Indian Money in Swiss Bank in 2024 : परदेशातील बँकांत ठेवण्यात आलेला काळा पैसा भारतात परत आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन देत पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४ मध्ये सत्तेत आले. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी मध्यरात्री घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामागे पंतप्रधानांनी चोरांचा काळा पैसा बाहेर येईल, असे कारण सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र हा पैसा भारतात आलाच नाही. दुसरीकडे स्विस बँकेतील भारतीयांचा पैसा तिपटीने वाढल्याचे समोर आले आहे. स्विस बँकेने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे. दरम्यान, देशातील श्रीमंत व्यक्ती स्विस बँकेतच पैसे का ठेवतात? या बँकेत कोण खाते उघडू शकतो? स्विस बँकेत भारतीयांचा नेमका किती पैसा आहे? ते जाणून घेऊ…

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

स्विस बँकेत भारतीयांचे किती पैसे?

स्वित्झर्लंडच्या सेंट्रल बँकेने गुरुवारी जाहीर केलेल्या वार्षिक आकडेवारीनुसार, २०२३ च्या तुलनेत २०२४ मध्ये भारतीयांची स्विस बँकेतील रक्कम तिपटीने वाढून ३.५ अब्ज स्विस फ्रँक (CHF) म्हणजेच सुमारे ३७,६०० कोटी रुपये इतकी झाली आहे. २०२१ नंतरची ही सर्वांत मोठी रक्कम असून, त्यावेळी भारतीयांची ३.८३ अब्ज स्विस फ्रँक बँकेत जमा होती. विशेष बाब म्हणजे २०२३ मध्ये भारतीयांची फक्त १.०४ अब्ज स्विस फ्रँक इतकीच रक्कम स्विस बँकेत होती, जी २०२० नंतरची सर्वांत कमी रक्कम होती.

स्थानिक शाखा आणि इतर वित्तीय संस्थांद्वारे स्विस बँकेत भारतीयांनी ठेवलेल्या पैशात मोठी वाढ झाल्यामुळे ही रक्कम वाढली असल्याचे पीटीआयच्या अहवालात म्हटलं आहे. विशेष बाब म्हणजे स्विस नॅशनल बँकेच्या अधिकृत आकडेवारीत भारतीयांनी ठेवलेल्या रकमेचा काळ्या पैशांचा उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामागचे कारण म्हणजे स्वित्झर्लंड भारतीयांच्या पैशांना काळा पैसा मानत नाही. तरीही स्वित्झर्लंड करचुकवेगिरी करणाऱ्यांविरुद्धच्या लढाईत भारताला पाठिंबा देत असल्याचं सांगितलं जात आहे.

आणखी वाचा : इस्रायल-इराण संघर्षात भारताचे राजदूत जितेंद्र पाल यांची भूमिका का ठरतेय निर्णायक?

स्विस बँकेत भारतीयांची रक्कम कशी वाढत गेली?

  • २०२१ मध्ये भारतीयांचे ३.८३ अब्ज स्विस फ्रँक स्विस बँकेत होते. ही १४ वर्षांतील उच्चांकी रक्कम होती.
  • त्यानंतरचा सर्वाधिक पैसा २०२४ मध्ये भारतातून स्विस बँकांत गेल्याचं समोर आलं आहे.
  • २०२३ च्या अखेरीस भारतीयांनी स्विस बँकेत ठेवलेली एकूण रक्कम ही ३५४.५५ कोटी स्विस फ्रँक इतकी होती.
  • २०२४ मध्ये स्विस बँकेत भारतीयांनी जमा केलेल्या एकूण रक्कमेपैकी ३.२ अब्ज स्विस फ्रँक इतर बँकांमधून जमा झाली आहे.
  • तर १३ कोटी ५० लाख स्विस फ्रँक ही बॉण्ड्स आणि सिक्युरिटीजमधून आल्याचं बँकेने सांगितलं आहे.
  • याशिवाय तर ३४ कोटी ६० लाख स्विस फ्रँक इतकी रक्कम वैयक्तिक ग्राहकांकडून थेट बँक खात्यात जमा करण्यात आलेली आहे.

स्विस बँकेतील ही रक्कम काळा पैसा आहे का?

स्विस अधिकाऱ्यांनी अनेकदा सांगितलं आहे की, भारतीय रहिवाशांकडून स्वित्झर्लंडमध्ये ठेवली गेलेली संपत्ती ही ‘काळा पैसा’ समजू नये. तरीही स्विस बँका आणि अधिकाऱ्यांनी भारताला करचोरीविरोधात सहकार्य करण्याचे धोरण ठेवले आहे. २०१८ मध्ये भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये ‘Automatic Exchange of Information (AEOI)’ करार झाला होता. त्यानुसार २०१९ पासून दोन्ही देश एकमेकांना बँक खात्यांबाबतच्या माहितीची देवाणघेवाण करीत आहेत. २०१८ पासून स्विस बँकेकडून भारतीय खातेदारांची संपूर्ण माहिती भारत सरकारला देण्यात आली आहे. जी प्रकरणे प्रथमदर्शनी संशयास्पद वाटली, त्यांची संपूर्ण माहितीही अधिकृतरीत्या भारताला देण्यात आली आहे.

