भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर येथील शस्त्रास्त्र निर्मिती अर्थात आयुध निर्माणी कारखान्यात स्फोट होऊन आठ कामगारांचा मृत्यू झाल्याने देशाच्या संरक्षण दलाला दारूगोळा, शस्त्रास्त्र पुरवठा करणारे कारखाने खरेच सुरक्षित आहेत का, हा प्रश्न चर्चेत आला आहे. प्रत्येक वेळी स्फोट झाला किंवा तत्सम दुर्घटना झाल्यावर त्यामागची कारणे व उपाययोजनांबाबत चर्चा केली जाते. पण देशभरातील आयुध निर्माणींमधील अपघातांचे सत्र काही थांबले नाही. स्फोट का घडला, त्यामागची कारणे काय आणि यापुढे अशा घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना कराव्या लागतील याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आयुध निर्माणी म्हणजे काय?

आयुध निर्माणी ही एक अशी औद्योगिक यंत्रणा आहे, ज्यामध्ये लष्करासाठी शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि इतर सामग्री तयार केली जाते. भारतात अनेक आयुध निर्माणीआहेत, ज्यांचे उद्दिष्ट आपल्या सुरक्षा दलांना आवश्यकतेनुसार योग्य शस्त्रे आणि उपकरणे उपलब्ध करणे आहे. भारतीय ऑर्डिनन्स फॅक्टरी बोर्ड हे भारतातील आयुध निर्माणीचे जाळे नियंत्रित करते. या कारखान्यांमध्ये प्रामुख्याने रायफल्स, तोफा, मशीन गन्स, बुलेट्स, मिसाइल्स, रॉकेट्स, बॉम्ब आदीचा समावेश असतो. तसेच सैनिकी वाहने, टँक्स, ट्रक्स आणि त्यांच्या भागांची निर्मिती केली जाते. सैनिकांच्या युनिफॉर्म्स, हेल्मेट्स, बुलेटप्रूफ जॅकेट्स तसेच संगणक, संचार यंत्रणा, रडार्स तयार केले जातात.

आयुध निर्माणी महत्त्वाची का आहे?

राष्ट्रीय सुरक्षा, स्वावलंबन, आर्थिक योगदान, तंत्रज्ञान विकास आणि आपत्ती व्यवस्थापनच्या दृष्टीने आयुध निर्माणी देशाची अत्यंत महत्त्वाची यंत्रणा आहे. येथून सुरक्षा दलांना आवश्यक ती शस्त्रास्त्रे, गोळा, आणि इतर सामग्री पुरवठा केला जातो. त्यामुळे आपल्या सुरक्षा दलांची क्षमता वाढते आणि ते अधिक प्रभावीरीत्या आपले कर्तव्य पार पाडू शकतात. देशाला परदेशी निर्मितीवर अवलंबून न राहता आवश्यक सामग्री स्वयंपूर्णपणे तयार करण्याची क्षमता मिळते. यामुळे आपले स्वावलंबित्व वाढते. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होतात. तसेच, उद्योगातील विविध घटकांना काम मिळते, ज्यामुळे आर्थिक विकासाला चालना मिळते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या उपयोगाने नवीन आणि प्रभावी शस्त्रास्त्रांची निर्मिती केली जाते. यामुळे तंत्रज्ञानाची प्रगती होते. आयुध निर्माणी आपत्ती काळात आवश्यक ते साहित्य पुरवण्यासाठी सक्षम असतात, ज्यामुळे आपत्ती व्यवस्थापन कार्ये सुलभ होतात. आयुध निर्माणीचे कार्य तंत्रज्ञान आणि उत्पादनातील नवनवीन प्रगतीसह देशाच्या संरक्षणासाठी अनमोल आहे.

भंडारा आयुध निर्माणीत स्फोट कसा?

आयुध निर्माणातील एचईएस युनिट (एलटीपीई) मध्ये एलटीपीई इमारत क्रमांक २३ मध्ये भीषण स्फोट झाला. काडतुसाच्या स्वरूपात असलेला एलटीपीई हा एक विशेष दारूगोळा आहे. त्याचा वापर सशस्त्र दलात केला जातो. तसेच बांधकामे पाडण्यासाठी केला जातो. इतर स्फोटकांच्या तुलनेत एलटीपीईची तीव्रता कमी असते. आरडीएक्समध्ये प्रचंड तीव्रता असते. या युनिटमध्ये आरडीएक्स आणि एचएमएक्ससारख्या उच्च ऊर्जा स्फोटकांसंबंधित रसायन (बुकटी) तयार केले जाते. या कारखान्यात तोफगोळ्यांपासून रॉकेटसाठी दारूगोळा तयार होतो. एलटीपीई तयार करीत असताना स्फोट झाला, असा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.

