Godavari River cleanup: `गंगा गोदावरी महाभागे, महापापविनाशिनी’ म्हणजे सर्व पापांचा नाश करणारी गोदावरी नदी ही मोक्षाचा मार्ग दाखवणारी मानली जाते. म्हणूनच सिंहस्थ पर्वणीकाळात आपल्या पापक्षालनासाठी हजारो भाविक गोदातीरी येतात. परंतु, आता मात्र चित्र बदलले आहे. पापक्षालिनी गोदावरी पुन्हा एकदा निर्मळ होण्याच्या प्रतिक्षेत आहे. या दक्षिण गंगेचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो, तर ती आंध्रप्रदेशातील राजमहेंद्रीजवळ बंगालच्या उपसागरास मिळते. राज्य कुठलेही असो, गोदावरीचे अस्तित्त्व मानवनिर्मित कचऱ्यामुळे धोक्यात आले आहे. याचमुळे ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स यांचे आदरातिथ्य करणाऱ्या एका शीख शिक्षणतज्ज्ञाने नांदेडमधील तिच्या स्वच्छतेचा विडा उचलला आहे. त्याच प्रकल्पाचा घेतलेला हा आढावा.

नांदेड आणि गोदावरी

नांदेड शहराच्या रस्त्यावरील कचरा हा नाल्यातून वाहत जाऊन थेट गोदावरी नदीच्या पाण्यात मिसळतो. परिणामी, पाण्याच्या माध्यमातून होणारे हगवणीसारखे आजार पसरतात. मात्र, आता या समस्येवर उपाय सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पवित्र गोदावरी नदीचे पाणी स्वच्छ करण्याचा ध्यास ब्रिटनमधील बेडफर्डशायर विद्यापीठात ‘सार्वजनिक आरोग्यातील विविधता’ या विषयाचे प्राध्यापक असलेले शीख प्रोफेसर गुर्च रंधावा यांनी घेतला आहे. ते यासाठी नांदेड महानगरपालिकेला मदत करणार आहेत. त्यांच्या या कामासाठी यूके इकॉनॉमिक अॅण्ड सोशल रिसर्च कौन्सिलच्या ‘ब्राऊन गोल्ड प्रकल्पा’कडून निधीही मिळाला आहे.

गुर्च रंधावा कोण आहेत?

प्राध्यापक गुर्च रंधावा हे युनिव्हर्सिटी ऑफ बेडफोर्डशायर येथील ‘सार्वजनिक आरोग्यातील विविधता’ या विषयाचे प्राध्यापक (Professor of Diversity in Public Health) आणि इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ रिसर्चचे संचालक आहेत. सार्वजनिक धोरण, आरोग्यसेवा व्यवस्था आणि अल्पसंख्याक समुदायांमधील आरोग्यविषयक विषमता यांसारख्या गुंतागुंतीच्या विषयांवर त्यांनी संशोधन केले आहे. COVID-19 च्या काळात ते NHS England आणि Public Health England या संस्थांमध्ये राष्ट्रीय सल्लागार म्हणून कार्यरत होते. या कालखंडात त्यांनी कृष्णवर्णीय, आशियायी आणि अल्पसंख्याक समुदायांवर झालेल्या आरोग्यविषयक परिणामांवर विशेष लक्ष केंद्रित केले होते.

जमिनीवर बसून राजाचा संवाद

Faith-based Organ Donation Action Plan या इंग्लंमधील पहिल्यावहिल्या धर्माधिष्ठित कृती आराखड्याचे ते लेखक होते. त्यांना आरोग्य क्षेत्रात २५ वर्षांहून अधिकचा अनुभव आहे. २०२२ साली गुर्च रंधावा यांनी इंग्लंडचे राजे किंग चार्ल्स यांना लुटनमधील गुरु नानक गुरुद्वाऱ्यात आमंत्रित केलं होतं. यावेळी ब्रिटनच्या राजाने प्रथमच जमिनीवर बसून उपस्थितांशी संवाद साधला होता, त्यामुळे तो एक ऐतिहासिक क्षण ठरला होता. रंधावा यांचा सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील अनुभव आणि बांधिलकी यामुळे ते गोदावरी प्रकल्पासाठी योग्य व्यक्ती ठरले आहेत.

