Jayant Narlikar Cricket Fan : आपल्या सहजसोप्या लेखनातून सर्वसामान्यांना विज्ञानाची गोडी लावणारे ज्येष्ठ शास्त्रज्ञ, लेखक डॉ. जयंत विष्णू नारळीकर यांचे मंगळवारी (२० मे) वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. आज बुधवारी डॉ. नारळीकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. डॉ. नारळीकर यांचे क्रिकेटवरही अमाप प्रेम होते. १९४० च्या दशकात प्राथामिक शाळेत शिक्षण घेत असताना त्यांना क्रिकेटची गोडी लागली होती. बनारस हिंदू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये डॉ. नारळीकर मोठे झाले. त्यांचे वडील विष्णू नारळीकर गणिताचे प्राध्यापक होते. क्रिकेट हा माझा आवडता खेळ होता, असं डॉ. नारळीकर यांनी या वर्षी मार्च महिन्यात लिहिलेल्या त्यांच्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.

लॉर्ड्सच्या मैदानावर जाऊन बघितला सामना

केंब्रिज विद्यापीठात शिक्षण घेत असताना डॉ. जयंत नारळीकर यांच्या आयुष्यात एक अविस्मरणीय क्षण आला आणि तो म्हणजे त्यांना इंग्लंडमधील लॉर्ड्स या ऐतिहासिक मैदानावर एक सामना पाहण्याची संधी मिळाली. हे सगळं एका विलक्षण योगायोगामुळे घडलं, असं डॉ. नारळीकर यांनी त्यांच्या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे. जून ते ऑगस्ट १९५९ दरम्यान, दत्त गायकवाड (भारतीय सलामीवीर अंशुमन गायकवाड यांचे वडील) यांच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंड दौरा केला होता. पहिला कसोटी सामना नॉटिंगहॅम येथे झाला. इंग्लंडने हा सामना एक डाव आणि ५९ धावांनी जिंकला. दुसरा कसोटी सामना १८ जूनपासून लॉर्ड्सवर सुरू झाला. भारताने आपल्या पहिल्या डावात १६८ धावा केल्या, ज्यामध्ये नरी कॉन्ट्रॅक्टरने ८१ धावा केल्या. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडची अवस्था तीन बाद ५० अशी होती.

असं मिळालं लॉर्ड्सवरील सामन्याचं मोफत तिकीट

जयंत नारळीकर यांनी दुसऱ्या दिवसाचा खेळ पाहण्यासाठी लॉर्ड्सच्या मैदानावर जायचं ठरवलं. ९० मिनिटांच्या रेल्वे प्रवासानंतर ते सामना सुरू होण्याआधी मैदानाजवळ पोहोचले; पण बराच वेळ शोध घेऊनही त्यांना तिकीट काउंटर सापडलं नाही. अखेर त्यांनी लंडनच्या एका पोलिस अधिकाऱ्याकडे मदत मागितली. त्या पोलिस अधिकाऱ्यानं डॉ. नारळीकर यांना एक बंद लिफाफा दिला. त्यांनी ते उघडून बघितला असता, त्यामध्ये सामन्याचं तिकीट होतं, जे त्यांना मोफत मिळालं. डॉ. नारळीकर यांना नंतर कळलं की, एका अज्ञात व्यक्तीनं हे तिकीट संबंधित पोलिस अधिकाऱ्याकडे दिलं होतं. कुणी गरजू भारतीय विद्यार्थी भेटला, तर त्याला मोफत तिकीट देण्यात यावं, असं त्या व्यक्तीनं सांगितलं होतं.

आणखी वाचा : Pakistan Terrorists : कोण आहे आमिर हमजा? त्याच्यावर हल्ला कुणी केला? भारताच्या कट्टर शत्रूंना कोण संपवतंय?

डॉ. नारळीकरांनी सांगितला तो अनुभव

“तिथे डझनभर पोलिस उपस्थित होते. परंतु, मी नेमकं तिकीट असलेल्या त्याच पोलिस अधिकाऱ्याकडे गेलो, ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट होती”, असं डॉ. नारळीकर यांनी त्यांच्या ‘My Flirtations With Cricket’ या ब्लॉगमध्ये लिहिलं आहे. लॉर्ड्सवर झालेल्या या कसोटी सामन्यात भारताची कामगिरी मात्र खराब झाली. इंग्लंडनं पहिल्या डावात २२६ धावा केल्या. भारताचा दुसरा डाव केवळ १६५ धावांत आटोपला. इंग्लंडनं दोन गड्यांच्या मोबदल्यात १०८ धावांचं लक्ष्य गाठलं आणि मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.

