Indian Navy Launched INS Androth : भारतीय नौदलाच्या ताफ्यात आता पाणबुडीविरोधी छोट्या युद्धनौकेचा समावेश झाला आहे. आयएनएस ‘अँड्रोथ’ ही नौका शनिवारी अधिकृतपणे नौदलाकडे सूपर्द करण्यात आली आहे. कोलकात्यातील गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स (GRSE) कंपनीने या नौकेची निर्मिती केली आहे. ही छोटेखानी युद्धनौका पूर्णपणे स्वदेशी बनावटीची असून, ती उथळ पाण्यात शत्रूशी थेटपणे सामना करू शकते. सध्या चीनकडून हिंदी महासागर क्षेत्रात आपला प्रभाव वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या कुरापतीला आळा घालण्यासाठी भारतीय नौदल प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर ‘अँड्रोथ’सारखी नौका ताफ्यात सामील झाल्याने नौदलाची ताकद वाढणार आहे. पण नक्की आयएनएस ‘अँड्रोथ’मध्ये काय विशेष आहे? तिची वैशिष्ट्ये कोणती? त्याविषयी…
आयएनएस ‘अँड्रोथ’ ही एक पाणबुडीविरोधी छोटेखानी युद्धनौका आहे. लक्षद्वीप केंद्रशासित प्रदेशातील अँड्रोथ बेटावरून तिचे नामकरण करण्यात आले आहे. गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर्स (जीआरएसई) कंपनीकडून भारतीय नौदलाला आठ युद्धनौका दिल्या जाणार आहेत. २०१९ मध्ये संरक्षण मंत्रालय आणि ‘जीआरएसई’ यांच्यात तसा करारही झालेला आहे. त्यातील ‘अँड्रोथ’ ही दुसरी नौका असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. २१ मार्च २०२३ रोजी कोलकाता येथे व्हाईस ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी यांच्या अध्यक्षतेखालील सोहळ्यात या युद्धनौकेचं जलावतरण करण्यात आलं होतं. त्या प्रसंगी माजी भारतीय क्रिकेटपटू अरुण लाल यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. त्यावेळी रिअर ॲडमिरल रविश सेठी यांनी अधिकृतपणे ही युद्धनौका स्वीकारली होती.
आयएनएस ‘अँड्रोथ’मध्ये काय विशेष आहे?
आयएनएस ‘अँड्रोथ’ नौकेची लांबी ७७.६ मीटर असून, तिचे वजन जवळपास ९०० टन आहे. तसेच तिचा कमाल वेग २५ नॉट्स असल्याचं सांगितलं जात आहे. ‘अँड्रोथ’मध्ये गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्सद्वारे निर्मित स्वदेशी ३० मिमी नेव्हल सरफेस गन (NSG) बसवण्यात आली आहे. ही नौका डिझेल इंजिन आणि वॉटरजेटच्या तंत्रज्ञानावर चालते. अत्याधुनिक लाइटवेट टॉर्पेडोज, स्वदेशी पाणबुडीविरोधी रॉकेट्स व शॅलो वॉटर सोनार प्रणालीने ही नौका सुसज्ज आहे. इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंगच्या (IRS) वर्गीकरण नियमांनुसार ‘अँड्रोथ’ची निर्मिती करण्यात आली आहे.
आयएनएस अँड्रोथ नौकेची वैशिष्ट्ये कोणती?
भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झालेली ‘अँड्रोथ’ ही छोटेखानी युद्धनौका तिच्या वैशिष्ट्यांमुळे अधिकच लक्षवेधी ठरते. अत्यंत वेगवान आणि चपळतेने हालचाल करणारी ही नौका आहे. अँड्रोथला केवळ २.७ मीटर ड्राफ्ट (पाण्यात बुडणारा भाग) आवश्यक आहे, ज्यामुळे ती किनारपट्टी भागात सहज प्रवेश करून पाण्याखालील धोक्यांचा शोध घेऊ शकते. डिझेल इंजिन आणि वॉटरजेटच्या संयोजनावर चालणारी ही सर्वांत मोठी नौदल नौका आहे. या नौकेमध्ये लढाऊ व्यवस्थापन प्रणाली बसवण्यात आलेली आहे. तसेच तिच्यात सात अधिकाऱ्यांसह एकूण ५७ कर्मचारी राहू शकतील, अशी सोयही करण्यात आली आहे. ही नौका लढाऊ विमानांबरोबर समन्वय साधून पाणबुडीविरोधी मोहिमा राबवू शकते.
