जागतिक पातळीवर वन्यजीव संवर्धनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू झाला आहे. त्यापाठोपाठ आता भारतातही वन्यजीव संवर्धनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराला गती आली आहे.

वन्यजीव संवर्धन प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर प्रभावी ठरणार का?

जगभरात अनेक ठिकाणी वन्यजीवांचे संवर्धन करण्याच्या प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर ‘गेम चेंजर’ ठरत आहे. वन्यप्राण्यांची बेकायदेशीर शिकार, त्यांच्या अधिवासाचा नाश आणि मानव-वन्यजीव संघर्ष या आव्हानांना वनखात्यासह सर्वांनाच सामोरे जावे लागत आहे. तंत्रज्ञान या समस्यांचा सक्रिय सामना करण्यासाठी आणि त्यावर उपाय शोधण्यासाठी नवीन मार्ग दाखवते. वन्यजीव संवर्धनात तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण, प्रजातींचे, परिसंस्थांचे संरक्षण करण्यास आणि मानव आणि वन्यजीव यांच्यातील सहअस्तित्व वाढविण्यास मदत करतेे.

शिकार रोखण्यासाठी आणि लुप्तप्राय प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी ‘ड्रोन’, ‘नेटवर्क सेन्सर्स’ आणि कृत्रिम तंत्रज्ञान अशा तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. वन्यजीव अधिवासांचे संरक्षण आणि जतन करण्यासाठी ‘उपग्रह रिमोट सेन्सिंग’ महत्त्वाचे ठरत आहे. मानव-वन्यजीव संघर्षावर आभासी कुंपण, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित भिंत, ड्रोन उपयोगी ठरत आहेत.

शिकार रोखण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत?

शिकार या वन्यजीवांसाठीच्या सततच्या धोक्याचा सामना करण्यासाठी, संवर्धनवादी ‘नेटवर्क सेन्सर्स’, ‘ड्रोन’ आणि कृत्रिम बुद्धिमता प्रणाली यासारख्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. ‘थर्मल इमेजिंग’ने सुसज्ज असलेले ड्रोन रात्रीच्या वेळी शिकाऱ्यांच्या हालचाली ओळखू शकतात. ‘नेटवर्क सेन्सर’ धोक्यात असलेल्या प्राण्यांच्या ठिकाणांचा मागोवा घेतात आणि वनरक्षकांना संभाव्य धोक्यांपासून सावध करतात. कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यप्रणाली या तपशिलाचे विश्लेषण करून शिकारीच्या धोकादायक जागांचा अंदाज लावते. त्यामुळे अधिकाऱ्यांना तिथे संसाधने तैनात करता येतात. तंत्रज्ञानावर आधारित या गोष्टींमुळे वन्यजीवांचे संरक्षण तर होतेच, शिवाय त्यांची शिकारही रोखली जाते.

प्रगत तंत्रज्ञानातून अधिवासांचे जतन शक्य आहे का?

पर्यावरणीय प्रणालीचा नाश हा वन्यजीवांसाठी आणखी महत्त्वाचा धोका आहे. सध्या जगातील फक्त १५ टक्के जमीन संरक्षित आहे. ‘उपग्रह रिमोट सेन्सिंग’ मोठ्या प्रमाणात पर्यावरणीय देखरेख करू शकते. ज्यामुळे संवर्धनवाद्यांना जमिनीच्या वापरातील बदल, जंगलतोड दर आणि रस्ते आदी कारणांमुळे जंगलातील जमिनींचे अखंड पट्टे विखंडित होण्याबाबतची माहिती मिळते.

संरक्षणाची आवश्यकता असलेल्या महत्त्वाच्या अधिवासांची ओळख पटविणे आणि निकृष्ट क्षेत्रे सुधारणे या उद्देशाने धोरणे विकसित करण्यासाठी हा तपशील आवश्यक आहे. याशिवाय, पर्यावरणीय डीएनए नमुना पद्धतीद्वारे एखाद्या परिसंस्थेत अस्तित्वात असलेल्या जीवजातींचे अनुवांशिक घटक ओळखून त्या ठिकाणच्या जैवविविधतेच्या पातळीबाबत माहिती मिळते. ही तंत्रज्ञान पद्धत संवर्धनकर्त्यांना उच्च जैवविविधता असलेल्या आणि तात्काळ संरक्षणाची गरज असलेल्या क्षेत्रांची ओळख पटविण्यास मदत करते.

तंत्रज्ञानाच्या वापरातून मानव-वन्यजीव संघर्ष कमी होतो का?

मानवी लोकसंख्या प्रचंड वेगाने वाढत असताना निसर्गावर अतिक्रमण होत आहे. वेगवेगळे विकास प्रकल्प जंगल आणि जंगलालगत येत आहेत. त्यामुळे वन्यप्राणी जंगलाबाहेर येत असून मानव-वन्यजीव संघर्ष वाढत आहे. यात मानवी मृत्यूंची संख्या वाढत असून वन्यप्राण्यांचेही मृत्यू होत आहेत. तसेच पिके आणि पशुधनाचाही नाश होत आहे. हा संघर्ष कमी करणे, मानव आणि वन्यजीव यांच्या सहअस्तित्वाला चालना देणेे यासाठी नावीन्यपूर्ण उपाय योजण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.

उदाहरणार्थ, ‘नेटवर्क सेन्सर्स’चा वापर करून आभासी कुंपण तयार केले जाते, जे प्राण्यांना मानवी वस्ती आणि शेती क्षेत्रांपासून दूर ठेवते. प्राणी त्याच्या आसपास आल्यास अलार्म वाजतो. त्यामुळे प्राणी त्यापासून दूर होतात. ड्रोनचा वापर वन्यजीवांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि जंगलालगतच्या गावकऱ्यांना संभाव्य धोकादायक प्राण्यांच्या दृष्टिकोनाबद्दल सतर्क करण्यासाठी केला जातो.

तपशिलांचे आदानप्रदान महत्त्वाचे?

वन्यजीवांच्या संरक्षणासाठी तंत्रज्ञान पूर्ण क्षमतेने विकसित होणे गरजेचे आहे. त्यासाठी सहकार्य आणि जागतिक पातळीवर तपशिलांचे आदानप्रदान आवश्यक आहे. वन्यजीव संरक्षण क्षेत्रांच्या विशिष्ट गरजांनुसार करण्यात आलेले उपाय अधिक प्रभावी ठरतात. संवर्धनवादी, तंत्रज्ञ, सरकार आणि खासगी क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवत, तंत्रज्ञानाचा प्रभाव वाढवत अधिक शाश्वत उपाय तयार करता येतात.

जागतिक पातळीवर तपशिलांचे आदानप्रदान केले गेल्यामुळे संवर्धनवाद्यांना वेगवेगळ्या प्रकारची भरपूर माहिती मिळू शकते. त्यातून प्राण्यांचे स्थलांतर, हवामान नमुने आणि शिकारीच्या घटनांसंदर्भातील तपशील यांचे देशादेशांमध्ये आदानप्रदान होऊ शकते. त्याची वेगवेगळ्या प्रदेशातील संवर्धनवाद्यांना आव्हानांचा अंदाज घेण्यात आणि प्रभावी उपाय अमलात आणण्यात मदत होऊ शकते.

rakhi.chavhan @expressindia.com