Hepatitis cases rising in India जागतिक स्तरावर हेपिटायटिस विषाणूच्या संसर्गाने होणार्‍या मृत्यूंची संख्या दिवसागणिक वाढत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे. या आठवड्यात पोर्तुगालमध्ये जागतिक हेपिटायटिस शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या शिखर परिषदेमध्ये जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) हेपिटायटिसवर आधारित एक अहवाल प्रसिद्ध केला. त्या अहवालानुसार विषाणूजन्य हेपिटायटिसची सर्वाधिक प्रकरणे असलेला भारत दुसर्‍या क्रमांकाचा देश आहे. २०२२ मध्ये जगभरात या आजाराने ग्रस्त असलेल्या ३.५ कोटी रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यातील ११.६ टक्के रुग्ण भारतातील असल्याचे सांगण्यात आले आहे. जागतिक हेपिटायटिसच्या अहवालानुसार या आजाराने २०२२ मध्ये १.३ दशलक्ष रुग्णांचा मृत्यू झाला. हा आजार नेमका काय आहे? जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात याबाबत काय म्हटलेय? त्याची लक्षणे आणि उपाय काय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात काय?

मंगळवारी जाहीर झालेल्या ग्लोबल हेपिटायटिस रिपोर्ट २०२४ नुसार, २०२२ मध्ये २.९३ कोटी लोक हेपिटायटिस बी या संसर्गजन्य आजाराने ग्रस्त होते; तर ५५ लाख लोक हेपिटायटिस सी या संसर्गजन्य आजाराने ग्रस्त होते. हेपिटायटिस रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेल्या देशांमध्ये पहिला क्रमांक चीनचा असून, तर दुसर्‍या क्रमांकावर भारत आहे. त्यामुळे ही अत्यंत चिंतेची बाब आहे. ‘द प्रिंट’ने अहवालाचा हवाला देऊन असे नमूद केले आहे की, २०२२ मध्ये भारतात हेपिटायटिस बीची सुमारे ५० हजार नवीन प्रकरणे आणि हेपिटायटिस सीची १.४ लाख नवीन प्रकरणे नोंदवली गेली. त्याव्यतिरिक्त हेपिटायटिस बीमुळे ९८,३०५ लोकांचा मृत्यू झाला; तर हेपिटायटिस सीमुळे २६,२०६ लोकांनी आपले प्राण गमावले.

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) हेपिटायटिसवर आधारित एक अहवाल प्रसिद्ध केला. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : भारतीयांना फटका! न्यूझीलंडकडून व्हिसा नियमांमध्ये मोठे बदल, काय आहेत नवे नियम?

दररोज ३,५०० लोकांचा मृत्यू

आश्चर्याची बाब म्हणजे या विषाणूने संक्रमित झालेल्यांपैकी केवळ २.४ टक्के लोकांच्या बाबतीत याचे निदान मिळाले. जागतिक आकडेवारीबद्दल बोलायचे झाल्यास १८७ देशांतील डेटावरून असे दिसून आले आहे की, हेपिटायटिसमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २०१९ मध्ये १.१ दशलक्ष होती; जी २०२२ मध्ये १.३ दशलक्ष झाली. हेपिटायटिस संसर्गामुळे जगभरात दररोज ३,५०० लोकांचा मृत्यू होत असल्याचे धक्कादायक वास्तवही या अहवालातून समोर आले आहे. त्यातील ८३ टक्के लोकांचा मृत्यू हेपिटायटिस बी; तर १७ टक्के लोकांचा मृत्यू हेपिटायटिस सीमुळे झाला आहे.

