फेब्रुवारी २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर सुरू झालेल्या युद्धात दोन्ही बाजूंचे प्रचंड नुकसान झाले आहे. याची अधिकृत आकडेवारी समोर आली नसली, तरी एका अहवालानुसार दोन्ही देशाचे तब्बल चौदा लाखांवर जीवितहानी झाली आहे.

रशिया आणि युक्रेनचे नुकसान किती?

वॉशिंग्टनस्थित ‘सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अ‍ॅन्ड इंटरनॅशनल स्टडीज’ (सीएसआयएस) या संस्थेने अलिकडेच काही आडाखे बांधून एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार युक्रेन युद्धात रशियाचे कमीत कमी अडीच लाख सैनिक मारले गेले आहेत आणि सुमारे साडेसात लाख सैनिक जखमी झाले आहेत. ही दुसऱ्या महायुद्धानंतरची रशियाला झेलावी लागणारी दुसऱ्या क्रमांकाची जीवितहानी ठरण्याच्या मार्गावर आहे. तुलनेने युक्रेनचे नुकसान कमी दिसत असले, असले तरी त्या देशाच्या आकारमानाचा विचार करता हा आकडाही मोठाच आहे. युक्रेनचे सुमारे चार लाख सैनिक ठार अथवा जखमी झाल्याची आकडेवारी असून मृतांचा आकडा ६० हजार ते एक लाख असू शकतो. म्हणजे अवघ्या तीन वर्षांत १४ लाखांहून अधिक मनुष्यहानी झाली आहे. अमेरिका आणि ब्रिटनच्या गुप्तचर संस्थांचे अंदाज आणि अन्य काही स्रोतांच्या आधारे ही आकडेवारी मांडण्यात आली असली, तरी नुकसानीचे अचूक आकडे मात्र उपलब्ध नाहीत. मॉस्को आणि किव्ह यांनी नुकसानीबद्दल संपूर्ण मौन बाळगले असले, तरी सीएसआयएसचा अहवाल हा सर्वांत जवळ जाणारा प्रयत्न असल्याचे ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने म्हटले आहे.

एवढे नुकसान सोसून हाती काय?

केवळ मनुष्यहानीच नव्हे, तर दोन्ही देशांना मोठा आर्थिक फटकाही सहन करावा लागत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसूनही, जानेवारी २०२४नंतर रशियाने युक्रेनच्या एक टक्क्यापेक्षा कमी भूभागावर ताबा मिळवला आहे. अवघ्या १५ दिवसांत युक्रेन नकाशावरून पुसण्याची वल्गन करणाऱ्या व्लादिमिर पुतिन यांना तीन वर्षांत सुमारे २० टक्केच युक्रेन नियंत्रणात आणता आला आहे. सीएसआयएसच्या अहवालानुसार युद्धभूमीच्या काही आघाड्यांवर रशियाचे सैन्य दिवसाला १६५ फूट इतक्या संथ गतीने पुढे सरकत आहे. विशेष म्हणजे, हा वेग पहिल्या महायुद्धातील काही लढायांपेक्षा कमी आहे. त्यामुळे हे युद्ध आधुनिक काळातील सर्वांत संथ युद्धांपैकी एक ठरण्याच्या मार्गावर असल्याचे मत अहवालाचे सहलेखक सेथ जी. जोन्स यांनी नोंदविले आहे.

सैन्यभरतीसाठी पुतिन यांची रणनीती काय?