२०२४ मध्ये भारतीयांची स्विस बँकेतील रक्कम तिपट्टीने वाढून ३.५ अब्ज स्विस फ्रँक (CHF) म्हणजेच सुमारे ३७,६०० कोटी रुपये इतकी झाली आहे. (छायाचित्र पीटीआय)

भारतात काळ्या पैशाची नेहमीच होते चर्चा

आतापर्यंत दोन्ही देशांत अशा शेकडो प्रकरणांमधील माहितीची देवाणघेवाण झाली आहे. मात्र, असं असलं तरी भारतात अनेक वर्षांपासून स्विस बँकेतील कथित काळ्या पैशाच्या संदर्भात वाद असून, राजकीय आश्वासनं दिली जात आहेत. २०१४ मध्ये भाजपा सत्तेत येण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी परदेशातील बँकेत ठेवण्यात आलेला काळा पैशांचा उल्लेख केला होता. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी मध्यरात्री घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयामागे पंतप्रधानांनी चोरांचा काळा पैसा बाहेर येईल, असे कारण दिले होते. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांना लक्ष्य केले होते.

अनेक भारतीय स्विस बँकेतच पैसे का ठेवतात?

भारतातील अनेक जण स्विस बँकेत पैसा का ठेवतात, यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, अर्थतज्ज्ञांच्या मते यामागे अनेक कारणे आहेत. स्वित्झर्लंडची जागतिक स्तरावरील तटस्थ भूमिका हे त्यातील पहिलं कारण मानलं जातं. हा देश आतापर्यंत जागतिक संघर्षांपासून अलिप्त राहिलेला आहे. त्यामुळे युद्ध, अशांतता अशा काळात आपले पैसे सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक भारतीय स्वित्झर्लंडमधील बँकेला प्राधान्य देतात. दुसरं म्हणजे- परदेशातील नागरिकांची रक्कम सुरक्षित ठेवली जाईल अशी स्वित्झर्लंडमधील कायद्यांची रचना असल्याचं सांगितलं जातं. या कायद्यांमुळे अत्यंत श्रीमंत व्यक्तींना करचुकवेगिरी करण्याची संधी मिळते. तिसरं म्हणजे- स्विस फ्रँक ही चलन प्रणाली अत्यंत स्थिर आणि विश्वासार्ह चलन प्रणाली म्हणून ओळखली जाते.

आणखी वाचा : Sejjil Missile : इराणचं ‘सेज्जिल क्षेपणास्त्र’ किती शक्तिशाली? त्याने इस्रायलचं किती नुकसान केलं?

स्विस बँकेत कोणत्या देशांतील नागरिकांचे किती पैसे?

स्विस बँकेत जमा असलेल्या एकूण रकमेपैकी २२२ अब्ज स्विस फ्रँक एवढी रक्कम यूकेमधील नागरिकांकडून जमा केली गेली आहे. तर, अमेरिकतील लोकांनी ८९ अब्ज स्विस फ्रँक इतकी रक्कमा बँकेत ठेवलेली आहे. त्यानंतर वेस्ट इंडिजचा क्रमांक लागतो. स्विस बँकेत वेस्ट इंडिजमधील नागरिकांनी तब्बल ६८ स्विस फ्रँक जमा केल्याचं सांगितलं जात. त्यानंतर जर्मनी, फ्रान्स, हाँगकाँग, लक्झेंबर्ग, सिंगापूर, ग्वेर्नसी व दुबईचा क्रमांक लागतो. स्विस बँकांमध्ये रक्कम ठेवणाऱ्या यादीतील देशांमध्ये भारत ४८ व्या क्रमांकावर आहे. २०२३ च्या अखेरीस भारत या यादीत ६७ व्या स्थानावर होता आणि २०२२ मध्ये तो ४६ व्या क्रमांकावर होता.

स्विस बँकेत कोण खाते उघडू शकतो?

स्विस बँकेत फक्त श्रीमंत व्यक्तीच खाते उघडू शकतात, असा काहींचा समज आहे; मात्र तसे अजिबात नाही. या बँकेत जगातील कोणत्याही देशातील व्यक्ती तिचे खाते उघडू शकते. फक्त त्यासाठी त्याचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. त्याशिवाय खाते उघडणाऱ्या व्यक्तीकडे स्वित्झर्लंडचा पासपोर्ट असणं अनिवार्य आहे. तसेच स्विस बँकेत खातं उघडताना संबंधित व्यक्तीचा मूळ पत्ता, कमीत कमी ठेव रक्कम, गोपनीयता, कर नियम यांसारख्या बाबींची पडताळणी केली जाते. काही स्विस बँका खातं उघडण्यासाठी किमान ठेव म्हणून १,००,००० किंवा त्याहून अधिक रक्कम मागतात. स्विस बँक गोपनीयतेसाठी प्रसिद्ध असली तरी आता आंतरराष्ट्रीय कायद्यांनुसार पारदर्शकता वाढली आहे. परंतु, या बँकेला जर समजले की, खातेदाराचे उत्पन्न चुकीच्या मार्गाने आलेले आहे, तर बँक अशा व्यक्तीचे खाते रद्द करू शकते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian money in swiss bank in 2024 why india rich people keep money in swiss banks sdp