नांदेड- शिखांचे पवित्र शहर

नांदेड हे शहर शीख समुदायासाठी अमृतसरनंतर दुसऱ्या क्रमांकाचे पवित्र शहर आहे. मुघलांनी शिखांचे दहावे धर्मगुरू गुरू गोविंदसिंग यांची हत्या इथेच केली होती. गुरू गोविंदसिंग यांची समाधी नांदेडमध्येच आहे. गुरू गोविंदसिंग यांच्या स्मृती जपणाऱ्या अनेक वस्तू येथे जपून ठेवण्यात आल्या आहेत. येथील हुजूरसाहेब या गुरुद्वाराची इमारत संगमरवरी असून त्यावरील कळस व भिंती सोन्याने मढविलेल्या आहेत. या गुरुद्वाऱ्यात एक रत्नागार असून त्यातील जडजवाहीरे दसरा, दिवाळी, होळी व वैशाखीसारख्या महत्त्वाच्या सणांच्या दिवशी भाविकांना पाहण्यासाठी खुले ठेवण्यात येतात. गुरुद्वारात यात्रेकरूंच्या सोयींशिवाय दवाखाना, शाळा, स्वस्त मालाची दुकाने इ. लोकोपयोगी कामेही गुरुद्वारा निधीतून चालतात. याशिवाय शहराच्या निरनिराळ्या भागांत हिराघाट, मातासाहेब, शिकारघाट, बंदाघाट, मालटेकडी साहेब, संगत साहेब हे लहान गुरुद्वारादेखील आहेत.

गोदावरीचे धार्मिक महत्त्व

गोदावरी माहात्म्य प्रभू श्रीरामचंद्रांनी गौतम ऋषींना सांगितले अशा आशयाची कथा प्रसिद्ध आहे. प्रभू रामचंद्रांनी स्वतः गोदातीरी निवास केल्यामुळे तिचे पावित्र्य अधिकच वाढले. गोदावरीला वृद्धगंगा असेही म्हणतात. गंगेचा व गोदेचा उगम एकच असून गोदावरी भूगर्भातून दक्षिणेत आली, अशी एक कथा प्रचलित आहे. गोदावरीच्या काठी त्र्यंबकेश्वर, नाशिक, नेवासे, पैठण, भद्राचलम्, राजमहेंद्री व कोटिपल्ली ही प्रमुख तीर्थक्षेत्रे असून नाशिक व राजमहेंद्री येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थात स्नानसोहळा असतो.

गुरुद्वाराचे अनुकरण करतील अशी अपेक्षा…

प्रशासनाला नांदेड मधील गोदावरी नदीच्या पाण्यात मिसळणाऱ्या कचऱ्याविषयी आणि त्यातून पसरणाऱ्या रोगराईविषयी कल्पना आहे. परंतु, नेमकी सुरुवात कुठून करावी हा प्रश्न होता. हजूरसाहिब गुरुद्वारासमोरून सुरुवात करणे ही सर्वोत्तम जागा असल्याचे रंधावा यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना सांगितले. या गुरुद्वाराला दररोज ५० हजार भाविक भेट देतात. त्यामुळे निर्माण होणाऱ्या कचऱ्यासंदर्भात उपाययोजना करण्याविषयी गुरुद्वाराला तयार करू शकलात तर उर्वरित नांदेड शहरही त्याचं अनुकरण करण्याची शक्यता आहे, असं रंधावा यांनी सांगितले.

