भक्ती बिसुरे bhakti.bisure@expressindia.com
पुण्यातील एका खासगी रुग्णालयात बेकायदा अवयव प्रत्यारोपण पार पडल्याच्या आरोपानंतर, संबंधित रुग्णालयाचे व्यवस्थापकीय विश्वस्त आणि पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला. काही दलालांना अटक करण्यात आली आणि प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी निरीक्षकही नेमण्यात आला. अवयवदानाची प्रक्रिया सर्वसामान्यांना माहीत असतेच असे नाही, त्यामुळे यासंबंधीच्या नियमांची चर्चाही पुरेशी होत नाही. 

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

अवयवदान कोणाला करता येते

सद्य:स्थितीत सर्वाधिक अवयवदान हे मेंदूमृत रुग्णांमार्फत – तसा निर्णय रुग्णाच्या नातेवाईकांनी घेतल्यास-  केले जाते. त्यासाठी महाराष्ट्रात पुणे, मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद अशा चार विभागीय समित्या कार्यरत आहेत. रुग्णालयातील समन्वयक रुग्णाच्या नातेवाईकांना अवयवदान करण्याविषयीची माहिती, त्याचे महत्त्व आणि गरज याबाबत माहिती देतात आणि समुपदेशन करतात. उदा.- क्ष हा रुग्ण मेंदूमृत झाल्याने त्याच्या दोन किडन्या दान करण्याची तयारी नातेवाईकांनी दर्शवल्यास त्यातील एक किडनी त्या रुग्णालयाकडे राहाते आणि दुसरी ‘विभागीय प्रत्यारोपण समिती’कडे सोपवली जाते. या समितीकडे संपूर्ण विभागातील, प्रत्येक अवयवाची गरज असलेल्या रुग्णांची रक्तगटवार प्रतीक्षा यादी असते. रक्तगटानुसार त्या प्रतीक्षा यादीतील योग्य रुग्णाला ती किडनी देण्याचा निर्णय विभागीय प्रत्यारोपण समिती घेते. रुग्णाला किडनीशी संबंधित विकार असल्यास हा विकार किती जुना आहे, कोणकोणत्या प्रकारचे औषधोपचार करण्यात आले आहेत, रुग्ण किती वर्षे डायलिसिसवर आहे याबाबतची संपूर्ण माहिती आवश्यक कागदपत्रांसह समितीकडे दिल्यानंतर सदर प्रतीक्षा यादीत रुग्णाच्या नावाची नोंद होते. डॉक्टरांच्या, रुग्णालयाच्या, स्थानिक नेत्यांच्या अथवा कोणाच्याही ओळखीमुळे किंवा हस्तक्षेपामुळे प्रतीक्षा यादीतील रुग्णांना डावलून इतर कोणालाही अवयव देता येत नाही.

मेंदूमृत (ब्रेनडेड) रुग्ण म्हणजे काय?

मेंदूमृत परिस्थितीला पोहोचणारे ९९ टक्के रुग्ण हे रस्ते किंवा तत्सम अपघातांमध्ये गंभीररीत्या जखमी झालेले असतात. अतितीव्र पक्षाघात, मेंदूमध्ये झालेला रक्तस्राव अशा कारणांमुळेही काही रुग्ण मेंदूमृत होतात. हृदयक्रिया सुरू, रक्तदाब व्यवस्थित, किडनी, यकृताचे काम सुस्थितीत, मात्र मेंदूचे कार्य बंद, डोळय़ांची हालचाल नाही, इलेक्ट्रो एन्सेफेलोग्राफ चाचणी संपूर्ण स्थिर अशा सर्व बाबी एकाच वेळी आढळून आल्यास त्या परिस्थितीतील रुग्णाला मेंदूमृत असे म्हणतात. फिजिशियन डॉक्टर, अतिदक्षता विभागातील फिजिशियन, दोन मेंदूविकारतज्ज्ञ अशा सर्वाच्या एकत्रित होकाराशिवाय रुग्णाला मेंदूमृत जाहीर करता येत नाही. रुग्णाच्या नातेवाईकांना अवयवदानाबाबत समुपदेशन केले जात असेल तर त्यांचा निर्णय होईपर्यंत हा रुग्ण अतिदक्षता विभागात डॉक्टरांच्या नजरेसमोर असतो. 