युद्ध दीर्घकाळ लांबल्याने आणि ते इतक्यात थांबण्याची शक्यता नसल्याने पुतिन यांनी दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच राष्ट्रीय पातळीवर सैन्यभरती जाहीर केली. यातून रशियाने आपली सैनिकसंख्या टिकवून ठेवली आहे. याशिवाय गुन्हेगार, कर्जबाजारी आणि इतर नागरिकांना भरतीसाठी रोख बक्षिसे देऊन सैन्यात सामील केले जात आहे. शिक्षा टाळण्यासाठी सैन्यात भरती हा पर्याय देत पुतिन यांनी अनेकांना जणू ‘युद्ध किंवा कारावास’ असे पर्यायच देऊ केले आहेत. याखेरीज काही मित्रराष्ट्रांवरही रशियाची मदार आहे. उत्तर कोरियाने अंदाजे १०,००० सैनिक पाठवून उत्तर-पश्चिम कुर्स्क भाग पुन्हा ताब्यात घेण्यासाठी रशियाला मदत केल्याचे सांगितले जाते. असे असले तरी प्रचंड जीवितहानी आणि पुरवठा साखळीत आलेल्या अडचणींमुळे रशियाच्या लष्कराची आंतरराष्ट्रीय प्रतिमा डागाळली आहे. अफाट संसाधने असूनही, रशियाला २०२३पासून युक्रेनच्या संरक्षण सीमारेषा भेदता आलेल्या नाहीत आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा भूभागही निर्णायक पद्धतीने जिंकता आलेला नाही.

युक्रेन, झेलेन्स्की किती तग धरणार?

गेल्या तीन वर्षांत युक्रेनने प्रचंड शौर्य गाजवत रशियाचे ‘वॉर मशिन’ रोखून धरले आहे, हे मान्य करावे लागेल. अलिकडेच रशियाच्या हवाई तळांवर केलेला धाडसी ड्रोन हल्ला हे या युद्धातले आजवरचे सर्वाधिक आकर्षक प्रकरण ठरले आहे. विशेषतः शत्रूच नव्हे, तर आपल्या मित्रराष्ट्रांनाही गाफील ठेवून अमलात आणलेल्या ‘ऑपरेशन स्पायडर वेब’ने जगाला धक्का दिला, हे निश्चित. मात्र लोकसंख्या आणि लष्करी क्षमतेच्या तुलनेत युक्रेनला होत असलेले नुकसान अधिक तीव्र असल्याचे मानले जात असताना झेलेन्स्की यांची बहुतांश मदार ही पाश्चिमात्य राष्ट्रांच्या मदतीवर आहे. त्यामुळे या युद्धाचे भवितव्य हे केवळ युक्रेनचे शौर्य किंवा रशियाची ताकद यावर ठरणार नसून अमेरिकेच्या देशांतर्गत राजकारणाचाही बरावाईट परिणाम होणार असल्याचे सीएसआयएस अहवाल सांगतो. अमेरिकेने युद्धातून अंग काढून घेतले, तर ती पुतिन यांच्यासाठी मोठी संधी ठरेल, असे जोन्स यांनी स्पष्ट केले. मात्र ट्रम्प यांचे राजकारण आकलनापलिकडे आहे. ते कधी काय करतील याचा नेम नाही. कधी ते झेलेन्स्की यांचा ‘ओव्हल ऑफीस’मध्ये पाणउतारा करतात, तर कधी पुतिन यांना जाहीरपणे वेडा म्हणतात. एकीकडे युक्रेनला मदत थांबविण्याची धमकी देतात, तर दुसरीकडे रशियाला आर्थिक निर्बंध अधिक कडक करण्याचा इशारा देतात. शांतता करारासाठी रशियावर दबाव आणण्याचा विरोध करून युक्रेनला पुढील लष्करी मदतीचे आश्वासन देण्यास टाळाटाळ करतात. ट्रम्प यांच्या या धरसोड धोरणांमुळे युक्रेन आणि युरोपियन महासंघाची चिंता वाढविली आहे. दीर्घकाळ युद्ध सुरू ठेवणे रशियाला परवडू शकते, युक्रेनला नाही. पुतिन यांना ही बाब माहिती असल्यामुळे ते वाटाघाटींमध्ये अधिकाधिक पदरात पाडून घेण्याच्या प्रयत्नात आहेत.