गुरुग्राममध्ये कुत्र्यांनी रहिवाशांवर हल्ला केल्याच्या आजवर अनेक घटना घडल्या आहेत. या प्रकारामुळे नागरिकांमधून रोष व्यक्त करण्यात आल्यानंतर ‘जिल्हा ग्राहक वाद निवारण’ मंचाने कुत्र्यांच्या ११ परदेशी जातींवर बंदी घालण्याचे आदेश गुरुग्राम महापालिकेला दिले आहेत. या कुत्र्यांची नोंदणी रद्द करून त्यांना ताब्यात घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. शिवाय त्यांना निवारागृहात ठेवण्याचेही मंचाने आदेशात म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

समाजात कुत्र्यांच्या वावराबाबत अनुकुल धोरण तयार करण्याच्या सूचना मंचाने महापालिकेला दिल्या आहेत. ऑक्टोबरमध्ये गाझियाबाद महानगरपालिकेनेही ‘पिटबुल’, ‘रॉटवेलर’आणि ‘डोगो अर्जेंटिनानो’ जातीचे कुत्रे पाळण्यास बंदी घालण्याच्या योजनेला मान्यता दिली आहे.

कोणत्या जातींवर बंदी घालण्यात आली?

प्रतिबंधित केलेल्या ११ कुत्र्यांच्या जातींमध्ये ‘डोगो अर्जेंटिनानो’, ‘रॉटवेलर’, ‘बोअरबॉएल’, ‘प्रेसा कॅनारिओ’, ‘नीपोलिटन मॅस्टिफ’, ‘वोल्फडॉग’, ‘केन कोर्सो’, ‘बांडोग’ आणि ‘फिला ब्रासिलेरो’ यांचा समावेश आहे. या सर्व जाती ‘अमेरिकन बुलडॉग’शी संबंधित असून अत्यंत धोकादायक मानल्या जातात.

विश्लेषण: भूकंप येणार हे कुत्र्या-मांजरांना व इतर प्राण्यांना माणसांच्या आधीच कसं कळतं?

“प्रत्येक नोंदणीकृत कुत्र्याच्या गळ्यात धातूच्या साखळीसह धातूचे टोकन असलेली कॉलर असली पाहिजे. सार्वजनिक ठिकाणी या कुत्र्यांचे तोंड नेटकॅपने योग्यरित्या झाकायला पाहिजेत”, असे निर्देश मंचाने गुरुग्राम महापालिकेला दिले आहेत. प्रत्येक कुटुंबाला केवळ एकच कुत्रा पाळण्याची परवानगी देण्यात आली आहे.

याच कुत्र्यांवर बंदी का घालण्यात आली?

‘डोगो अर्जेंटिनानो’ या जातीच्या कुत्र्याचा वापर मुख्यत: शिकारीसाठी केला जातो. या जातीवर काही देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. डेन्मार्क, नॉर्वे, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, सिंगापूरमध्ये या जातीच्या कुत्र्यांना पाळण्याबाबत निर्बंध आहेत. यूकेमध्ये परवानगीशिवाय ‘डोगो अर्जेंटिनानो’ची मालकी घेणे कायदाविरोधी आहे.

खाऊ घालण्यासाठी श्वानांना दत्तक घेण्याची गरज नाही!; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

‘वोल्फडॉग’ मध्ये विविध प्रकारची अनुवांशिक वैशिष्ट्ये आहेत. त्यांचा अंदाज बांधणे कठीण आहे. ‘वोल्फडॉग’ची मालकी, प्रजनन आणि आयात अमेरिकेतील ४० राज्यांमध्ये निषिद्ध आहे. अनेक युरोपियन राष्ट्रांनी एक तर मालकी हक्कावर बंदी घातली आहे किंवा या प्रजातीवरच बंदी घातली आहे. ‘रॉटवेलर’ या कुत्र्याकडून मुख्यत: अनोळखी लोकांवर हल्ले केले जातात. मात्र, ती मोठ्या सतर्कतेने आपल्या मालकाचे रक्षण करतात. ‘बोअरबॉएल’ ही कुत्री आकाराने मोठी आणि जिद्दी असतात.

‘प्रेसा कॅनारिओ’च्या हल्ल्यामुळे गंभीर इजा किंवा मृत्यूदेखील होऊ शकतो. ही कुत्री आकाराने मोठी असतात. ‘नीपोलिटन मॅस्टिफ’ ही कुत्री अत्यंत आक्रमक असतात. ‘अमेरिकन बुलडॉग’ला योग्यप्रकारे प्रशिक्षण न दिल्यास ही कुत्री आक्रमकरित्या हल्ला करू शकतात.

भटक्या कुत्र्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाची भूमिका काय?

सप्टेंबरमध्ये पार पडलेल्या एका सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने भटक्या कुत्र्यांच्या समस्येवर तोडगा काढण्याच्या गरजेवर भर दिला आहे. “जे लोक नियमितपणे भटक्या कुत्र्यांना खायला घालतात, त्यांना कुत्र्यांच्या लसीकरणासाठी जबाबदार धरले जाऊ शकते. कुत्र्याच्या हल्ल्यात एखादा व्यक्ती जखमी झाल्यास त्या व्यक्तीचा खर्चाही मालकाकडून घेतला जाऊ शकतो”, असे सर्वोच्च न्यायालयाने सुचवले आहे.

रस्त्यांवरील श्वानांची समस्या आपण कायमची सोडवू इच्छितो की नाही?

पीडितांना नुकसान भरपाई मिळते का?

कुत्रा चावल्यामुळे मृत्यू अथवा जखमी झालेल्यांना नुकसान भरपाईची कायद्यात तरतूद नाही, असे ‘मत्स्य व्यवसाय आणि पशुसंवर्धन’ मंत्रालयाने संसदेत सांगितले आहे. भटक्या कुत्र्यांशी संबंधित मानवी मृत्यू किंवा जखमी लोकांबाबत कोणत्याही नोंदी ठेवल्या नाहीत, असेही मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gurugram banned 11 foreign dog breeds what are reasons explained rvs
First published on: 26-11-2022 at 15:22 IST