेमधील कारसेवेतील सहभागानंतर कडवट हिंदुत्ववाद्यांच्या पंक्तीत भाजपबरोबरीने शिवसेनेला मान मिळू लागला. मात्र विधानसभेच्या मागील निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये काडीमोड झाला. इतकेच नव्हे तर एकेकाळी कडवे विरोधक असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करून भाजपला सत्तेपासून दूर ठेवणाऱ्या शिवसेनेवर भाजपसमर्थकांकडून जहरी टीका होऊ लागली. हिंदुत्वाची पताका खांद्यावरून उतरविल्याची टीकाही भाजपकडून शिवसेनेवर करण्यात आली. आता पुन्हा एकदा टिपू सुलतान नामकरणावरुन भाजपने शिवसेनेला लक्ष्य केले आहे.

त्या मैदानाचा पालिकेशी संबंध आहे का?

मालाड मालवणी परिसरातील बकाल अवस्थेत असलेल्या मैदानाचे सुशोभीकरण झाले आणि या मैदानाचा उद्घाटन सोहळा थाटामाटात पार पडला. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते उद्घाटन पार पडले आणि मैदानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आले. त्यानंतर मुंबईत राजकारणाने वेग घेतला. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने नामकरणाविरोधात आंदोलन केले. आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हाही दाखल केला. या सर्व प्रकरणात शिवसेना कुठेच नव्हती. ‘हिंदुंवर अनन्वित अत्याचार करणाऱ्या टिपू सुलतान याचे नाव मुंबईतील मैदानाला देण्याचा निर्णय शिवसेनेला कसा रुचला’ असा सवाल करीत भाजपने निराळीच राजकीय खेळी केली. शिवसेनेला नामकरणाच्या वादात ओढून घेतले. मुळात या मैदानाच्या नूतनीकरणाशी पालिकेचा सुतरामही संबंध नाही. असे असतानाही मैदानाच्या नामकरणाचा वाद पालिका दरबारी दाखल झाला.

‘त्यावेळी’ भाजप नगरसेवकही उपस्थित!

शिवसेनेवर बोचरी टीका होऊ लागताच शिवसेना पक्षाच्या महापौरांनीही भाजपला लक्ष्य केले. पालिका चिटणीस विभागात या मैदानाबाबत तपशील मिळतो का याची चाचपणी करण्यात आली. त्याच वेळी यापूर्वी दोन रस्त्यांना टिपू सुलतान यांचे नाव दिल्याचे प्रस्ताव शिवसेनेच्या हाती लागले. संबंधित प्रस्ताव मंजुरीच्या वेळी भाजप नगरसेवक उपस्थित होते. त्यावेळी मात्र भाजप नगरसेवकांनी आक्षेप घेतला नाही, असा पवित्रा शिवसेनेने घेतला. इतकेच नव्हे तर भाजपच्या एका माजी मंत्र्याने मुंबईत दंगल होईल असे वक्तव्य केल्याने शिवसेनेच्या पथ्यावर पडले. तोच धागा धरून भाजप मुंबई असुरक्षित करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करून शिवसेनेने प्रतिहल्ला चढवला.

रस्त्यांचे नामकरण शिवसेनेसाठी डोकेदुखी

मैदान कुणाच्या अखत्यारीत आहे, नूतनीकरणासाठी कोणाचा निधी वापरला, पालिकेच्या त्याच्याशी संबंध आहे का आदी बाबींचा विचार न करताच भाजपने मैदानाच्या नामकरणाला विरोध करीत वाद पालिकेत आणला. अंधेरीमधील भवन्स महाविद्यालयापासून सुरू होऊन गिल्बर्ट हिल मार्गे सी. डी. बर्फीवाला मार्गाच्या नाक्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्याला शेर – ए म्हैसूर टिपू सुलतान मार्ग असे नाव देण्यासाठी २३ एप्रिल २००१ रोजी ठराव करण्यात आला होता. तसेच एम-पूर्व विभागातील बाजीप्रभू देशपांडे मार्गापासून रफिनगर नाल्यापर्यंत जाणाऱ्या शिवाजी नगर मार्ग क्रमांक ४ चे शहीद टिपू सुलतान मार्ग असे नामकरण करण्याचा ठराव २७ डिसेंबर २०१३ रोजी मंजूर करण्यात आला. हे दोन्ही ठराव मंजूर झाले, त्यावेळी पालिकेत शिवसेना आणि भाजप युती सत्तेवर होती. पण त्यावेळी मात्र भाजपच्या नगरसेवकांनी कोणतीच खळखळ केली नव्हती. संबंधित समित्या आणि पालिका सभागृहात या दोन्ही ठरावांना सर्वानुमते मंजुरी मिळाली होती. ‘हिंदुंवर अत्याचार करणाऱ्या टिपू सुलतान’चे नाव मुंबईतील दोन रस्त्यांना दिल्याचा साक्षात्कार भाजपला २०२१ मध्ये झाला. आणि २२ जुलै २०२१ रोजी या दोन्ही ठरावांचा फेरविचार प्रस्ताव भाजपने सादर केला. दरम्यानच्या काळात बरेच पाणी पुलाखालून वाहून गेले होते. एकेकाळी सत्तस्थानी गोडीगुलाबीने नांदणाऱ्या शिवसेना आणि भाजपमध्ये काडीमोड झाला आहे. टिपू सुलतान नामकरणाच्या फेरविचारावरून आजही सत्तास्थानी असलेल्या शिवसेनेला जेरीस आणण्याचा डाव भाजपने आखला आहे. पण शिवसेनेने फेरविचार ठराव सभागृहाच्या पटलावर आजतागायत घेतलेलाच नाही. पण आता मालवणीतील मैदानाच्या नामकरणाच्या वादावरून पुन्हा एकदा दोन्ही रस्त्यांच्या नामकरणाच्या फेरविचार ठरावाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे शिवसेनेला अडचणीत आणण्याचा आणखी एक मुद्दा भाजपने पोतडीतून बाहेर काढला आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची घोषणा लवकरच होईल आणि प्रचाराच्या रणधुमाळीत टिपू सुलतान नामकरण शिवसेनेला डोकेदुखी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained mumbai bjp protest move to rename sports complex after tipu sultan abn 97 print exp 0122
First published on: 28-01-2022 at 16:53 IST