ट्रम्प प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून एक मोठी चूक झाली आहे, ज्याची चर्चा संपूर्ण जगभरात आहे. सध्या अमेरिकेकडून येमेनमधील हुथी बंडखोरांविरोधात कारवाई होत आहे. याचदरम्यान आता हुथी बंडखोरांविरोधात अमेरिका युद्धाची योजना आखत आहे आणि अधिकाऱ्यांच्या एका चुकीने ती योजना लीक झाली आहे. योजना शेअर करण्यासाठी सिग्नल हे मेसेजिंग अ‍ॅप वापरण्यात आले असून चुकून ‘द अटलांटिक’ मासिकाचे मुख्य संपादक जेफ्री गोल्डबर्ग यांना एन्क्रिप्टेड ग्रुप चॅटमध्ये अ‍ॅड केल्याने ही बाब जगासमोर उघड झाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आदेश दिलेल्या येमेनमधील इराण समर्थित हुथी बंडखोरांवर हल्ल्याच्या काही तास आधी गोल्डबर्गने सोमवारी अ‍ॅपवर झालेल्या चर्चेचा तपशील देणारा अहवाल प्रकाशित केले. काय आहे हे नेमके प्रकरण? काय आहे सिग्नल अ‍ॅप? सिग्नल अ‍ॅप हॅक होऊ शकते का? अमेरिकन सरकारमध्ये याचा वापर कसा केला जात आहे? त्याविषयी जाणून घेऊ.

सिग्नल अ‍ॅप काय आहे?

सिग्नल हे एक अ‍ॅप आहे, जे डायरेक्ट मेसेजिंग, ग्रुप चॅट्स, कॉलिंग आणि व्हिडीओ कॉल्ससाठी वापरले जाऊ शकते. अ‍ॅप त्याच्या मेसेजिंग आणि कॉलिंग सेवांसाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन वापरत असल्याने थर्ड पार्टी संभाषण सामग्री पाहू शकत नाही किंवा कॉल ऐकू शकत नाही. “सिग्नलवर पाठवलेले मेसेज आणि कॉल स्क्रॅम्बल केले जातात आणि केवळ मेसेज पाठवणारा आणि प्राप्तकर्ताच त्यांना समजून घेऊ शकतो,” असे ‘असोसिएटेड प्रेस’च्या एका पत्रकाराने सांगितले. सिग्नलमध्ये कमीत कमी डेटा संकलित होतो, तसेच यात आपण पाठवलेले मेसेज डिलिटदेखील करता येतात. सिग्नलमधील एन्क्रिप्शन प्रोटोकॉल ओपन सोर्स आहे, त्यामुळे तज्ज्ञ हे अ‍ॅप कसे कार्य करते ते तपासू शकतात आणि ते सुरक्षित आहेत याची खात्री करू शकतात.

सिग्नल इतर मेसेजिंग अ‍ॅपपेक्षा खूपच सुरक्षित असल्याचे मानले जाते. (छायाचित्र-एपी)

सिग्नल अ‍ॅप हॅक होऊ शकते का?

तज्ज्ञांच्या मते, सिग्नल इतर मेसेजिंग अ‍ॅपपेक्षा खूपच सुरक्षित असल्याचे मानले जाते. परंतु, अ‍ॅप अजूनही हॅक होऊ शकते. उदाहरणार्थ, फेब्रुवारीमध्ये गूगलच्या मालकीची सुरक्षा फर्म असलेल्या मॅंडियंटने अहवाल दिला की, रशियन हेरांनी सिग्नल अ‍ॅपचे संपर्क अधिकारी असल्याचे भासवून युक्रेनियन लष्करी अधिकाऱ्यांच्या सिग्नल खात्यांना हॅक करण्याचा प्रयत्न केला. यूएस नॅशनल सिक्युरिटी एजन्सी (NSA) चे माजी हॅकर जेकब विल्यम्स यांनी पॉलिटिकोला सांगितले की, सिग्नल वापरण्याचा सर्वात मोठा धोका म्हणजे डेटा साठवण्याचे ठिकाण. “लोक सिग्नलच्या मेसेजिंगला डेस्कटॉप अॅप्लिकेशनशी लिंक करू शकतात.

