विश्लेषण: पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख कोण आहेत? भारतासोबत संबंधांवर नव्या नियुक्तीचा काय परिणाम होईल? | Explained Who is Pakistan New Army Chief and how it will affect India Pakistan relationship sgy 87 | Loksatta

विश्लेषण: पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख कोण आहेत? भारतासोबत संबंधांवर नव्या नियुक्तीचा काय परिणाम होईल?

पाकिस्तानमध्ये लष्कर हे तिथल्या लोकशाही सरकारांपेक्षा ताकदवान असते आणि त्यामुळेच लष्करप्रमुख या पदाला तिथे अनन्यसाधारण महत्त्व असते

विश्लेषण: पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख कोण आहेत? भारतासोबत संबंधांवर नव्या नियुक्तीचा काय परिणाम होईल?
लेफ्टनंट जनरल सय्यद असिम मुनिर शाह यांची पाकिस्तानचे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती

अमोल परांजपे

लेफ्टनंट जनरल सय्यद असिम मुनिर शाह यांची पाकिस्तानचे लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मंगळवार, २९ नोव्हेंबर रोजी मावळते लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्याकडून ते पदभार स्वीकारतील. पाकिस्तानमध्ये लष्कर हे तिथल्या लोकशाही सरकारांपेक्षा ताकदवान असते आणि त्यामुळेच लष्करप्रमुख या पदाला तिथे अनन्यसाधारण महत्त्व असते. त्यामुळे त्या देशातल्या राजकारणावर परिणाम होतोच, पण भारतासाठीही त्या पदावर कोण आहे, हे महत्त्वाचे असते.

मुनिर यांच्या नियुक्तीची पार्श्वभूमी काय आहे?

इम्रान खान यांना हटवून पाकिस्तानमध्ये सत्तारूढ झाल्यापासून पंतप्रधान शहाबाज शरीफ यांची नव्या लष्करप्रमुखासाठी खलबते सुरू होती. त्यांनी लंडनमध्ये असलेले बंधू, माजी पंतप्रधान आणि पीएमएल (नवाज) पक्षाचे सर्वोच्च नेते नवाज शरीफ यांच्याशीही गुफ्तगू केली. बाजवा यांना दुसरी मुदतवाढ मिळणार का, त्यांच्या जागी कुणाची वर्णी लागणार, असे अनेक प्रश्न होते. इम्रान खान यांनी काढलेला लाहोर-इस्लामाबाद महामोर्चा हा मध्यावधी निवडणुकांच्या मागणीसाठी असला, तरी लष्करप्रमुख सर्वसहमतीने नेमले जावेत, यासाठी वापरलेले दबावतंत्रदेखील होते. मात्र या दबावाला शरीफ बळी पडले नाहीत, हे उघड आहे.

मुनिर आणि इम्रान यांचे संबंध कसे आहेत?

इम्रान यांच्यामुळे ‘सर्वात कमी काळ पदावर असलेले आयएसआय प्रमुख’ असा शिक्का मुनिर यांच्यावर लागला. खान यांच्याशी झालेल्या मतभेदांमुळे केवळ आठ महिने ते या महत्त्वाच्या पदावर राहिले आणि नंतर त्यांना ‘अडगळीत’ टाकण्यात आले. त्यामुळे मुनिर यांच्या नावाची घोषणा होताच, खान यांच्या पाकिस्तान तहरीर-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने विरोधी सूर आळवला. पक्षाच्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेले राष्ट्राध्यक्ष आरीफ अल्वी यांच्याकरवी खान या नियुक्तीमध्ये अडथळा आणतील, अशी शक्यता वर्तविली जात होती. मात्र तसे घडले नाही. याचे मुख्य कारण मुनिर यांच्या प्रतिमेमध्ये दडले असल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा – विश्लेषण : आफताब पुनावालाच्या क्रूरतेने इतर गुन्हेगारांना प्रोत्साहन? ‘कॉपीकॅट क्राईम’ म्हणजे काय? वाचा…

नव्या लष्करप्रमुखांची पाकिस्तानात प्रतिमा कशी आहे?

लष्करी विद्यालयात शिक्षण घेतलेले मुनिर हे त्यांच्या तुकडीचे सर्वोत्तम विद्यार्थी होते. त्यांना ‘स्वोर्ड ऑफ ऑनर’ हा किताब पटकावला होता. त्यांना कुराण मुखोद्गत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच ‘मुल्ला जनरल’ हे त्यांचे टोपणनाव पडले. ते एमआय (मिलिटरी इंटेलिजन्स) या लष्कराच्या अंतर्गत गुप्तचर संस्थेचेही प्रमुख राहिले आहेत. आयएसआय आणि एमआय या दोन्ही संस्थांचे प्रमुख राहिलेले मुनिर हे पहिले लष्करप्रमुख असतील. त्यामुळे त्यांना लष्करामधील खाचाखोचा आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी या दोन्हींचा अनुभव आहे. त्यांची प्रतिमा आणि अनुभव या त्यांच्या जमेच्या बाजू असल्या, तरी त्यांच्यासमोर असलेला आव्हानांचा डोंगरही मोठा आहे.

