दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने कुख्यात शस्त्र तस्कर शेख सलीम ऊर्फ समील पिस्तूल याला नेपाळमधून अटक केली. पिस्तूल याच्या ठावठिकाणाची गुप्त माहिती मिळाल्यानंतर या विशेष पथकाने त्याला अटक केली. प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्येमध्ये पिस्तूल याचा सहभाग होता असा पोलिसांचा संशय आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी शस्त्र पुरविल्याचादेखील संशय सलीमवर आहे. भारतातील मोस्ट वाँटेड शस्त्रास्त्रांची तस्करी करणारा सलीम पिस्तूल हा २०१८ पासून फरार होता. तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारतात झिगाना पिस्तूल पहिल्यांदा सलीमनेच आणल्या होत्या. तसंच अनेक गुंडांना त्याने त्या पुरविल्या होत्या.

सलीमचा आयएसआयशी संबंध?

सलीमचे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय आणि डी कंपनीच्या अंडरवर्ल्ड नेटवर्कशी खोलवर संबंध असल्याचा पोलिसांचा सशय आहे. पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्येमध्ये तो एक आरोपी आहे. शिवाय राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणीही सलीमचे नाव समोर आले होते. गेल्या काही वर्षांत सलीमने लॉरेन्स बिष्णोई आणि हाशिम बाबा यांच्यासह अनेक हाय-प्रोफाइल गुन्हेगारांना शस्त्रे पुरविली. पाकिस्तानमधून भारतात अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची तस्करी करण्यात तो एक महत्त्वाचा दुवा होता.

सलीमची गुन्हेगारीची कारकीर्द

दिल्लीतील सीलमपूर इथला रहिवासी असलेल्या सलीमने आर्थिक अडचणींमुळे आठवीनंतर शाळा सोडली. त्यानंतर त्याच्या गुन्हेगारी कारकि‍र्दीची सुरुवात एका कारचोरीपासून झाली. एप्रिल २००० मध्ये सलीम आणि त्याचा सहकारी मुकेश गुप्ता यांनी चांदणी चौकातून एक कार चोरली. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली होती.

२०११ दरम्यान सलीमने काही काळ ड्रायव्हर म्हणून काम केले. त्याने दिल्लीच्या जाफराबादमध्ये एका सशस्त्र दरोड्यात भाग घेतला. त्यात त्याने २० लाख रुपये लुटले. २०१३ मध्ये त्याला अटक करण्यात आली आणि न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आलं. २०१८ पर्यंत तो मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रांच्या व्यापारात सामील झाला. मात्र, त्याचवर्षी त्याला अटक झाली. तरी तो जामीनावर बाहेर पडला आणि त्याने थेट परदेशात पळ काढला. सलीमचे १९९२ मध्येच लग्न झाले होते आणि त्याला दोन मुलेही आहेत.

सलीम हा पाकिस्तानातून बेकायदा भारतात शस्त्रास्त्रांची तस्करी करत होता. त्याचे पाकिस्तानी दहशतवादी संघटना तसंच दाऊद टोळीशीही संबंध असल्याचे पुरावे तपास यंत्रणेच्या हाती लागले आहेत.

झिगाना पिस्तूल नेटवर्क

सलीमने तुर्कीये बनावटीच्या झिगाना पिस्तूल पहिल्यांदा भारतात आणल्या. या पिस्तूलला भारतीय गुन्हेगारांमध्ये पसंतीचे शस्त्र बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. बुलंदशहरमधील खुर्जा इथल्या दोन भावांसोबत काम करून त्याने या पिस्तूल भारतात पोहोचवल्या.

ही शस्त्रे पाकिस्तानातून नेपाळमध्ये येत असत आणि त्यानंतर भारतात आणली जात. शस्त्रांचा ठावठिकाणा लागू नये म्हणून सलीमकडून पिस्तूल वेगवेगळ्या भागांमध्ये मोडून वाहनांमध्ये खास बदल केलेल्या डब्यांमध्ये लपवले जात होते. भारतात आल्यानंतर ते पुन्हा जोडून विकले जात असे. नेपाळमार्गे तस्करी केलेले झिगाना पिस्तूल सुमारे सहा लाख रुपयांना विकले जाते, तर ड्रोनद्वारे भारतात आणलेले पिस्तूल सुमारे ४ लाख रुपयांना विकले जाते.

प्रमुख टोळ्या आणि हत्येशी संबंध

सलीमने आतापर्यंत दिल्ली-एनसीआर आणि देशाच्या इतरही भागांमध्ये गुन्हेगारी टोळ्यांना कोट्यवधी रुपयांची शस्त्रे पुरवली आहेत. पोलिस चौकशीदरम्यान हाशिम बाबा टोळीशी त्याचे जवळचे संबंध असल्याचे सिद्ध झाले. सलीमच्या तस्करीच्या नेटवर्कमध्ये मोठ्या हत्यांचा समावेश आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील एक आरोपी भागवत सिंग याने राजस्थानच्या उदयपूर इथून शस्त्र मुंबईत आणून मारेकऱ्यांना पुरवली होती. या गुन्ह्यात सलीमचा हात असल्याचे याआधीही उघड झाले आहे. त्यानेच ही शस्त्रास्त्रे राजस्थानपर्यंत पोहोचवल्याचा पोलिसांचा संशय आहे. सलीम याच्या अटकेमुळे यासारख्या अनेक रॅकेट्सचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे. माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर २०२४ रोजी वांद्रे येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. लॉरेन्स बिष्णोई टोळीने ही हत्या घडवून आणली होती असे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणात आतापर्यंत २६ जणांना अटक करण्यात आली आहे. फरार आरोपींमध्ये अनमोल बिष्णोई, मोहम्मद यासीन अख्तर, शुभम लोणकर यांचा समावेश आहे.
सध्या सलीम पिस्तूल याचे आयएसआयशी संबंध, दाऊदशी संबंधांबाबत आणि अनेक हत्या आणि शस्त्रास्त्रांच्या तस्करीच्या प्रकरणात नेमकी भूमिका काय होती याबाबत तपास सुरू आहे.