चूक कोणाची?

भंडारा आयुध निर्माणीतील झालेल्या स्फोटात चौकशी सुरू झाली असून यात मानवी चूक आहे की तांत्रिक चूक हे स्पष्ट होणार आहे. परंतु दारूगोळा हाताळण्यासाठी निश्चित प्रक्रियेचा अवलंब करावा लागतो. आयुध निर्माणीत सुरक्षा नियमांंकडे दुर्लक्ष झाले तर अशा घटनांची भीती असते. अशा घटनांमध्ये ९० टक्के मानवी चूक असते आणि १० टक्के तांत्रिक दोष असतो. कारण, येथे जे काम सुरू होते ते ‘मॅन्युअल वर्क’ होते. ज्या प्रकारे बस चालकाच्या एका चुकीची शिक्षा बसमधील सर्वांना भोगावी लागते, त्याप्रमाणे अशा कारखान्यात एकाने केलेल्या चुकीचा फटका तेथे काम करणाऱ्या सर्वांना बसतो. रसायनाचे प्रमाण योग्य नसल्याने रासायनिक प्रक्रियेमुळे एलटीपीईची भुकटी तयार करीत असताना स्फोट होण्याची शक्यता आहे, असे म्युनिशन्स इंडिया लिमिटेडच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

सुरक्षा उपाय योजनांचे पालन होते?

आयुध निर्माणीमध्ये दारूगोळा आणि स्फोटकांच्या निर्मितीची प्रक्रिया खूपच संवेदनशील असते. कठोर सुरक्षा नियमावली पाळावी लागते. कर्मचाऱ्यांना वैयक्तिक सुरक्षा उपकरणे (पीपीई ) देणे, आग प्रतिबंधक यंत्रणा, नियमित प्रशिक्षण आणि आपत्कालीन परिस्थितींच्या सरावाचे पालन करणे बंधनकारक आहे. याशिवाय, आधुनिक यंत्रसामग्री आणि डिजिटल सेन्सर्सच्या मदतीने स्फोट टाळण्याचे प्रयत्न होत असतात. या स्फोटामुळे सुरक्षेच्या उपाययोजनांतील त्रुटी समोर आल्या आहेत. आग प्रतिबंधक यंत्रणा कार्यरत होत्या का, स्फोटके योग्य प्रकारे साठवली गेली होती का, कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रशिक्षण देण्यात आले होते का याची चौकशी करावी लागेल.

यापूर्वी कुठल्या आयुध निर्माणीत स्फोट?

यापूर्वी देशातील वेगवेगळ्या आयुध निर्माणीमध्ये स्फोट झाले आहेत. खमरिया, जबलपूर येथे २२ ऑक्टोबर २०२४ रोजी स्फोट झाला होता. त्यात दोन कामगारांचा मृत्यू आणि १५ जखमी झाले होते. याच आयुध निर्माणीत १४ ऑक्टोबर २०१५ रोजी १५ जखमी झाले आणि १६ एप्रिल २००२ रोजी स्फोटात दोघांचा मृत्यू झाला होता. २५ मार्च २०१७ रोजी भीषण स्फोटांमुळे दोन इमारतींचे नुकसान झाले होते. कानपूर आयुध निर्माणीमध्ये ९ एप्रिल २०१९ स्फोट होऊन सहाय्यक अभियंत्याचा मृत्यू झाला आणि इतर ८ जण जखमी झाले. पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा आगारात २० नोव्हेंबर २०१८ रोजी स्फोट झाले होते. यात सहा ठार आणि दहा जखमी झाले होते. पुण्यातील आयुध निर्माणीमध्ये १५ जून २०१७ रोजी स्फोट झाला. त्यात दोघांचा मृत्यू झाला होता. पुलगाव येथील केंद्रीय दारूगोळा आगारात भीषण आगीत लष्कराच्या दोन अधिकाऱ्यांसह १९ जणांचा मृत्यू झाला होता.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Has the explosion in bhandara raised the issue of security in the ordnance factories across the country print exp amy