विश्लेषण : ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे काय होणार? एकनाथ शिंदेंना पर्याय कोण?

ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग, नव्याने स्थापन झालेल्या पालघर जिल्ह्यात शिवसेनेची नेहमीच मोठी ताकद राहिली आहे.

eknath shinde thane
मुंबई पाठोपाठ ठाणे जिल्हा हे शिवसेनेचे नेहमीच शक्तिस्थान राहिले आहे

जयेश सामंत

मुंबई पाठोपाठ ठाणे जिल्हा हे शिवसेनेचे नेहमीच शक्तिस्थान राहिले आहे. ठाणे शहराने शिवसेनेला पहिली सत्ता मिळवून दिली इतक्यापुरते हे समीकरण मर्यादित राहात नाही. हा संपूर्ण जिल्हाच शिवसेनेच्या पाठीशी नेहमीच ठामपणे उभा राहिला. ठाणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग, नव्याने स्थापन झालेल्या पालघर जिल्ह्यात शिवसेनेची नेहमीच मोठी ताकद राहिली आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर मात्र हे समीकरण बदलणार हे निश्चित आहे. आनंद दिघे यांच्यानंतर संपूर्ण जिल्हा पालथा घालण्याचे काम शिंदे यांनी सातत्याने केले. त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये शिंदे यांना मानणारा मोठा वर्ग असला तरी शिवसेनेशी बांधिलकी सांगणारा मतदार त्यांच्यासोबत किती संख्येने राहील हे याचे उत्तर या क्षणी तरी मिळणे अवघड आहे.

मतदार आहेत, पण नेता कोण?

राज्यातील या बंडाचा केंद्रबिंदू ठाण्यात असला तरी शिवसेनेशी वर्षानुवर्षे एकनिष्ठ राहिलेल्या मतदारांचा लक्षणीय असा आकडा या जिल्ह्यात आहे हे कुणालाही नाकारता येणार नाही. आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर आता कोण, असा प्रश्न काही वर्षे येथील शिवसेनेच्या मतदारांना आणि अभ्यासकांना पडत राहिला. त्याचे उत्तर काही प्रमाणात एकनाथ शिंदे यांच्या रूपाने सापडले होते. एकनाथ शिंदे यांच्यासारखा सातत्याने मेहनत घेणारा नेता मिळताच शिवसैनिक आणि पक्षाशी बांधिलकी जपणारा मतदार मोठ्या प्रमाणावर सक्रिय झाल्याचे पाहायला मिळाले. शिंदे यांच्यानंतर मात्र पक्षाला गतवैभव मिळवून देऊ शकेल असा नेता शिवसेनेकडे आहे का हा खरा सवाल आहे. नव्या नेत्याची निवड करताना ‘मातोश्री’ला यंदा ताकही फुंकून प्यावे लागेल. कारण एकनाथ शिंदे जेव्हा राज्यात सक्रिय होतील त्यानंतरही या नव्या नेत्याची निष्ठा शिवसेनेशी कायम राहणे ‘मातोश्री’साठी आवश्यक ठरणार आहे.

हेही वाचा >> डोंबिवली शिवसेना शाखेतील एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे यांच्या तसबिरी हटविल्या

कोण आहेत पर्याय?

एकनाथ शिंदे यांच्या बंडाला ठाणे, कल्याण डोंबिवली यांसारख्या शहरांमधून मोठा पाठिंबा मिळाल्याचे दिसते. तरीही ठाण्याचे खासदार राजन विचारे, कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुभाष भोईर, ठाण्यातील शिवसेनेचे बडे पदाधिकारी हेमंत पवार यांसारख्या नेत्यांनी अजूनही शिंदे यांच्या गोटात उडी मारलेली नाही. मिरा-भाईंदरचे जिल्हा प्रमुख प्रभाकर म्हात्रे, कल्याणचे जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, कल्याण पश्चिमेतील शिवसेनेतील तगडे नाव विजय उर्फ बंड्या साळवी, बदलापूरचे वामन म्हात्रे, अंबरनाथचे अरविंद वाळेकर, उल्हासनगरचे राजेंद्र चौधरी अजूनही शिवसेनेत आहेत. यापैकी ठाण्याचे खासदार विचारे आणि शिंदे यांचे फारसे सख्य अगदी सुरुवातीपासूनच नव्हते. सुभाष भोईर हे शिंदे पुत्र खासदार श्रीकांत यांच्यावर नाराज राहिले आहेत. वाळेकर, म्हात्रे, बंड्या साळवी यांचे मात्र शिंदे यांच्याशी उत्तम संबंध राहिले आहेत. त्यामुळे आगामी काळात या नेत्यांची भूमिका काय राहील, हा खरा प्रश्न आहे. विचारे हे सध्या तरी जिल्हा प्रमुख पदाचे प्रमुख दावेदार दिसतात खरे, मात्र त्यांच्या एकंदर भूमिकेविषयी अजूनही स्पष्टता नसल्याचेच चित्र आहे.

उद्धव यांच्या परवानगीशिवाय एकनाथ शिंदेंनी तेव्हा घेतलेली राज ठाकरेंची भेट; भेटीत म्हणालेले, “खरं तर आम्ही तुमच्यासोबतच…”

कोकणी सैनिकांवर भिस्त?

ठाणे जिल्ह्यात मूळ कोकणवासियांचे मोठ्या संख्येने वास्तव्य असून यापैकी अनेकांची शिवसेनेविषयी असलेली बांधिलकी लपून राहिलेली नाही. ठाणे, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, नवी मुंबई या शहरांमध्ये मूळ कोकणातील असलेले अनेकजण शिवसेनेत वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत. कोकणातील खेड, चिपळूण, रत्नागिरी, देवगड, राजापूर, मालवण अशा भागातून ठाण्यात स्थायिक झालेल्या नागरिकांच्या मोठ्या वस्त्या अनेक भागांत आहेत. ठाण्यातील लोकमान्यनगर, सावरकरनगर, वागळे इस्टेट परिसरातील अनेक भागांमध्ये कोकणवासियांची संख्या मोठी आहे. शिवसेनेशी बांधिलकी सांगणारा हा मतदार एकनाथ शिंदे यांच्या बंडाला किती साथ देतो हे पाहण्यासारखे ठरेल. कोकणी मतदारांच्या सोबतीला ठाणे जिल्ह्यात बहुसंख्येने असणारा आगरी मतदारही मधल्या काळात शिंदे यांच्यावर नाराज असल्याची चर्चा होती. नवी मुंबई विमानतळाला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव शिंदे यांच्यामार्फत मांडला गेल्याने दि. बा.पाटील यांच्यासाठी आग्रही राहिलेला आगरी समाज शिवसेना आणि शिंदे यांच्यापासून दुरावत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बंडानंतर राज्यात सुरू असलेल्या घडामोडींनंतर शिंदे या मुद्द्यावर नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे आगरी समाजाचे लक्ष आहे. नवा नेता निवडताना शिवसेना नेतृत्वाला या मुद्द्यांचाही विचार करावा लागणार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explained who is the alternative to eknath shinde in thane district print exp 0622 abn

Next Story
विश्लेषण : फॅक्ट-चेकर मोहम्मद झुबेर यांना अटक का करण्यात आली?
फोटो गॅलरी