मुनिर यांच्यापुढे देशांतर्गत आव्हाने कोणती आहेत?

या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यापूर्वी हे लक्षात घेतले पाहिजे की आपण पाकिस्तानबद्दल बोलत आहोत. राजकारणात तिथल्या लष्कराचा हस्तक्षेप लपून राहिलेला नाही. सध्या अस्थिर राजकीय परिस्थितीतून जात असलेल्या पाकिस्तानमध्ये लष्करप्रमुख अधिक महत्त्वाचे आहेत. सर्वात आधी त्यांना इम्रान खान आणि शहाबाज शरीफ यांच्यामध्ये समेट घडविण्याचा प्रयत्न करावा लागेल. त्यासाठी कदाचित मध्यावधी निवडणुकीसाठी शरीफ यांना राजी करावे लागेल. अर्थात, ते शहाजोगपणाची ‘तटस्थ’ भूमिकादेखील घेऊ शकतील. दुसरीकडे लष्करामध्येही ‘इम्रान समर्थक’ आणि ‘इम्रान विरोधक’ असे दोन गट स्पष्ट दिसत आहेत. त्यांच्यातील दरी कमी करण्याचे कामही मुनिर यांना करावे लागणार आहे. मात्र स्वाभाविकपणे आपल्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचे आहे त्यांचे सीमेवरील धोरण.

भारताबाबत मुनिर यांचे धोरण काय राहील?

फेब्रुवारी २०१९मध्ये पुलवामा बाँबस्फोट झाला तेव्हा मुनिर हे आयएसआयचे प्रमुख होते. भारतीय हवाईदलाचे वैमानिक अभिनंदन वर्धमान यांचे विमान पाकिस्तानात कोसळले आणि ते युद्धकैदी झाले. त्यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी मुनिर यांच्याशी यशस्वी वाटाघाटी करून वर्तमान यांना सुखरूप मायदेशी आणले. असे असले तरी ते भारताबाबत मवाळ भूमिका घेण्याची शक्यता नसल्याचे तज्ज्ञ मानत आहेत. मात्र त्याच वेळी फेब्रुवारी २०२१पासून सीमेवर जाहीर झालेला शस्त्रसंधी मुनिरदेखील पाळतील, अशी अपेक्षा आहे. कारण सध्याची स्थिती बघता सीमेवर शांतता असणे दोन्ही देशांसाठी फायद्याचेच आहे. मात्र मुनिर यांचे ‘मुल्ला जनरल’ असणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

मुनिर यांच्या कट्टर धार्मिकतेमुळे काय फरक पडेल?

पाकिस्तानी लष्करातील धार्मिक मतांचे अधिकारी भारतासाठी धोकादायक असतात, असा आजवरचा इतिहास आहे. मुनिर आयएसआय प्रमुख असताना पुलवामा हल्ला झाला, याचा उल्लेख वर आला आहेच. यापूर्वी १९९३ साली, त्यांच्यासारखेच धार्मिक वगैरे असलेले जावेद नासीर आयएसआय प्रमुख असताना मुंबईत बाँबस्फोट झाले होते. तबलिगी पंथाचे तत्कालिन ब्रिगेडिअर झहिरुल इस्लाम अब्बासी यांनी तत्कालिन लष्करप्रमुख जनरल परवेझ मुशर्रफ यांना अंधारात ठेवून कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्य घुसवले आणि तिसऱ्यांदा युद्धात भारतासमोर गुडघे टेकण्याची नामुष्की पाकिस्तानवर आली.

मुनिर यांच्या धार्मिक असल्याचा फायदा होईल?

कट्टर धार्मिक लष्करप्रमुखाचे पाकिस्तानातील कट्टर धार्मिक अतिरेकी संघटना सहसा ऐकतात. मुनिर यांच्या नियुक्तीमुळे कदाचित हा फायदा होऊ शकेल. अर्थात या जर-तरच्या गोष्टी आहेत. बाजवा जाऊन मुनिर आल्याचा भारताला फारसा फरक पडणार नाही. सीमेवर आणि मुत्सद्देगिरीत पूर्वीसारखीच सावधगिरी बाळगावी लागेल. कारण भारतात दहशतवादाची निर्यात करणे, हे पाकिस्तानचे राजकीय धोरण आहे आणि लष्करप्रमुख कुणीही झाले, तरी त्यात लगेच फरक पडण्याची शक्यता कमीच आहे.

amol.paranjpe@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 09:06 IST
Next Story
विश्लेषण: ‘वन नेशन वन सबस्क्रिप्शन’ योजना काय आहे? शिक्षण-संशोधन संस्थांसाठी ती फायदेशीर कशी?