संदीप कदम
विम्बल्डन टेनिस स्पर्धेत शनिवारी झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले होते. हा अंतिम सामना झाला तो दोन फारशा प्रकाशझोतात नसलेल्या खेळाडूंमध्ये. एलिना रायबाकिना आणि ओन्स जाबेऊर यांनी इतर देशांकडून प्रतिनिधित्व करताना इथवर मजल मारली. त्यात रायबाकिनाने बाजी मारली. यावेळी विम्बल्डनच्या महिला एकेरीच्या जेतेपदाचा घेतलेला हा आढावा.

विम्बल्डन महिला जेटेपदाच्या लढतीत काय वेगळेपण पाहायला मिळाले ?

या दोन्ही महिला खेळाडू पहिल्यांदाच अंतिम फेरीत पोहोचल्या होत्या. रायबाकिनाला यापूर्वी कधीही ग्रँडस्लॅम स्पर्धेत एकेरीच्या उपांत्य फेरीतही पोहोचता आले नव्हते. तर जाबेऊरची स्थितीही काहीशी सारखीच होती, मात्र जाबेऊरची जागतिक क्रमवारी आणि सध्याची लय पाहता जेतेपद मिळवण्यासाठी तिला पसंती होती. मात्र, रायबाकिनाने चांगला खेळ करत जाबेऊरचे स्वप्न धुळीस मिळवले. रायबाकिना जागतिक क्रमवारीत २३व्या स्थानी आहे. १९७५ मध्ये ‘डब्ल्यूटीए’ क्रमवारी सुरू झाल्यापासून कमी क्रमवारीत पिछाडीवर असलेल्या फक्त एका महिला खेळाडूने जेतेपद मिळवले होते. व्हिनस विल्यम्सने २००७मध्ये ३१व्या स्थानी असताना जेतेपद पटकावत सर्वांचे लक्ष वेधले होते.

रायबाकिना आणि जाबेऊर यांच्यातील अंतिम सामन्याचे वैशिष्ट्य काय होती?

प्रतिष्ठित ग्रँडस्लॅम स्पर्धेपैकी एक असलेली विम्बल्डन स्पर्धा जिंकण्याचे अनेकांचे स्वप्न असते. यावेळी आघाडीच्या खेळाडूंची अनुपस्थिती अनेक युवा खेळाडूंच्या पथ्यावर पडली. त्यामध्ये जाबेऊरला तिसरे मानांकन मिळाले होते, तर रायबाकिनाला १७वे मानांकन होते. यापूर्वी या दोन्ही खेळाडूंची कामगिरी फारशी आकर्षक नव्हती. जाबेऊरची लय मात्र ही दोघींमध्ये चांगली होती. रायबाकिना ही अंतिम फेरी गाठेल हे तिलाही वाटले नव्हते. तसेच, अंतिम फेरीत जेतेपदासाठी जाबेऊरला सर्वाधिक पसंती होती. मात्र, रशिया येथे जन्मलेल्या आणि कझाकस्तानकडून खेळणाऱ्या  रायबाकिनाने ट्युनिशियाच्या जाबेऊरला ३-६, ६-२, ६-२ पराभूत करत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या लढतीतही तिने पिछाडीवरून पुनरागमन केले.

रायबाकिनाचा जेतेपदापर्यंतचा प्रवास कसा होता?

पहिल्या फेरीत रायबाकिनाने अमेरिकेच्या कोको वांडेवेघेला ७-६ (७-२), ७-५ असे नमवत दुसरी फेरी गाठली. यानंतर तिने कॅनडाच्या बिआन्का आंद्रेस्कूला ६-४, ७-६ (७-५) असे नमवत आगेकूच केली. तिसऱ्या फेरीत रायबाकिनाने क्विनवेन झेंगवर ७-६ (७-४), ७-५ असा विजय मिळवत उपउपांत्यपूर्व फेरी गाठली. या फेरीत तिने क्रोएशियाच्या पेट्रा मार्टिचवर ७-५, ६-३ असा सरळ सेटमध्ये विजय नोंदवत उपांत्यपूर्व फेरीतील आपली जागा निश्चित केली. रायबाकिनाने या फेरीत ऑस्ट्रेलियाच्या अज्ला तोम्लजानोव्हिचवर ४-६, ६-२, ६-३ अशी मात करत उपांत्य फेरीत धडक मारली. आपल्या उपांत्य लढतीत तिने रोमानियाच्या गतविजेत्या सिमोना हालेप ६-३, ६-३ असे नमवत आश्चर्यकारक निकाल नोंदवला होता.

रशियन खेळाडूंवर बंदी घातली असताना रायबाकिना स्पर्धेत कशी सहभागी झाली?

रशियाची माजी खेळाडू आणि आता कझाकस्तानचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एलिना रायबाकिनाने विम्बल्डन टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकणारी ती कझाकस्तानची पहिली टेनिसपटू ठरली. रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या विम्बल्डनमध्ये रशिया आणि बेलारूसच्या खेळाडूंवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, २०१८पासून रशियन रायबाकिना कझाकस्तानचे प्रतिनिधित्व करत असल्याने तिला यंदाच्या स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली आणि तिने जेतेपद पटकावले.

उपविजेती जाबेऊर कशी प्रेरणादायी ठरली?

जाबेऊरही ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी पहिली अरब आणि आफ्रिकन खेळाडू ठरली. त्यामुळेच उपविजेतेपदसुद्धा देशवासियांसाठी प्रेरणादायी ठरू शकेल. ‘‘माझ्या मायदेशातील मुलींना प्रेरणा देण्याचा माझा प्रयत्न आहे. त्या माझा खेळ पाहत असतील आणि मला ऐकत असतील अशी अपेक्षा आहे,’’ असे जाबेऊरने सांगितले.