“या अहवालातून एक धक्कादायक वास्तव समोर आले आहे. हेपिटायटिसचा संसर्ग रोखण्यात जागतिक स्तरावर काम सुरू आहे आणि त्याला यशदेखील मिळत आहे. मात्र, मृत्यूच्या संख्येत वाढ होत आहे. कारण- हेपिटायटिस असलेल्या फारच कमी लोकांवर निदान होऊन, उपचार केले जात आहेत”, असे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेड्रोस ॲधानोम गेब्रेयस यांनी एका निवेदनात म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार २०२२ मध्ये २५४ दशलक्ष लोक हेपिटायटिस बी आणि ५० दशलक्ष लोक हेपिटायटिस सीने ग्रस्त होते.

तीस ते ५४ वर्षे वयोगटातील नागरिकांमध्ये क्रॉनिक हेपिटायटिस बी व सीचा संसर्ग होण्याचे प्रमाण अधिक आहे. १८ वर्षांखालील १२ टक्के मुलांमध्ये या आजाराची लक्षणे दिसतात. बांगलादेश, चीन, इथिओपिया, भारत, इंडोनेशिया, नायजेरिया, पाकिस्तान, फिलिपिन्स, रशियन फेडरेशन व व्हिएतनाम या देशांमध्ये एकत्रितपणे हेपिटायटिस बी व सीचे दोन-तृतियांश संक्रमणे झाली आहेत..

१८ वर्षांखालील १२ टक्के मुलांमध्ये या आजाराची लक्षणे दिसतात. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेपिटायटिस बी व सी म्हणजे काय?

यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेंशन (सीडीसी)नुसार, हेपिटायटिस म्हणजे यकृताचा दाह. सामान्य भाषेत सांगायचे झाले, तर याला यकृताला (Liver)ला सूज येणे, असेही म्हणतात. हेपिटायटिसचे ए, बी, सी, डी व ई, असे पाच प्रकार आहेत. परंतु, यातील बी व सीच्या संक्रमणामुळे सर्वांत जास्त मृत्यूंची नोंद करण्यात आली आहे. ९६ टक्के मृत्यूंसाठी बी व सीचे संक्रमण कारणीभूत ठरते.

‘द इंडियन एक्स्प्रेस’च्या मते, हेपिटायटिस बीमुळे मळमळ, उलट्या, डोळे व त्वचा पिवळसर होणे यांसारखी लक्षणे आढळतात. गंभीर प्रकरणांमध्ये यकृतदेखील निकामी होते. बी संसर्ग यकृतामध्ये बराच काळ राहून यकृताला नुकसान पोहोचवतो; ज्यामुळे यकृताच्या कर्करोगाचा धोकाही निर्माण होऊ शकतो. क्रॉनिक हेपिटायटिस बी संसर्गावर प्रतिबंधक लस आहे. त्यातील ४० ते ५० टक्के हेपॅटोसेल्युलर कार्सिनोमा (यकृत कर्करोगाचा एक प्रकार) आणि २० ते ३० टक्के सिरोसिस प्रकरणे भारतात आहेत, असे अहवालात म्हटले आहे.

बऱ्याच हेपिटायटिस सी संक्रमितांना लक्षणे जाणवत नाहीत. त्यामुळे त्यांना कुठला आजार आहे, हे त्यांच्या लक्षात येत नाही. ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार, संक्रमण झाल्याच्या दोन ते १२ आठवड्यांच्या आत त्याची लक्षणे जाणवू लागतात. हेपिटायटिस बी व सीची लक्षणे खालीलप्रमाणे :

-त्वचा किंवा डोळे पिवळे येणे

-भूक न लागणे

-मळमळ आणि पोटदुखी

-ताप

-गडद लघवी आणि फिकट रंगाची विष्ठा

-सांधेदुखी आणि थकवा

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या हेपिटायटिसवरील एका अहवालानुसार, संक्रमण होण्याची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत:

-इंजेक्शनद्वारे

-रक्त संक्रमणातून

-आईपासून नवजात बाळाला

-प्रसूतिदरम्यान

-असुरक्षित लैंगिक संबंधाद्वारे

प्रसूतिदरम्यानदेखील हेपिटायटिसचे संक्रमण होऊ शकते. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

हेपिटायटिस बी आणि सीध्ये फरक काय?