याचा अर्थ असा की, सिग्नल डेटा संभाव्यतः अनेक डेस्कटॉप आणि लॅपटॉप संगणकांवर पोहोचतो. त्यानंतर सिस्टमवरील कमोडिटी मालवेअरमुळे तो डेटा धोक्यात येतो.” विल्यम्स यांच्या मते, सिग्नल अ‍ॅपला वर्गीकृत डेटासाठी मान्यता नसण्याचे हे एक कारण आहे. जो बायडेन प्रशासनाच्या काळात, अधिकारी सामान्यतः अॅपचा वापर एखाद्याला इतर मार्गांनी पाठवलेल्या वर्गीकृत संदेशाची तपासणी करण्यासाठी करत असत, असे एका सरकारी अधिकाऱ्याने ‘एपी’ला सांगितले.

अमेरिकन सरकारमध्ये सिग्नल अ‍ॅपचा वापर कोण करतं?

गेल्या काही महिन्यांत अमेरिकेमध्ये सिग्नल अ‍ॅपची लोकप्रियता वाढली आहे. गेल्या डिसेंबर महिन्यात चीनच्या हॅकर्सनी अमेरिकन टेलिकम्युनिकेशन नेटवर्कमध्ये घुसखोरी केली आणि अमेरिकन लोकांच्या सेल फोन रेकॉर्डचा मोठा साठा चोरला; हे उघड झाल्यानंतर लोक सिग्नल अ‍ॅपचा मोठ्या प्रमाणात वापर करत आहेत. हॅकर्सनी ट्रम्प आणि उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांच्यासह वरिष्ठ अमेरिकन राजकीय नेत्यांच्या संभाषणांवरही हेरगिरी केल्याचे सांगितले जात आहे.

‘द एपी’च्या अलीकडच्या वृत्तानुसार, जवळजवळ प्रत्येक अमेरिकन राज्यात स्थानिक अधिकाऱ्यांकडे सिग्नलसारख्या एन्क्रिप्टेड मेसेजिंग अॅप्सवर खाती आहेत. ‘एपी’ने केलेल्या तपासात असेही आढळून आले की, त्यापैकी बरीच खाती सरकारी सेल फोन नंबरवर नोंदणीकृत होती, तर काही खाती वैयक्तिक नंबरवरदेखील नोंदणीकृत होती.

त्याचा वापर कायद्याविरुद्ध आहे का?

सिग्नल अ‍ॅपचा वापर कायद्याविरुद्ध नाही, त्यामुळेच पत्रकार अनेकदा स्त्रोतांशी बोलताना सिग्नलसारख्या अॅप्सचा वापर करतात. ‘असोसिएटेड प्रेस’ने केलेल्या तपासणीत असेही आढळून आले की, संपूर्ण अमेरिकेतील १,१०० हून अधिक सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे सिग्नलवर अकाउंट आहेत. त्यांच्यासह त्यांचे कर्मचारी तसेच गव्हर्नर, राज्य अॅटर्नी जनरल, शिक्षण विभाग आणि शाळा मंडळ सदस्यांतील कर्मचाऱ्यांचेदेखील यावर अकाउंट आहे. परंतु, नुकतेच उघडकीस आलेल्या प्रकरणात सिग्नल अ‍ॅपचा वापर कायद्याच्या विरुद्ध असू शकतो. मायकेल वॉल्ट्झ यांच्याकडून मजकूर मिळाल्यानंतर गोल्डबर्गने ‘द अटलांटिक’मध्ये लिहिले आहे की, कदाचित वॉल्ट्झने सिग्नलवर राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित माहिती हाताळण्याचे नियमन करणाऱ्या हेरगिरी कायद्याच्या अनेक तरतुदींचे उल्लंघन केले असेल.

अटलांटिकने अनेक राष्ट्रीय सुरक्षा तज्ज्ञांशी सल्लामसलत केली. संवेदनशील माहिती सामायिक करण्यासाठी अमेरिकन सरकारने सिग्नलला मान्यता दिलेली नाही. त्यांनी म्हटले आहे की, कोणत्याही अमेरिकन अधिकाऱ्याने सिग्नलवरील अशा वर्गीकृत कृतींवर चर्चा करू नये. अमेरिकन सरकारकडे अति गुप्त माहिती सामायिक करण्यासाठी स्वतःचा प्रोटोकॉल आहे. जर अधिकाऱ्यांना एखाद्या गुप्त विषयावर चर्चा करायची असेल तर त्यांना त्यांच्या संवेदनशील कंपार्टमेंटेड माहिती सुविधेत जावे लागते. त्याला एससीआयएफ असेही म्हणतात. बहुतांश कॅबिनेट अधिकाऱ्यांच्या घरी ही सुविधा असून यात केवळ सरकारी उपकरणांचा वापर केला जातो. ‘एससीआयएफ’मध्ये सेलफोनलाही परवानगी नसते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How secure is signal app trump team used to share war plans rac