India help Afghanistan Against Pakistan : गेल्या महिन्यात पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये मोठा वाद उफाळून आला. कतार व तुर्कीने मध्यस्थी करून हा वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. सध्या दोन्ही देशांमध्ये तात्पुरता युद्धविराम झाला असला तरी सीमावर्ती भागातील तणाव अद्याप कायम आहे. यादरम्यान तालिबान सरकारने कुनार नदीवर धरण बांधण्याची घोषणा करून पाकिस्तानची पुन्हा मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या निर्णयाला भारतानेही उघडपणे समर्थन दिले आहे. अफगाणिस्तानने जर कुनार नदीवर धरण बांधले, तर त्याचा पाकिस्तानवर काय परिणाम होणार? याविषयीचा हा आढावा…
अफगाणिस्तानने वापरली भारताची रणनीती
कुनार नदीचे पाणी अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोन्ही देशांतून वाहते. गेल्या आठवड्यात तालिबान सरकारने या नदीवर धरण बांधण्याची घोषणा केली. त्यानंतर भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने एक परिपत्रक जारी करून या निर्णयाला उघडपणे समर्थन दिले. पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी एप्रिलमध्ये जम्मू-काश्मीरमधील पहगाम येथील पर्यटकांवर गोळीबार केला होता. या गोळीबारात २७ पर्यटकांना आपले प्राण गमवावे लागले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने ऑपरेशन सिंदूर राबवीत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अनेक अड्डे उद्ध्वस्त केले होते.
अफगाणिस्तानचे जलसंपदा मंत्री काय म्हणाले?
- दोन्ही देशांमधील युद्धविरामानंतरही भारताने सिंधू पाणी करारासंदर्भात कठोर भूमिका घेतली होती.
- अफगाणिस्ताननेही अगदी तशीच भूमिका घेऊन पाकिस्तानची मुस्कटदाबी सुरू केली आहे.
- तालिबान सरकारने पाकिस्तानकडे जाणारे पाणी मर्यादित करण्यासाठी भारताच्या धोरणाचे अनुकरण केले.
- तालिबानचे सर्वोच्च नेते मौलवी हिबतुल्ला अखुंदजादा यांच्या आदेशानंतर कुनार नदीवर धरण बांधण्याची घोषणा करण्यात आली.
- काळजीवाहू जलमंत्री मुल्ला अब्दुल लतीफ मन्सूर यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून त्या संदर्भातील माहिती दिली.
- “अफगाणिस्तानमधील जनतेला त्यांच्या पाण्याचे व्यवस्थापन करण्याचा हक्क आहे. कुनार नदीवर बांधण्यात येणाऱ्या धरणाचे काम स्थानिक कंपन्यांना दिले जाईल”, असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.
आणखी वाचा : Ayni Air Base : पाकिस्तानला धडकी भरवणारा हवाई तळ भारताच्या हातातून निसटण्यामागे चीनचा हात?
कुनार नदी पाकिस्तानसाठी का महत्वाची?
जवळपास ५,००० किलोमीटर लांब असलेली कुनार नदी पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील हिंदू कुश पर्वतरांगांमधून उगम पावते. त्यानंतर ही नदी अफगाणिस्तानमधील दक्षिणेकडील भागात असलेल्या काबूल नदीत विलीन होऊन पुन्हा पाकिस्तानमध्ये जाते. कुनार ही पाकिस्तानमधून वाहणाऱ्या सर्वांत मोठ्या नद्यांपैकी एक आहे. सिंधू नदीप्रमाणेच ती खैबर पख्तूनख्वा प्रदेशातील सिंचन, पिण्याचे पाणी व जलविद्युत निर्मितीचे महत्त्वाचे साधन आहे. गेल्या महिन्यात पाकिस्तान-अफगाणिस्तान यांच्यात सीमावर्ती भागात हिंसक चकमकी झाल्या होत्या. या वादात दोन्ही बाजूंकडून मोठे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी तालिबान सरकारने कुनार नदीवर धरण बांधण्याचा निर्णय घेतला आहे.
अफगाणिस्तानच्या निर्णयाला भारताचा पाठिंबा
- कुनार नदीवर धरण बांधण्याच्या अफगाणिस्तानच्या योजनेला भारताने गुरुवारी पाठिंबा जाहीर केला आहे.
- जलविद्युत प्रकल्पांसह पाण्याचे शाश्वत व्यवस्थापन करण्यासाठी भारताकडून तालिबान सरकारला शक्य तितकी मदत केली जाणार आहे.
- परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी गुरुवारी माध्यमांना यासंदर्भातील माहिती दिली आहे.
- भारत आणि अफगाणिस्तानमध्ये अशा मुद्द्यांवर सहकार्याचा जुना इतिहास आहे.
- अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी नुकताच भारताचा दौरा केला होता.
- त्यानंतरच्या संयुक्त निवेदनात याबाबतची माहिती देण्यात आली होती, असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले.
- यावेळी त्यांनी दोन्ही देशांमध्ये पाण्याशी संबंधित विषयांवर दीर्घ सहकार्याची परंपरा आणि सलमा धरणाची आठवण करून दिली.
- हे धरण अफगाणिस्तानच्या हेरात प्रांतात बांधण्यात आले असून, त्याला ‘अफगाण-भारत मैत्री धरण’ म्हणूनही ओळखले जाते.
- २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या धरणाचे उदघाटन करण्यात आले होते.
- सलमा धरणाची वीजनिर्मिती क्षमता ४२ मेगावॉट आहे. ७५,००० हेक्टर शेतजमिनीला सिंचनासाठी पाणीपुरवठा करणारे हे मोठे धरण आहे.
हेही वाचा : Rohit Arya : १७ मुलांना ओलीस ठेवणारा रोहित आर्य कोण होता? त्याने सरकारवर काय आरोप केले होते?
कुनार नदीवर धरण बांधल्यास काय होईल?
तालिबान सरकारने कुनार नदीवर धरण बांधण्याचा निर्णय घेतल्यामुळे पाकिस्तानची कोंडी झाली आहे. हे धरण बांधल्यास नदीतील पाण्याचा प्रवाह कमी होऊन पाकिस्तानला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कुनार नदीवरच पेशावर शहरातील २० लाख लोकांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. त्याशिवाय पाकिस्तानला दरवर्षी सर्वाधिक पाणी कुनर नदीकडून मिळते. जर अफगाणिस्तानने या नदीवर धरण बांधले, तर पाकिस्तानला पाणीबाणीचा सामना करावा लागू शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. १ एप्रिल ते १० जून या खरीप पिकांच्या सुरुवातीच्या काळात पाकिस्तानसाठी काबूल नदी (जिथे कुनार नदी मिळते) अतिशय महत्त्वाची असते. कारण- या काळात तेथील बहुतांश धरणांचा पाणीसाठा मृत पातळीवर पोहोचलेला असतो. आधीच भारताने सिंधू पाणी करार स्थगित केल्यामुळे पाकिस्तानला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच अफगाणिस्तानने कुनार नदीवर धरण बांधल्यास तेथील लोकांवर पाणीटंचाईचे सावट येण्याची शक्यता आहे.
