संतोष प्रधान

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उत्तर प्रदेशात रविवारी तिसऱ्या टप्प्यात १६ जिल्ह्यांमधील ५९ विधानसभा मतदारसंघांत मतदान होत आहे. पश्चिम उत्तर प्रदेश, बुंदेलखंड आणि अवध अशा तीन विभागांमधील हे मतदारसंघ विभागले आहेत. या टप्प्यात यादवबहुल मतदारसंघांची संख्या अधिक आहे. यातूनच समाजवादी पक्षासाठी दुसऱ्याप्रमाणेच तिसरा टप्पा अधिक महत्त्वाचा आहे. रविवारी मतदान होत असलेला पट्टा हा ‘यादव पट्टा’ म्हणून ओळखला जातो. समाजवादी पक्षाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे निवडणूक लढवीत असलेल्या करहल मतदारसंघाचाही समावेश आहे. पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत मतदान होत असलेल्या ५९ पैकी ४९ मतदारसंघांत भाजपचे उमेदवार निवडून आले होते. यामुळे भाजपसाठीही तिसरा टप्पा तेवढाच महत्त्वाचा आहे. 

मतदान होत असलेले विभाग आणि जिल्हे कोणते ?

बुंदेलखंडमधील झाशी, जालौन, ललितपूर, हमीरपूर, माहोब; अवध विभागातील कानपूर, कनौज, इटावा; पश्चिम उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद, मैनपुरी, हाथरस या जिल्ह्यांमध्ये मतदान होत आहे. एकूण ६२७ उमेदवार या टप्प्यात रिंगणात आहेत. यापैकी १०३ जणांच्या विरोधात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यात  भाजप आणि समाजवादी पक्षाच्या प्रत्येकी २०च्या आसपास उमदेवारांचा समावेश आहे.

आतापर्यंत दोन टप्प्यात मतदारांचा प्रतिसाद कसा होता ?

पहिल्या टप्प्यात ६० टक्के मतदान झाले होते तर दुसऱ्या टप्प्यात ६४ टक्के मतदान झाले. सरासरी ६० टक्के मतदार मतदानासाठी बाहेर पडल्याचे चित्र आहे.

राजकीय चित्र कसे आहे ?

तिसऱ्या टप्प्यात २९ मतदारसंघांमध्ये यादव मतदारांची संख्या लक्षणीय आहे. म्हणूनच या भागाला यादव पट्टा असे म्हटले जाते. २०१७ मध्ये यादव पट्ट्यातील २३ जागा भाजप तर सहा जागा समाजवादी पक्षाने जिंकल्या होत्या. मतदान होत असलेल्या ५९ पैकी ४९ जागा या भाजप किंवा मित्र पक्षांनी जिंकल्या होत्या. २०१२ मध्ये समाजवादी पक्ष सत्तेत आला होता तेव्हा या भागातील ३७ जागा या पक्षाने जिंकल्या होत्या. बदलत्या राजकीय वातावरणात जास्तीत जास्त जागा या टप्प्यात जिंकण्याचा समाजवादी पक्षाचा प्रयत्न असेल. पहिल्या टप्प्यात पश्चिम उत्तर प्रदेशातील जाटबहुल तर दुसऱ्या टप्प्यातील मुस्लीमबहुल पट्ट्यात समाजवादी पक्षाच्या अपेक्षा अधिक होत्या. तिसऱ्या टप्प्यातील मतदारसंघांवर समाजवादी पक्षाची भिस्त आहे. किमान यादव पट्ट्यातील जास्तीत जास्त जागा  जिंकण्याचे समाजवादी पक्षाचे उद्दिष्ट आहे.

भाजपसाठीही तिसरा टप्पा महत्त्वाचा का?

शेतकरी आंदोलनामुळे जाट समाजाच्या नाराजीचा काही प्रमाणात पहिल्या टप्प्यात फटका बसू शकला असणार, असे भाजपच्या नेत्यांचे गणित आहे. दुसऱ्या टप्प्यात मुस्लीम मतदारांची संख्या लक्षणीय होती. त्यातच मुस्लीम मतदार मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी बाहेर पडले होते. यामुळे दुसऱ्या टप्प्यात भाजपला फार काही यशाची अपेक्षा नाही. या पार्श्वभूमीवर तिसरा टप्पा भाजपकरिता अधिक महत्त्वाचा आहे. बुंदेलखंडात गेल्या ‌वेळी भाजपला एकतर्फी यश मिळाले होते. त्याचीच पुनरावृत्ती करण्याची योजना आहे. कानपूर व आसपासच्या परिसरातही जास्तीत जास्त जागा जिंकण्यावर भर आहे. भाजपने मतांच्या ध्रुवीकरणावर येथे भर दिला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कानपूरमध्ये मुस्लीम महिलांना साद घातली. तिहेरी तलाक पद्धत बंद केल्याने हजारो मुस्लीम महिलांचे संरक्षण झाल्याचा दावा त्यांनी केला. यादव पट्ट्यातही जातीय ध्रुवीकरणाचा भाजपने प्रयत्न केला. बिगर यादव मते भाजपकडे वळावीत, असा प्रयत्न आहे.

अखिलेश यादव यांच्यापुढे आव्हान

मैनपुरी जिल्ह्यातील करहल मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव हे निवडणूक लढवीत आहेत. हा मतदारसंघ यादव यांचा बालेकिल्ला मानला जातो. गेल्या वेळी उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचा धुव्वा उडाला पण हा मतदारसंघ सपने कायम राखला होता. अखिलेश यांच्या विरोधात भाजपने केंद्रीय राज्यमंत्री व आगऱ्याचे खासदार एस. पी. सिंह बघेल यांना रिंगणात उतरविले आहे. बघेल हे पूर्वी समाजवादी पक्षातच होते. ते मुलायमसिंह यादव यांचे निकटवर्तीय मानले जात. अखिलेश यांना शह देण्याकरिताच बघेल यांना भाजपने येथून रिंगणात उतरविले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained uttar pradesh polling phase iii will akhilesh future be in yadav belt abn 97 print exp 0222