कचराकुंड्या नाहीतच

रंधावा हे शीख समुदायात प्रसिद्ध आहेत, त्यांचा एक फोटो किंग चार्ल्सबरोबर व्हायरल झाला होता. त्यामुळे नांदेडमध्ये आल्यानंतर त्याचा त्यांना फायदा झाला. रंधावा यांना सर्वात जास्त आश्चर्य वाटलं ते म्हणजे गुरुद्वारा अगदी स्वच्छ असूनही नांदेडमधील उर्वरित परिसरात सर्वत्र कचरा विखुरलेला आहे. नाल्यांमध्ये कचऱ्याचे साम्राज्य आहे. किंबहुना लोक जे पाणी पितात तिथे कचरा तर आहेच परंतु, तिथेच ते अंघोळ करतात, मासेमारी करतात आणि अस्थी विसर्जनही करतात. “गुरुद्वारामध्ये सर्वत्र कचराकुंड्या आहेत, पण बाहेर पाऊल टाकताच कचराकुंड्या जवळपास नाहीतच आणि रस्त्यावर ढीगभर कचरा साचलेला असतो. तोच कचरा मग नाल्यांत, गटारांत आणि शेवटी नदीत जातो,” असंही त्यांनी नमूद केलं.

दिव्याखाली अंधार

दररोज रात्री २.३० वाजता, हजारो भाविक हजूर साहिब गुरुद्वारातून सुमारे १ किमी अंतर पायी, अनवाणी चालत नगीना घाट गुरुद्वाराजवळील एका ठिकाणी जातात. तिथे पुजारी एक गागर (घागर-भांड) भरून नदीचं पाणी घेतात. अर्दास (प्रार्थना) झाल्यानंतर हे सर्व भाविक पुन्हा हजूर साहिबकडे परततात आणि त्या पवित्र पाण्याने गुरुद्वाऱ्यातील पवित्र जागा स्वच्छ करतात. “गुरुद्वाराने नदीकाठी एक वास्तू उभारली आहे. तिथे फिल्टर पंप लावण्यात आला आहे आणि त्यामुळे त्यांना मिळणारं पाणी स्वच्छ असतं. पण या संरचनेच्या अगदी मागे नदीचा काठ पूर्णपणे कचऱ्याने भरलेला आहे,” असं रंधावा यांनी सांगितलं.

दर १०० मीटरवर कचराकुंड्या

रंधावा मार्चमध्ये पुन्हा नांदेडला परतले आणि त्यांनी ब्रिटनमधील पुनर्वापर करता येणाऱ्या कचराकुंड्यांचे नमुने बरोबर आणले. त्यांनी हजूर साहिब गुरुद्वाऱ्याचे अधीक्षक गुरबचन सिंह यांची भेट घेतली. गुरबचन सिंह यांनी नांदेडमधील १२ गुरुद्वारांच्या परिसरात पुनर्वापर कचराकुंड्या लावण्यास सहमती दर्शवली. गुरुद्वाराचे अनुकरण करून इतरांनीही तीच कृती करावी हा त्यामागचा हेतू होता, असं रंधावा यांनी सांगितलं. रंधावा यांनी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे (NWCMC) आयुक्त महेशकुमार डोईफोडे यांचीही भेट घेतली. त्यांनी ‘गागर सेवा’ मिरवणुकीच्या मार्गावर दर १०० मीटरवर या कचराकुंड्यांचे प्रायोगिक स्वरूपात परीक्षण करण्यास आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या वेळेवर रिकाम्या करण्याची हमी दिली. या कचराकुंड्यांसाठी निधी ‘ब्राउन गोल्ड प्रकल्पा’तून मिळणार असून त्या वर्षाअखेरपर्यंत या कचराकुंड्या बसवण्यासाठी रंधावा पुन्हा नांदेडला येणार आहेत.

प्लास्टिक प्रदूषण थांबवणे मूळ हेतू

NWCMC नदीकाठच्या भागात नवीन पाईपलाइनसाठीही गुंतवणूक केली जाणार आहे. ज्यात फिल्टर बसवले जातील जेणेकरून कचरा थेट नदीत जाणार नाही. रंधावा यांनी सांगितलं की, “५ जून रोजी होणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनाचा केंद्रबिंदू प्लास्टिक प्रदूषण थांबवणे हा आहे आणि तोच या प्रकल्पाचाही मूलभूत भाग आहे,” असेही त्यांनी नमूद केले. या प्रकल्पाच्या निमित्ताने आता पवित्र गोदावरी नदीचा आणि पर्यायाने नांदेडचाही कायापालट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.