पालघर जिल्ह्यात प्रस्तावित वाढवण बंदरापासून अवघ्या १५-२० किलोमीटर अंतरावर सातपाटीलगतच्या मुरबे किनाऱ्यासमोरील खडकाळ क्षेत्रालगत बारमाही व्यापारी बंदर नव्याने उभारणी करायला महाराष्ट्र सागरी मंडळाने परवानगी दिली आहे.

बंदर उभारणीसंदर्भातील तपशील व आवश्यकता काय?

जेएसडब्ल्यू (जिंदाल) इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीने उच्छेळी व सातपाटी खाडीदरम्यान मुरबे समुद्रकिनाऱ्यासमोरील २६२२ मीटर लांबीच्या सुमारे ५९४ एकर उथळ खडकाळ क्षेत्रात भराव टाकून बंदर उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. या प्रस्तावाला महाराष्ट्र सागरी मंडळाने ३१ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या बैठकीमध्ये मान्यता दिली आहे. सर्व प्रकारच्या मालाची आयात, निर्यात करण्याची २५ दशलक्ष टन प्रतिवर्ष क्षमता असणाऱ्या या प्रकल्पासाठी ४२५९ कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे. या बंदरामुळे आयात-निर्यातीला चालना मिळून तारापूर, वापी व वलसाड पट्ट्यातील उद्योगांना लाभ मिळेल. पोलाद, सिमेंट, खतांची तसेच कोळसा आयात करणे सुलभ होऊ शकेल. मर्यादित खोली लागणाऱ्या कमी आकाराच्या बोटींद्वारे माल वाहतूक करणे शक्य होऊ शकेल.

हेही वाचा : मुंबईवर पाणीकपातीची वेळ का?

बंदर उभारणीसंदर्भात काय अपेक्षित आहे?

हे बंदर सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर उभारण्याचे प्रस्तावित आहे. आराखडा तयार करणे (डिझाईन), उभारणे (बिल्ड), मालकी (ओन), चालविणे (ऑपरेट) व हस्तांतर (ट्रान्सफर) (डीबीओओटी) तत्त्वावर उभारणी होईल. प्राधिकरणाने महिनाभराच्या कालावधीत स्पर्धात्मक निविदा आमंत्रित केल्या असून इच्छुक प्रकल्प प्रवर्तक यांनी बंदर उभारणीच्या दृष्टिकोनातून संकल्पनात्मक योजना तयार करण्यासोबत बंदर क्षेत्र नौकानयन मार्ग व संबंधित सुविधा विकसित करणे, ब्रेक वॉटर बंधारा उभारणे तसेच सुरक्षितपणे व पर्यावरणीय दक्षता घेऊन बंदरामध्ये मालाची हाताळणी करण्याचा आराखडा तयार करणे अपेक्षित आहे.

कसे असेल मुरबे बंदर?

मुरबे समुद्रकिनाऱ्यापासून लंब पद्धतीने (perpendicular) समुद्रामध्ये सुमारे पाच किलोमीटर अंतरावर दोन ब्रेक वॉटर बंधारे उभारून त्यामध्ये तीन धक्के उभारण्याचे प्रस्तावित आहे. कोरडा माल वाहतूक करण्यासाठी ३२५ मीटर लांब व २४ मीटर रुंद जेटी, कंटेनर हाताळणीसाठी ४०० मीटर लांब व ४५ मीटर घाट (quay) तसेच ३०० मीटर लांब व ४५ मीटर रुंद बहुउद्देशीय घाट उभारण्यात येण्याचे प्रस्तावित आहे. या बंदराच्या उभारणीसाठी पाच वर्षांचा कालावधी लागणे अपेक्षित असून उभारणीनंतर पहिल्या वर्षी १८.६० दशलक्ष टन तर सहाव्या वर्षीनंतर २४.४३ दशलक्ष टन प्रति वर्ष माल हाताळणी होणे अपेक्षित आहे.

हेही वाचा : ‘एमपीएससी’च्या परीक्षा लांबल्याने उमेदवारांना फटका बसणार का? 

बंदर प्रस्ताव नव्याने का सादर करण्यात आला?

जेएसडब्ल्यू कंपनीने सन २०१५ मध्ये नांदगाव – आलेवाडीदरम्यान बंदर उभारणीचे प्रस्तावित केले होते. या प्रस्तावाला स्थानिक मच्छीमारांनी कडाडून विरोध केला होता. तसेच अनेक तांत्रिक मुद्दे उपस्थित केले होते. या बंदराविषयी उच्च न्यायालयात दाखल याचिकेच्या सुनावणीदरम्यान जुलै २०२३ मध्ये जेएसडब्ल्यू कंपनीने आपण या ठिकाणी बंदर उभारणार नसल्याचे प्रतिज्ञापत्र दिले होते. दरम्यान, राज्य शासनाने ऑगस्ट २०२३ मध्ये जारी केलेल्या नवीन सागरी धोरणाच्या अनुषंगाने लाभ घेण्याच्या दृटीने जेएसडब्ल्यूने ऑगस्ट महिन्यात नव्याने प्रस्ताव सादर करून त्याला महाराष्ट्र सागरी मंडळाची तत्त्वतः मान्यता मिळवली.

हेही वाचा : विश्लेषण: ‘बैजूज’मधून रवींद्रन यांची हकालपट्टी होईल का?

बंदर उभारणी झाल्यास कोणत्या भागाला झळ पोहोचेल?

मुरबे येथील प्रस्तावित बंदर हे वाढवण बंदरापासून २० किलोमीटरपेक्षा कमी अंतरावर स्थित असून सातपाटी खाडीच्या लगत राहणार आहे. यामुळे सातपाटी, मुरबेसह केळवा, माहीम, नवापूर, उच्छेळी दांडी येथील मच्छीमारांना झळ पोहोचण्याची शक्यता असून सातपाटी येथील नैसर्गिक बंदरावर या बंदराचा परिणाम होण्याची शक्यता आहे.