सीडीसीच्या मते, हेपिटायटिस बी व सीचे संक्रमण दोन वेगवेगळ्या विषाणूंमुळे होते. जरी प्रत्येकामध्ये समान लक्षणे दिसत असली तरी दोन्ही संक्रमणे वेगवेगळ्या प्रकारे पसरतात आणि यकृतावर वेगळ्या प्रकारे परिणाम करू शकतात. दोन विषाणूंमधला महत्त्वाचा फरक म्हणजे संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील द्रवपदार्थांच्या संपर्कात आल्याने अर्थात वीर्य किंवा योनिमार्गातील द्रव व रक्त यांसारख्या द्रवपदार्थांच्या संपर्कात आल्याने लोकांना हेपिटायटिस बी होऊ शकतो, असे ‘मेडिकल न्यूज’ने स्पष्ट केले.

हेपिटायटिस सी सामान्यतः रक्त संक्रमणातून, वैद्यकीय प्रक्रिया, प्रसूती, दूषित सुयांच्या संपर्कात येणे आणि लैंगिक संपर्काद्वारे प्रसारित होतो. हेपिटायटिस बी किंवा सी दोन्हीपैकी कोणताही संसर्ग खोकला, आईचे दूध किंवा संसर्ग झालेल्या व्यक्तीला मिठी मारल्याने पसरत नाही.

भारतासाठी हे संकट किती मोठे?

मुलांना तीव्र संसर्गापासून रोखण्यासाठी केंद्राच्या सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमाचा भाग म्हणून भारतात हेपिटायटिस बी लसीकरण २००२-२००३ मध्ये पहिल्यांदा सुरू करण्यात आले. प्राप्त माहितीनुसार, २०१० मध्ये या लसीचा संपूर्ण देशात विस्तार करण्यात आला. सध्या हेपिटायटिस बीचे लसीकरण हे जन्माच्या वेळेपासून ६, १० व १४ आठवड्यांच्या अंतराने पेंटाव्हॅलेंट लसीचा एक घटक म्हणून केले जाते. परंतु, भारतातील २०२० च्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, २०१५ मध्ये हेपिटायटिस बी लसीचा तिसरा डोस ८६ टक्के बालकांना देण्यात आला होता; मात्र पहिला डोस केवळ ४५ टक्के बालकांना देण्यात आला होता.

“भारतातील हेपिटायटिस बीचा धोका कमी करण्यासाठी, सर्व नवजात बालकांचे संपूर्ण लसीकरण झालीय का, याची खात्री करणे आवश्यक आहे. ही लस प्रौढांनाही दिली जावी”, असे दिल्लीस्थित इन्स्टिट्यूट ऑफ लिव्हर अॅण्ड बिलीरी सायन्सेसचे कुलगुरू डॉ. एस. के. सरीन यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.

हेही वाचा : लोकसभा निवडणुकांचा जागतिक बाजारपेठांवर कसा परिणाम होणार?

डॉ. एस. के. सरीन यांनी निदर्शनास आणून दिले की, हेपिटायटिस बीवर तज्ज्ञांद्वारे मार्गदर्शक तत्त्वांनुसार उपचार केले जातात. निदान झालेल्यांपैकी १० पैकी आठ लोक मार्गदर्शक तत्त्वांनुसार उपचार घेत नाहीत. “ज्यांचे निदान झाले आहे, त्या सर्वांवर उपचार करण्याची गरज आहे; जसे आपण एचआयव्हीसाठी करतो. कारण- त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर होणारे दुष्परिणाम कमी होतात, असे त्यांनी सांगितले. हेपिटायटिस सीसाठी अल्प मुदतीचा उपचारदेखील पुरेसा आहे. हेपिटायटिस सी उपचारांचा कोर्स १२ ते २४ आठवड्यांचा असतो. त्यामुळे ८० ते ९० टक्के रुग्ण बरे होऊ शकतात, असा डॉ. सरीन यांना विश्वास आहे.