इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना एका पॉर्नोग्राफिक वेबसाइटवरून पुन्हा एकदा लक्ष्य करण्यात आलं आहे. या वेबसाइटवर मेलोनी यांच्यासह इटलीमधील अनेक प्रसिद्ध महिलांचे मॉर्फ केलेले अश्लील फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंबरोबर आक्षेपार्ह मजकूरही प्रसिद्ध करण्यात आला आहे. २०२२ मध्ये पंतप्रधान होण्यापूर्वीही मेलोनी अशा सायबर हल्ल्यांच्या बळी ठरल्या होत्या. त्यावेळी ‘डीपफेक’तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचा चेहरा एका अभिनेत्रीच्या शरीरावर बसवण्यात आला होता. गेल्या वर्षी त्यांनी या घटनेबद्दल नुकसानभरपाईची मागणी केली होती. गेल्या काही वर्षांपासून ‘डीपफेक पॉर्नोग्राफी’ मोठ्या प्रमाणात वाढत आहे, ज्यामुळे महिलांच्या गोपनीयतेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, पॉर्नोग्राफिक वेबसाइटनं इटलीच्या पंतप्रधानांसह कोणकोणत्या महिलांना लक्ष केलं? त्याबाबत जाणून घेऊ…

इटलीत ‘डीपफेक’ पॉर्नोग्राफीचे वादळ

पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि विरोधी पक्षनेत्या एली श्लेन यांच्यासह इटलीतील अनेक सुप्रसिद्ध महिलांचे अश्लील आणि बनावट फोटो एका पॉर्नोग्राफिक वेबसाइटवर अपलोड करण्यात आले आहेत. या घटनेनं संपूर्ण देशभरात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. या प्रकरणामुळे इटलीमध्ये महिलांविषयी असलेला द्वेष आणि त्यांच्यावरील हिंसाचाराबद्दलची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे- गेल्या आठवड्यातच मेटाने ‘मिया मोग्ली’ नावाचं इटालियन फेसबुक पेज बंद केलं होतं. धक्कादायक बाब म्हणजे या पेजवर पुरुष मंडळी त्यांच्या पत्नीचे किंवा इतर अनोळखी महिलांचे खाजगी फोटो शेअर करत होते.

कोणत्या वेबसाइटवर केले फोटो अपलोड?

‘द गार्डियन’ने दिलेल्या माहितीनुसार, आक्षेपार्ह मथळ्यांसह हे बनावट फोटो ‘फिका’नावाच्या इटालियन पॉर्नोग्राफिक वेबसाईटवर पोस्ट करण्यात आले आहेत. या प्लॅटफॉर्मला सात लाखांहून अधिक वापरकर्ते फॉलो करत असल्याचं समोर आलं आहे. हे फोटो महिलांच्या सोशल मीडिया अकाउंट्स किंवा सार्वजनिक साईट्सवरून घेण्यात आले होते आणि नंतर त्यात फेरफार करून अपलोड केले गेले. २००५ पासून सुरू असलेल्या ‘फिका’ वेबसाइटवर आजपर्यंत कोणीही आक्षेप घेतलेला नव्हता; पण आता डाव्या ‘डेमोक्रॅटिक पार्टी’च्या सदस्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

आणखी वाचा : भारतावर ५०% आयात शुल्क, मग चीनला समान न्याय का नाही? अमेरिकेचे दुटप्पी धोरण कशासाठी?

कोणकोणत्या महिलांना केलं लक्ष्य?

एका इटालियन वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, बुधवारी संध्याकाळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर पंतप्रधान मेलोनी यांनी उत्तर देणे टाळले. या सायबर हल्ल्यात मेलोनी यांची बहीण अरियाना यांनाही लक्ष्य करण्यात आलं आहे. याशिवाय इटालियन अभिनेत्री आणि दिग्दर्शिका पाओला कोर्टेलेसी यांचेही बनावट फोटो वेबसाईटवर अपलोड करण्यात आले आहेत. त्यांनी ‘से अंचे दोमानी’ या चित्रपटात कौटुंबिक हिंसाचाराचा विषय हाताळला आहे. तसेच प्रसिद्ध ‘इन्फ्लुएन्सर’ चिआरा फेराग्नी यांनादेखील पॉर्नोग्राफिक वेबसाइटनं लक्ष्य केलं आहे. उजव्या विचारसरणीच्या राजकीय नेत्यांमध्ये- फॅसिस्ट हुकूमशहा बेनिटो मुसोलिनी यांची नात आणि लीग पक्षाच्या सदस्या अलेसांड्रा मुसोलिनी व पर्यटन मंत्री डॅनिएला सांता या विकृतीच्या बळी ठरल्या आहेत.

इटलीचे #MeToo प्रकरण काय आहे?

डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्या व्हॅलेरिया कॅम्पग्ना यांनी या प्रकरणाची पहिली अधिकृत तक्रार दाखल केली आणि त्यानंतर अनेक महिलांनी आवाज उठवला आहे. त्यामुळेच इटालियन माध्यमांमध्ये या घटनेला “इटलीचे #MeToo” असं म्हटलं जात आहे. दरम्यान, संबंधित पोर्नग्राफिक वेबसाइट बंद करण्याच्या मागणीसाठी दाखल केलेल्या ऑनलाइन याचिकेवर १,५०,००० हून अधिक स्वाक्षऱ्या जमा झाल्या आहेत. बुधवारी फेसबुकवर पोस्ट करताना कॅम्पग्ना म्हणाल्या, “माझे फोटो अश्लील वेबसाईटवर अपलोड झाल्यानंतर मला तिकटारा आल्यासारखं वाटलं. हे फक्त स्विमिंग सूटमधील फोटो नव्हते, तर माझ्या सार्वजनिक आणि खाजगी जीवनातील क्षण होते. त्यांच्या खाली लैंगिक, असभ्य आणि हिंसक कमेंट्स होत्या. प्रचंड राग आल्याने शांत बसता आलं नाही.”

इटलीत महिलांनी उठवला आवाज

कॅम्पग्ना यांच्या पाठोपाठ डेमोक्रॅटिक पार्टीच्या सदस्या अलेस्सिया मोराणी, अलेस्सांड्रा मोरेटी आणि लिया क्वार्टापेले यांनीही आपली बाजू मांडली. इंस्टाग्रामवर मोराणी यांनी लिहिलं की, त्यांच्या फोटोंखालील प्रतिक्रिया खूपच घाणेरड्या आणि अश्लील होत्या. या पुरुषांच्या टोळ्यांविरुद्ध आपण तक्रार केली पाहिजे, जे अनेक तक्रारी असूनही शिक्षा न होता मोकळे फिरतात. अशा वेबसाइट्स बंद केल्या पाहिजेत आणि त्यांच्यावर बंदी घातली पाहिजे. आता खूप झाले. दरम्यान- पालेर्मो येथील मेरी गॅलाटी नावाच्या महिलेने ‘Change.org’ या वेबसाइटविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. २०१९ मध्ये या महिलेला तिचा एक फोटो त्याच साइटवर आढळल्यानंतर तिने दोन तक्रारी दाखल केल्या होत्या; पण राजकीय नेत्यांनी या प्रकरणाकडे फारसं लक्ष दिलं नाही.

पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि विरोधी पक्षनेत्या एली श्लेन यांच्यासह इटलीतील अनेक सुप्रसिद्ध महिलांचे अश्लील आणि बनावट फोटो एका पॉर्नोग्राफिक वेबसाइटवर अपलोड करण्यात आले आहेत.

सध्याच्या याचिकेत मिलान विद्यापीठाच्या २०१९ च्या एका अभ्यासाचा संदर्भ देण्यात आला आहे. दर पाच इटालियन महिलांपैकी एका महिलेला तिच्या खाजगी प्रतिमा परवानगीशिवाय शेअर केल्याच्या घटनेचा सामना करावा लागल्याचं या अभ्यासातून समोर आलं आहे. या वर्षी जुलैमध्ये इटालियन संसदेत एका कायद्याला मंजुरी देण्यात आली, ज्यामध्ये महिलेची हत्या या गुन्ह्याला प्रथमच फौजदारी कायद्यात समाविष्ट करण्यात आलं आहे. या गुन्ह्यासाठी जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते, तसेच छळ, लैंगिक अत्याचार आणि ‘रिव्हेंज पॉर्न’साठीही शिक्षा वाढवण्यात आली आहे.

हेही वाचा : अमेरिकेने १९९८ मध्ये भारतावर निर्बंध का लादले होते? त्यावेळी नेमकं काय घडलं होतं?

गेल्या वेळी काय घडलं होतं?

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना यापूर्वीही ‘डीपफेक’ व्हिडीओंमुळे मनस्ताप सहन करावा लागला होता. २०२४ मध्ये त्यांच्या चेहऱ्याचा वापर करून तयार केलेला व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांनी १,००,००० युरोच्या ($100,000 euros) नुकसानभरपाईची मागणी केली होती. बीबीसीच्या वृत्तानुसार- हे व्हिडीओ तयार करणाऱ्या ४० वर्षीय व्यक्तीसह त्याच्या ७३ वर्षीय वडिलांची पोलिसांनी चौकशी केली होती. एका अमेरिकन पॉर्न वेबसाइटवर हे व्हिडीओ अपलोड करण्यात आले होते आणि अनेक महिन्यांत ते लाखो वेळा पाहिले गेले. या प्रकरणातील मुख्य ‘डीपफेक’ व्हिडीओ मेलोनी पंतप्रधान होण्यापूर्वी, २०२२ मध्ये तयार करण्यात आला होता.

भारतातही ‘डीपफेक’चे वाढते प्रकरण

भारतातही अशा प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. बॉलीवूड अभिनेत्री रश्मिका मंदाना, कतरिना कैफ आणि नोरा फतेही यांचे बनावट ‘डीपफेक’ व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नोव्हेंबर २०२३ मध्ये रश्मिका मंदानाचा एक ‘डीपफेक’ व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर दोन महिन्यांनी दिल्ली पोलिसांनी व्हिडीओ तयार करणाऱ्या एका पदवीधर तरुणाला अटक केली होती.