What is the human coronavirus : पाच वर्षांपूर्वी म्हणजेच २०२० मध्ये चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या करोना विषाणूनं संपूर्ण जगाला हादरवून टाकलं. या महामारीत लाखो भारतीयांना आपले प्राण गमावावे लागले. त्याशिवाय देशाला टाळेबंदीचा सामनाही करावा लागला. करोना विषाणू नेमका कशामुळे उद्भभवला या संदर्भातील तपास अद्यापही प्रलंबित आहे. अशातच भारतात करोनाच्या नव्या विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथील एका ४५ वर्षीय महिलेला HKU1 म्हणजेच ह्युमन करोना व्हायरसची लागण झाली आहे. या महिलेवर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, ह्युमन करोना व्हायरस काय आहे? त्याची लक्षणं कोणती? या संदर्भात जाणून घेऊ.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एका अहवालानुसार, ह्युमन करोना व्हायरसची लागण झालेली रहिवासी कोलकाता शहरातील आहे. १५ दिवसांपासून ही महिला आजारी आहे. तिच्यामध्ये सर्दी, खोकला व ताप यांसारखी लक्षणं दिसून येत होती. डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता, महिलेचा करोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. सध्या या महिलेवर कोलकाता येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती धोक्याबाहेर असून, काळजी करण्याचं कोणतंही कारण नाही, असं डॉक्टरांनी सांगितलं आहे. करोनाबाबत नागरिकांनी सावधगिरी बाळगावी आणि सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करावा, असा सल्लाही वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे.

आणखी वाचा : Cancer Prevention : कर्करोगावर प्रभावी औषधाचा शोध? ही गोळी करणार दुर्धर विकाराचा नाश?संशोधकांचा दावा काय?

ह्युमन करोना व्हायरस HKU1 म्हणजे काय?

ह्युमन करोना व्हायरसला HKU1, असंही म्हटलं जातं. हा बीटा करोना व्हायरस प्रकारातील एक विषाणू आहे, ज्यामध्ये SARS व MERS यांसारख्या धोकादायक विषाणूंचा समावेश होतो. २००५ मध्ये हाँगकाँगमध्ये या ह्यूुमन करोना व्हायरसचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर जगभरात या विषाणूची अनेक प्रकरणं नोंदवण्यात आली होती. साधारणत: हा विषाणू कोविड-१९ (SARS-CoV-2) इतका गंभीर नाही. मात्र, त्याची लागण झालेल्या व्यक्तीच्या श्वसनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो आणि त्याला सामान्य सर्दीसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

ह्युमन करोना व्हायरसचा कसा होतो प्रादुर्भाव?

काही प्रकरणांमध्ये न्यूमोनिया किंवा ब्राँकायटिससारखे फुप्फुसांचे गंभीर आजार होऊ शकतात. आरोग्य विभागाच्या मते, ह्युमन करोना व्हायरसबाबत जागरूक असणं अत्यंत महत्त्वाचं आहे, जेणेकरून त्याचा प्रादुर्भाव टाळता येईल आणि वेळेवर खबरदारी घेता येईल. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, हा विषाणू एका व्यक्तीपासून दुसऱ्याला संक्रमित करू शकतो. त्याचा प्रादुर्भाव विशेषतः शरद ऋतू आणि हिवाळ्याच्या महिन्यांत जलद गतीनं होतो. या विषाणूमुळे सर्दी आणि खोकला यांसारख्या समस्या दिसून येतात. करोना व्हायरसमध्ये अनेक प्रकारच्या विषाणूंचा समावेश होतो.

ह्युमन करोना व्हायरस किती घातक?

पाच वर्षांपूर्वी आलेल्या कोविड-१९ या विषाणूची लागण झाल्याने लाखो लोकांनी प्राण गमावले होते. मात्र, ह्युमन करोना व्हायरस इतका धोकादायक नसल्याचं मत आरोग्यतज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तींमध्ये सौम्य लक्षणं दिसून येतात. अहवालांनुसार, त्यात साथीचा रोग निर्माण करण्याची क्षमता नाही. नवी दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटल्सच्या औषध विभागाचे वरिष्ठ सल्लागार डॉ. सुरंजित चॅटर्जी यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं, “HKU1 हा नवीन विषाणू कोविडपेक्षा धोकादायक नाही. बहुतेक लोक कधीतरी या विषाणूच्या संपर्कात येतात. त्याचा संक्रमण कालावधी मर्यादित वेळेसाठी असतो. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही.”

ह्युमन करोना व्हायरसची लक्षणे कोणती?

अमेरिकेतील सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शननुसार, ह्युमन करोना व्हायरसची लागण झालेल्या व्यक्तीमध्ये सतत खोकला, वारंवार ताप येणे, नेहमी थकवा जाणवणे, नाक बंद होणे, घसा खवखवणे, न्यूमोनिया, डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत जडपणा जाणवणे यांसारखी लक्षणं दिसून येतात. त्यामुळे नागरिकांनी वेळेवर उपचार घेणं गरजेचं आहे. तसं न केल्यास हा विषाणू श्वसनाद्वारे रुग्णाच्या फुप्फुसापर्यंत पोहोचू शकतो, ज्यामुळे ब्रॉन्कायलायटिस आणि न्यूमोनियासारखे आजार उद्भवू शकतात.

हेही वाचा : पाकिस्तानला चीनकडून मिळाली आधुनिक पाणबुडी; भारतासमोर कोणकोणती आव्हानं?

ह्युमन करोना व्हायरसचा सर्वाधिक धोका कुणाला?

संक्रमित व्यक्तीच्या खोकल्यामुळे किंवा शिंकल्यानं या विषाणूचे संक्रमण एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होते. ह्युमन करोना व्हायरसचा सर्वाधिक धोका लहान मुले, वृद्धांना असल्याचं सांगितलं जात आहे. त्याशिवाय ज्या व्यक्तीची रोगप्रतिकार शक्ती अत्यंत कमकुवत आहे, तिलाही या विषाणूची लागण होते. मधुमेह, कर्करोग किंवा फुप्फुसांच्या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना हा विषाणू सहज संक्रमित करतो, असं आरोग्यतज्ज्ञांनी सांगितलं आहे.

ह्युमन करोना व्हायरसपासून कसा करायचा बचाव?

सध्या या ह्युमन करोना व्हायरसवर कोणतीही लस किंवा विशिष्ट उपचार नाही; परंतु खबरदारी घेतल्यास त्याच्या संसर्गाचा धोका कमी करता येतो. वारंवार हात धुणं, गर्दीच्या ठिकाणी मास्क घालणं, संक्रमित लोकांपासून दूर राहणं, सुरक्षित अंतर ठेवणं, वारंवार स्पर्श होणारे पृष्ठभाग (जसे की मोबाईल फोन, टेबल, दाराचे हँडल) निर्जंतुक करणं, शिंकताना किंवा खोकताना तोंड आणि नाक रुमालानं झाकणं, रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवण्यासाठी पौष्टिक अन्नाचं सेवन करणं, भरपूर पाणी पिणं व पुरेशी झोप घेतल्यानं या आजारापासून स्वत:चा बचाव करता येऊ शकतो, असं आरोग्यतज्ज्ञांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Human coronavirus case reported in kolkata 45 years women positive what is the symptoms sdp