आयएनएस अँड्रोथ नौका कशी तयार करण्यात आली?
अँड्रोथ या छोटेखानी युद्धनौकेमध्ये जवळपास ९० टक्के तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. तिच्या निर्मितीमुळे अनेक भारतीय कामगारांना रोजगार मिळाला आहे. त्याचबरोबर देशाच्या संरक्षण उत्पादन उद्योगालाही चालना मिळाली आहे. या वर्गातील पहिली युद्धनौका मे महिन्यात नौदलाकडे सुपूर्द करण्यात आली होती. जूनमध्ये ती भारतीय नौदलात सामील झाली. भारतीय नौदलाने जीआरएसई आणि कोचीन शिपयार्ड लिमिटेडकडून अशा १६ युद्धनौकांची मागणी केलेली आहे. या युद्धनौकांमुळे भारतीय नौदलाची पाणबुडीविरोधी, किनारपट्टीवरील पाळत ठेवण्याची, सुरुंग पेरण्याची आणि कमी तीव्रतेच्या सागरी मोहिमा (LIMO) चालवण्याची क्षमता वाढणार आहे.
चीनच्या कुरापतीवर भारतीय नौदलाचे लक्ष
भारताने आपल्या विशाल सागरी सीमांचे रक्षण करण्याचा संकल्प पुन्हा अधोरेखित केला आहे. हिंद-प्रशांत प्रदेशातील चीनच्या आक्रमक हालचालींवर भारतीय नौदलाचं बारकाईनं लक्ष आहे. भारत हा ऑस्ट्रेलिया, अमेरिका व जपानसोबत क्वाड गटाचा भाग असून, त्यांनी ‘स्वतंत्र आणि मुक्त’ हिंदी-प्रशांत क्षेत्रासाठी लढण्याचं वचन दिलं आहे. “हा टप्पा म्हणजे गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्सच्या सातत्यपूर्ण विश्वासार्हता आणि स्वदेशीकरण यांच्या ध्येयासाठीच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे. या युद्धनौकांमध्ये सुमारे ८८ टक्के स्वदेशी तंत्रज्ञान आहे. हे ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘मेक इन इंडिया’ या सरकारच्या दृष्टिकोनाशी निष्ठा दर्शवतं,” असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.
हेही वाचा : विदेशी न्यायालयाचा घटस्फोटाचा निर्णय भारतात गैरलागू; कारण काय? उच्च न्यायालयाने नेमके काय म्हटले?
आणखी वाढणार भारतीय नौदलाची ताकद
गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स कंपनीकडून आणखी १३ युद्धनौका तयार केल्या जात आहेत, ज्यामध्ये दोन ‘पी १७ ए’ प्रगत स्टेल्थ फ्रिगेट, सहा पाणबुडीविरोधी युद्धनौका, एक मोठे सर्वेक्षण जहाज व चार पुढील पिढीच्या ऑफशोर पेट्रोलिंग युद्धनौकांचा समावेश आहे. त्याव्यतिरिक्त शिपयार्ड आणखी २६ जहाजे बांधत आहे, त्यापैकी नऊ जहाजांचा वापर वस्तूंच्या निर्यातीसाठी केला जाणार आहे. या आर्थिक वर्षात पुढील पिढीचे पाच कॉर्व्हेट्स बांधण्यासाठीचा प्रतिष्ठित करारही पूर्ण होईल, अशी अपेक्षा ‘गार्डन रीच शिपबिल्डर्स कंपनी’ला आहे. या नव्या प्रकल्पांमुळे भारताची समुद्री सुरक्षा आणखी मजबूत होणार असून, हिंद महासागर प्रदेशात चीनच्या वाढत्या प्रभावाला भारत प्रभावी उत्तर देऊ शकणार आहे.