Prada-kolhapuri controversy: जर तुमच्या आजोबांनी ५०० रूपयांच्या पादत्राणांसारखी वापरलेली एखादी वस्तू आंतरराष्ट्रीय लक्झरी ब्रँडवर १ लाख रूपयांपेक्षा जास्त किमतीच्या हुबेहुब सँडलच्या स्वरूपात आली तर काय होईल? इटालियन लक्झरी फॅशन ब्रँड प्राडाने अलिकडेच त्यांच्या वेबसाइटवर सुमारे एक लाख रूपयांच्या फ्लॅट लेदर सँडलच्या विक्रीबाबत माहिती दिली. या सँडलचे भारतातील जुन्या आयकॉनिक कोल्हापुरी चपलांशी आश्चर्यकारक साम्य आहे. यामुळे सांस्कृतिक विनियोग, भारतीय कारागीर समुदायांचे आर्थिक संघर्ष आणि जागतिक बौद्धिक संपदा संरक्षणाच्या मर्यादांबद्दल वादविवाद सुरू झाले आहेत.

कोल्हापुरी चप्पल

कोल्हापुरी चप्पल ही हस्तनिर्मित स्त्री-पुरूष दोघांसाठी लेदर सँडल आहे. या पारंपरिकपणे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा आणि कर्नाटकच्या काही भागांमध्ये कारागिरांनी बनवलेल्या आहेत. भारतात याचे मूळ शतकानुशतके आहे. हे सँडल त्यांच्या विशिष्ट वेणीच्या चामड्याच्या पट्ट्या, गुंतागुंतीचे कटवर्क, टिकाऊ जोडणी आणि कारागिरीसाठी प्रसिद्ध आहेत. एकेकाळी राजघराण्याने वापरलेल्या आणि नंतर ग्रामीण भागासह संपूर्ण भारतात लोकप्रिय झाल्या. कोल्हापुरी ही केवळ पादत्राणे नाहीत, या सँडल प्रादेशिक ओळख आणि कारागिरीचे प्रतीक आहेत. या पूर्णपणे हस्तनिर्मिती आहेत. यामध्ये चामडे आणि पिढ्यानपिढ्या हस्तांतरित केलेल्या स्वदेशी तंत्रांचा समावेश आहे.

२०१९ मध्ये कारागीर गट आणि हस्तकला संशोधकांनी सतत समर्थन केल्यानंतर कोल्हापुरी चप्पलला भारताच्या वस्तूंचे भौगोलिक संकेत कायदा, १९९९ अंतर्गत भौगोलिक संकेत (GI) टॅग देण्यात आला. जीआय टॅग विशिष्ट प्रदेशातील उत्पादनांचे संरक्षण करण्यास मदत करतो. त्यांच्या भूगोल, साहित्य आणि पारंपरिक ज्ञानामुळे त्यांच्या अद्वितीय वैशिष्ट्यांसाठी ओळखले जातात. असं असताना कोल्हापुरी कारागीरांना कमी होत चाललेल्या बाजारपेठा आणि कारखान्यात बनवलेल्या नकली उत्पादनांच्या स्पर्धेशी झुंजणे सुरूच आहे. द व्हॉइस ऑफ फॅशनच्या अहवालानुसार, सध्या कोल्हापुरी चप्पल उत्पादनात अंदाजे १५ ते २० हजार कारागीर गुंतलेले आहेत. ते गेल्या काही वर्षांपेक्षा खूपच कमी आहे. कारागीरांनी मासिकाला सांगितले की, लक्झरी फॅशन त्यांच्या हस्तकलेच्या सांस्कृतिक आश्रयातून नफा कमवत असले तरी, त्यांचे स्वत:चे समुदाय अदृश्य, कमी पगाराचे आणि जागतिक बाजारपेठेतून वगळलेले राहतात.

प्राडाचे सांस्कृतिक विनियोग

सध्याच्या संदर्भात सांस्कृतिक विनियोग म्हणजे डिझायनर किंवा फॅशन हाऊस दुसऱ्या संस्कृतीतील एखादा घटक त्यांच्या उत्पादनात समाविष्ट करण्याची पद्धत. अनेकदा हा प्रकार नकळत केला जात असल्याचा दावा अशा कंपनींकडून करण्यात येतो. फॅशनच्या जगात बहुतेकदा लक्झरी ब्रँड्स नफ्यासाठी स्वदेशी नक्षी, हस्तकला आणि कपडे घेतात असा होतो. भारतीय डिझायनर्स, फॅशन इतिहासकार आणि सांस्कृतिक भाष्यकारांनी असे निदर्शनास आणून दिले की प्राडाच्या सँडलची रचना बनवण्यामध्ये आणि दिसण्यामध्ये कोल्हापुरी होती. त्यात या ब्रँडने भारत, कोल्हापूर किंवा हस्तकलेच्या कारागीर वारशाचा उल्लेख केला नाही. याबाबत आणखी एक प्रमुख वाद म्हणजे किमतीतील तफावत. प्राडाने हे उत्पादन १ लाख रूपयांपेक्षा जास्त किमतीत विकण्याची योजना आखली. भारतीय कारागीर हजार रूपयांपेक्षा कमी किमतीत एक जोडी विकतात. लक्षात घ्या की प्राडा हा त्यांच्या फायद्यासाठी स्वदेशी कारागिरांचे शोषण करणारा पहिला ब्रँड नाही. २०१५ मध्ये फ्रेंच डिझायनर इसाबेल मारंट हिला ओक्साका इथल्या मिक्स समुदायाच्या पारंपरिक भरतकामाशी मिळतेजुळते ब्लाउज विकल्याबद्दल मोक्सिकोमध्ये टीकेला सामोरे जावे लागले होते.