लीड्समध्ये प्राध्यापकांना पाहून बसला धक्का

जुलै १९६५ मध्ये डॉ. जयंत नारळीकर हे लीड्स विद्यापीठाच्या भेटीस गेले होते, जिथे त्यांचे मित्र कुमार चित्रे यांनी त्यांना आमंत्रित केलं होतं. १९८९ पासून कसोटी सामने होणाऱ्या हेडिंग्ले मैदानाला भेट देण्याची नारळीकरांची इच्छा होती. योगायोगानं त्यावेळी न्यूझीलंड संघ इंग्लंडच्या दौर्‍यावर होता. दोन्ही संघांमधील तिसरा कसोटी सामना ८ जुलैपासून लीड्स येथे सुरू होणार होता. नारळीकर आणि चित्रे यांनी मैदानावर जाऊन हा सामना पाहण्याचं ठरवलं. परंतु, चित्रे यांना रजा मिळविण्यात अडचण येत होती. त्यांचे विभागप्रमुख प्रा. टी. जी. काउलिंग यांना रजा मागणं चित्रे यांना कठीण वाटत होतं. पण, अखेर त्यांना रजा मिळाली आणि दोघंही सामना बघण्यासाठी मैदानावर पोहोचले. तिथे गेल्यानंतर दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसला. कारण- प्रा. काउलिंग हेदेखील तिथे सामना बघण्यासाठी आले होते. ते दोन रांगा सोडून पुढे बसले होते आणि खेळाडूंना उत्साह मिळावा यासाठी टाळ्या वाजवत होते.

हेही वाचा : Operation Sindoor : शशी थरूर यांच्या निवडीवरून वाद कशासाठी? काँग्रेसच्या आक्षेपाचे कारण काय?

पाकिस्तानवर दाखवलेली दया भारताला पडली महागात

केंब्रिज विद्यापीठात असताना डॉ. नारळीकर थेट मैदानावर उतरून क्रिकेटचा सामना खेळला. तेथील भारतीय संशोधन विद्यार्थ्यांनी एक क्रिकेट संघ तयार केला होता, जो चर्चिल कॉलेजच्या मैदानावर पाकिस्तानच्या विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्ण सामने खेळत होता. या संघाचं नेतृत्व कुमार चित्रे करीत होते, जे फिरकी गोलंदाज होते. जयंत नारळीकर स्वतः लेग स्पिन गोलंदाजी करीत. एका मैत्रीपूर्ण सामन्यात, पाकिस्तानकडे पूर्ण संघासाठी पुरेसे खेळाडू नव्हते. त्यामुळे नारळीकर यांनी त्यांचे एक ब्रिटिश सहकारी – जॉन फॉकनर यांना पाकिस्तानकडून खेळण्यास सांगितलं. परंतु, हा दयाळूपणा भारतीय संघाला चांगलाच महागात पडला. कारण फॉकनरच्या कामगिरीमुळे त्या दिवशी भारताला पराभवाचा सामना करावा लागला, असं नारळीकरांनी आठवणीत लिहिलं आहे.

संपूर्ण खगोलविज्ञान मराठीतून मांडण्याची किमया

‘आकाशाशी जडले नाते’ या माहिती ग्रंथातून संपूर्ण खगोलविज्ञान अत्यंत सोप्या भाषेत मराठीतून मांडण्याची किमया डॉ. नारळीकर यांनी केली. या पुस्तकाला अमाप प्रसिद्धी मिळालीच; पण त्याद्वारे अंतराळात घडणाऱ्या घडामोडी मराठी वाचकांच्या घराघरात पोहोचल्या. अनेक विज्ञान कादंबऱ्या आणि कथांच्या माध्यमातून आबालवृद्धांमध्ये त्यांनी विज्ञानाविषयी कुतूहल निर्माण केलं. विज्ञान केंद्रस्थानी ठेवून कथा-कादंबऱ्यांची रचना करताना विज्ञानाच्या कोणत्याही सिद्धांताला धक्का लागणार नाही, याची काळजी त्यांनी सातत्यानं घेतली. त्यामुळेच त्यांच्या या साहित्याचे इतकं स्वागत वाचकांकडून झालं. दरम्यान, दोन आठवड्यांपूर्वी पडल्यामुळे डॉ. नारळीकर यांना दुखापत झाली होती. मंगळवारी (तारीख २० मे) त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.