जिवंत दात्याचे अवयवदान कसे होते?

अवयवदान ही प्रक्रिया दोन पद्धतीने पार पाडली जाते. आपल्या जवळच्या नातेवाईकांपैकी कोणी एखाद्या गंभीर विकाराने ग्रस्त असेल तर त्या व्यक्तीला जिवंतपणी अवयव देण्याचा निर्णय रक्ताच्या नात्यातील व्यक्ती घेऊ शकते. हे नाते कागदोपत्री सिद्ध करणे, तसेच त्यासाठी आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे हा विषय स्वतंत्र आहे. जिवंत दाता हा केवळ यकृत आणि स्वादुपिंडाचा काही भाग तसेच एक मूत्रिपड अशा तीन प्रकारचे अवयवदान करू शकतो. याचे कारण म्हणजे यकृत आणि स्वादुपिंडाचा काही भाग गरजू रुग्णाला दिला तरी दात्याच्या शरीरात त्याची पुन्हा वाढ होते आणि कार्यक्षमताही सुरळीत राहाते. सर्वसाधारण निरोगी व्यक्ती एका मूत्रिपडावरही निरोगी आयुष्य जगू शकते. त्यामुळे कुटुंबातील गरजू रुग्णाला एक मूत्रिपड देता येते. 

अवयव असे देता येत नाहीत 

‘रस्ते अपघातात दोन जण दगावल्याने चार मूत्रिपडं उपलब्ध आहेत- मिळवण्यासाठी या क्रमांकावर संपर्क साधा’ असे संदेश अनेकदा आपल्या वाचण्यात येतात.मात्र अशा प्रकारे समाजमाध्यमांवर संदेश पाठवून किंवा दूरध्वनीद्वारे संपर्क साधून अवयवदान करता येत नाही. आरोग्य विभागाने ठरवून दिलेल्या कायदेशीर नियमांची काटेकोर अंमलबजावणी करूनच अवयवदान आणि प्रत्यारोपणाची प्रक्रिया पूर्ण केली जाते. पैसे घेऊन अवयव देणे हीदेखील बेकायदा कृती आहे.

मरणोत्तर अवयवदाता कसे व्हाल?

जिवंतपणी मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प करता येतो. त्यासाठी नागरिकांना मरणोत्तर अवयवदानाचा अर्ज करता येतो. नेत्र, त्वचा, मूत्रिपड, फुप्फुसे, स्वादुपिंड, आतडी अशा विशिष्ट अवयवांसह मृत्यूनंतर संपूर्ण देहदानही करता येते. देहदान केले असता वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शरीररचनाशास्त्र (अ‍ॅनाटॉमी) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अशा देहाचा वापर करता येतो. 

रुग्णालयांना जबाबदार ठरवणे योग्य? अवयवदानाबाबत असलेल्या अंधश्रद्धा आणि कायद्यातील काटेकोर तरतुदी यामुळे भारतात ०.०१ टक्के एवढय़ा अत्यल्प मृत व्यक्तींचे अवयवदान केले जाते. स्पेनमध्ये दशलक्ष लोकसंख्येमागे ३५.१, अमेरिकेत २९.९, इंग्लंडमध्ये १५.५ अवयवदान होते. भारतात हे प्रमाण दशलक्ष लोकसंख्येमागे केवळ ०.६५ एवढे आहे. हे प्रमाण एक टक्का झाले तरी देशातील रुग्णांची अवयवांची गरज भागणे शक्य आहे. त्याच वेळी दुसरीकडे, अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करणारा भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे! ‘‘प्रत्यारोपणातील कायदेशीर बाबींच्या पूर्ततेची जबाबदारी रुग्णालयांवर सोडल्यास रुग्णालये शस्त्रक्रिया करण्यास नकार देतील, त्यामुळे ती जबाबदारी रुग्णालयांवर असू नये,’’  असे मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान म्हटले आहे. तसा अध्यादेश काढण्याची तयारी राज्य शासनाने दर्शवली असून तसा अध्यादेश निघाला तर, रुग्णालयांची कायदेशीर बाबींतून सुटका होण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained what is illegal in organ donation print exp 0522 zws
First published on: 17-05-2022 at 03:51 IST