२०१९ मध्ये ख्रिश्चन डायरने त्यांच्या क्रूझ कलेक्शनसाठी पारंपरिक मेक्सिकन घोडेस्वारांच्या पोशाखांसारखे दिसणारे डिझाइन वापरले होते. भारतात लुई व्हिटॉन सारख्या ब्रँडने यापूर्वी कारागीर समुदायांशी थेट सहकार्य न करता बनारसी आकृतीबंध आणि भारतीय भरतकाम शैली संग्रहात सादर केल्या आहेत. हे वाद जागतिक लक्झरी बाजारपेठेत सांस्कृतिक समता, आर्थिक न्याय आणि स्वदेशी वारशातून कोणाला फायदा होतो याबद्दल सतत प्रश्न उपस्थित करतात.

ठळक मुद्दे:

  • प्राडा या आंतरराष्ट्रीय ब्रँडने कोल्हापुरी चप्पलचे श्रेय लाटले
  • आंतरराष्ट्रीय फॅशन शोमध्ये कोल्हापुरीसारखी चप्पल घातलेल्या मॉडेलचे रॅम्पवॉक
  • कंपनीने कुठेही कोल्हापुरी चप्पल म्हणून उल्लेख केलेला नाही
  • सोशल मीडियावर व्हायरल होताच कोल्हापूर चप्पल व्यावसायिकांचा संताप
  • ५०० ते हजार रूपये किंमत असू शकणाऱ्या चप्पलची प्राडाने १ लाखांच्या वर किंमत लावली आहे

जागतिक बौद्धिक संपदेच्या संरक्षणाच्या मर्यादा

भारताचा भौगोलिक संकेत कायदा १९९९ भारतीय हद्दीतील कोल्हापुरीसारख्या उत्पादनांचे संरक्षण करतो. अनधिकृत उत्पादकांकडून कोल्हापुरी चप्पल या शब्दाचा व्यावसायिक वापर करण्यावर रोख लावतो. असं असताना हे संरक्षण भारताच्या सीमेपलिकडे विस्तारित नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर जागतिक बौद्धिक संपदा संघटना सध्या पारंपरिक सांस्कृतिक अभिव्यक्ती आणि भौगोलिक संकेतांचे संरक्षण करण्याबद्दल चर्चा करत आहे. असं असताना ट्रेडमार्क, कॉपीराइट किंवा पेटंट उल्लंघनाचा समावेश नसल्यास स्वदेशी डिझाइनचे सौंदर्यात्मक अनुकरण रोखण्यासाठी कोणतीही बंधनकारक आंतरराष्ट्रीय चौकट नाही. हा कायदेशीर झोन लक्झरी ब्रँड्सना स्वदेशी डिझाइनची प्रतिकृती बनवण्याची परवानगी देतो. ही परवानगी संरक्षित नावे वापरणे किंवा दिशाभूल करणारे ब्रँडिंग टाळल्यासच शक्य आहे. म्हणूनच प्राडा-कोल्हापुरी वादानंतर भारत सरकारने जीआय टॅग केलेल्या उत्पादनांसाठी मजबूत आंतरराष्ट्रीय संरक्षणासाठी आणि लक्झरी ब्रँड्सना कारागीर गटांसोबत निष्पक्ष व्यापार सहकार्य स्वीकारण्यासाठी आग्रह धरावा अशी मागणी नव्याने करण्यात आली आहे.

जग शाश्वत, हस्तनिर्मित आणि वारसा उत्पादनांना अधिकाधिक महत्त्व देत असताना अशा ट्रेंडचे फायदे त्यांच्या मूळ निर्मात्यांपर्यंत पोहोचतील याची खात्री करणे ही आता केवळ सांस्कृतिक चिंता नसून आर्थिक न्यायाची बाब आहे. हा वाद जागतिक फॅशन उद्योगातील असंतुलनाची परिस्थिती आहे आणि सांस्कृतिक वारसा जेव्हा त्याच्या समुदायांपासून वेगळा होतो तो नफ्यासाठी आणखी एक वस्तू कसा बनतो याची आठवण करून देतो. भारतासाठी हे केवळ त्याच्या कारागीर अर्थव्यवस्थेतील उत्पादनांचेच नव्हे तर ते तयार करणाऱ्यांच्या प्रतिष्ठेचे आणि उपजिविकेचे रक्षण करण्याची सातत्याने असलेली गरज दर्शवते.