मोहन अटाळकर
पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये मुली आणि महिला बेपत्ता होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ झाली असून गेल्या तीन महिन्यांत तब्बल ८१२ मुली आणि महिला बेपत्ता झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. यात १६ ते २५ वर्षे वयोगटातील तरुणींची संख्या सर्वाधिक आहे. बेपत्ता होण्यामागे पतीसोबत भांडण करून घर सोडून जाणे, प्रेम प्रकरणातून पळून जाणे, रागाच्या भरात घरातून निघून जाणे ही कारणे प्रामुख्याने समोर येत आहेत. यात ५० टक्के महिला परत आल्याचे पोलिसांचे म्हणणे असले, तरी शरीरविक्रयाशी संबंधित मानवी तस्करी, शोषणाच्या घटनांचे धोके व्यक्त होताना दिसतात. अशा घटनांचा मागोवा घेण्याची गरज आता व्यक्त होऊ लागली आहे.
मुली-महिला बेपत्ता होण्यामागची कारणे काय आहेत?
अनेक कुटुंबांमध्ये अनपेक्षित इच्छा-अपेक्षा, वैचारिक मतभेद आणि इतर कारणांवरून लहान-मोठे वाद होत असतात. परंतु अशा परिस्थितीत संतापाच्या भरात परिवाराला सोडून जाण्याच्या घटना वाढत आहेत. अनेक लहान मोठ्या कारणांवरून पती-पत्नीतील वाद विकोपाला जातात. टोकाची भूमिका घेतली जाते आणि सततच्या वादाला कंटाळून महिलांनी घर सोडल्याचे प्रकार घडतात. नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून अनेक महिला घरून निघून जातात. तरुण-तरुणींच्या प्रेमात कुटुंबीयांचा अडसर होत असेल, तर थेट पळून जाण्याचा मार्ग स्वीकारला जातो. स्वप्नरंजक आश्वासने देऊन तरुणी किंवा महिलांना पळवून नेण्याच्या घटना वाढल्या आहेत. फूस लावून पळवून नेण्याचे प्रमाण तरूण मुलींमध्ये अधिक आहे.
बेपत्ता मुली-महिलांचा शोध कसा घेतला जातो?
घरातून महिला किंवा मुलगी बेपत्ता झाल्यानंतर बव्हंशी पोलिसांकडे हरविल्याची तक्रार दिली जाते. तरुण मुलीला कुणी पळवून नेले असेल, तर तसा उल्लेख तक्रारीत केला जातो. मुलगी किंवा महिला बेपत्ता झाल्यानंतर निकटच्या नातेवाईकांकडे आधी शोध घ्या, असा सल्ला दिला जातो. अनेक वेळा तर बदनामीच्या भीतीपोटी पोलिसांकडे तक्रार देण्यासही टाळाटाळ केली जाते. फूस लावून पळवून नेण्याच्या घटनांमध्ये अनेक मुली-महिला भ्रमनिरास होऊन घरी परततात. कौटुंबिक वादातून घर सोडून निघून गेलेल्या महिला नंतर परत येतात. हरविलेल्या मुली-महिलांपैकी घरी परतणाऱ्या महिलांचे प्रमाण हे सुमारे पन्नास टक्के असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
अनेक महिलांचा शोध का लागत नाही?
हरविल्याची तक्रार दिल्यानंतर पोलिसांकडून संबंधित महिला, मुलींचा शोध घेतला जातो, पण कुठलेही दुवे आढळून न आल्यास महिलेचा पत्ता हुडकून काढणे कठीण होते. अनेक घटनांमध्ये १८ वर्षांवरील मुली, महिला स्वयंमर्जीने घर सोडून निघून गेल्याचे प्रकार निदर्शनास येतात. काही घटनांमध्ये त्या घरी परतण्यास नकारही देतात. भ्रमणध्वनीचे स्थळ किंवा इतर तांत्रिक तपासाच्या आधारे महिलांचा शोध घेणे अलीकडे सोपे झाले असले, तरी कुठलेही धागेदोरे न आढळल्यास पोलिसांसाठी ते आव्हान ठरत असते. अनेक महिलांचा मानवी वाहतुकीसाठी वापर केला जात असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या रझिया सुलताना यांचे म्हणणे आहे.
बेपत्ता मुली-महिलांचा शोध घेण्यासाठी काय करायला हवे?
सुमारे पन्नास टक्के महिला घरी परतण्याची आकडेवारी समोर आली असली, तरी मानवी वाहतुकीचा विषय गंभीर असून अनेक महिलांना लैंगिक गुलामगिरी सहन करावी लागते. हरविलेल्या मुली-महिलांच्या बाबतीत अनेक ठिकाणी पोलीस गांभीर्याने तपास करीत नाहीत. महिलांचे घर सोडून जाण्याच्या घटनांमध्ये अनेक कारणे असली, तरी पुरुषी मक्तेदारी हे प्रमुख कारणांपैकी एक आहे. घराची नाळ तुटलेल्या महिलांना परत येणे, अवघड होत असते. मानवी तस्करीसाठी उपयोग होण्याचे प्रकार वाढल्याने अशा महिलांचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणेने स्वतंत्र पथक नेमण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्या रझिया सुलताना यांनी केली आहे.