Premium

विश्लेषण : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिवाजी महाराजांच्या ज्या नौदलाची प्रशंसा केली ते होतं तरी कसं?

मोदींनी प्रशंसा केलेलं शिवाजी महाराजांचं नौदल नेमकं कसं होतं? त्याचं वैशिष्ट्य काय, त्यांच्या यशस्वी मोहिमा कोणत्या या सर्वांचा हा आढावा…

Shivaji-Modi
शिवाजी महाराजांचं नौदल नेमकं कसं होतं याचा आढावा… (छायाचित्र – नरेंद्र मोदी एक्स अकाऊंट)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनी सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण केलं आणि त्यांना अभिवादन केलं. यावेळी मोदींनी शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या नौदलाचं महत्त्व अधोरेखित केलं. या पार्श्वभूमीवर मोदींनी प्रशंसा केलेलं शिवाजी महाराजांचं नौदल नेमकं कसं होतं? त्याचं वैशिष्ट्य काय, त्यांच्या यशस्वी मोहिमा कोणत्या या सर्वांचा हा आढावा…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठा नौदल आणि भारतीय नौदल

भारतीय नौदलाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील आणि नंतरच्या काळातील मराठ्यांच्या सागरी पराक्रमाचा कायमच आदर केलाय. त्यामुळे भारतीय नौदलाने लोणावळ्यातील आपल्या प्रशिक्षण केंद्राला आयएनएस शिवाजी असं नाव दिलं. तसेच मुंबईतील पश्चिम नौदल कमांडच्या केंद्राला प्रसिद्ध मराठा नौदल कमांडर कान्होजी आंग्रे (१६६९-१७२९) यांच्या नावावरून आयएनएस आंग्रे हे नाव दिलं.

भारतीय नौदलाच्या नव्या चिन्हावरही शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेप्रमाणे अष्टकोनी रचनेचा वापर करण्यात आला आहे. भारतीय नौदलाच्या दस्तऐवजात शिवाजी महाराजांना सुरक्षित किनारपट्टीचं आणि पश्चिम कोकण किनारपट्टीचे सिद्दींच्या हल्ल्यांपासून संरक्षण करण्याचं महत्त्व लक्षात आल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

शिवाजी महाराजांचं नौदल

शिवाजी महाराजांचे साम्राज्य १६५६-५७ नंतर पश्चिम किनारपट्टीपर्यंत पोहोचले. त्यावेळी त्यांनी सिद्दींपासून आपल्या राज्याचे रक्षण करण्यासाठी नौदल स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बंदरे आणि व्यापारी जहाजे सुरक्षित झाली आणि सागरी व्यापार सुरळीत झाला. त्यातून राज्याचा महसूल वाढला. जो समुद्रावर राज्य करतो तो सर्वशक्तिमान आहे या विचारातून शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्याची नौदल शाखा स्थापन केली.

१६६१ ते १६६३ या काळात मराठा नौदल निर्माण झालं आणि ते शिखरावर असताना या नौदलात विविध प्रकारचे आणि आकारांचे ४०० जहाजं होती. यामध्ये मोठ्या युद्धनौका आणि गुरब, तरांडे, गलबत, शिबाड आणि पाल यासारख्या वेगवेगळ्या आकाराच्या आणि वेगवेगळ्या उद्देशांसाठी तयार करण्यातआलेल्या जहाजांचा समावेश होता.

बी के आपटे यांच्यानुसार शिवाजी महाराजांनी ८५ जहाजांसह कर्नाटकमधील कुंदापुराजवळ बसुरूवर हल्ला चढवला आणि त्यांना पहिलं यश मिळालं. या मोहिमेत त्यांना मोठी लूट मिळाली. १६५३ ते १६८० या काळात शिवाजी महाराजांनी अनेक जलदुर्ग बांधण्याचे आदेश दिले. याची सुरुवात १६५३ मध्ये विजयदुर्ग बांधण्यापासून झाली. त्यानंतर सिंधुदुर्ग आणि कुलाबा किल्ल्यांचं बांधकाम झालं.

या किल्ल्यांपैकी बहुतांश किल्ले अजिंक्य राहिले. त्यांचा उपयोग समुद्रमार्गे येणाऱ्या शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी करण्यात आला. १६५७ पर्यंत उत्तर कोकणातील कल्याण आणि भिवंडी हे बिजापूर प्रदेशाचा भाग शिवाजी महाराजांच्या ताब्यात आले. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही नौदल प्रमुख आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली मराठा नौदल एक शक्तिशाली सैन्य म्हणून काम करत राहिलं.

शिवाजी महाराजांच्या नौदलाच्या मर्यादा

शिवाजी महाराजांनी नौदलाची स्थापना करून अतुलनीय लष्करी चतुराई दाखवली. नौदल स्थापन करताना त्यांचा मर्यादित हेतू जलदुर्गावरून जमिनीवर नियंत्रण ठेवणं आणि जंजिर्‍याच्या लुटारू सिद्दींचा मुकाबला करणं हा होता, असं इतिहासकार अनिरुद्ध देशपांडे आणि मुफीद मुजावर यांनी त्यांच्या ‘मराठा नेव्ही, द राइज अँड फॉल ऑफ अ ब्राउन वॉटर नेव्ही’ (२०२१) या पुस्तकात म्हटलं आहे. त्यामुळेच मराठा नौदलाने कधीही युरोपीयन नौदलाला आव्हान दिलं नाही. शिवाजी महाराजांच्या नौदलाने स्वत:चे संरक्षण करण्याची शक्ती असतानाही पश्चिम आशियाकडे जाताना इतर व्यापारी जहाजांप्रमाणेच पोर्तुगीजांना विशेष कर भरला. पोर्तुगीज सत्तेच्या ऱ्हासानंतर या समुद्राचं नियंत्रण ब्रिटीशांकडे गेले. त्याच रॉयल नेव्हीच्या जीवावर ब्रिटिशांनी त्यांचे साम्राज्य उभारले, असं अनेक इतिहासकारांनी सांगितलंय. दुर्दैवाने मराठ्यांकडे त्यांच्याशी सामना करण्याची शस्त्रसामुग्री नव्हती.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Know about maratha navy of chhatrapati shivaji maharaj pm narendra modi pbs

First published on: 07-12-2023 at 13:12 IST
Next Story
विश्लेषण: ‘जनरेशन झी’चा लाडका ‘रिझ’ कसा ठरला ऑक्सफर्डचा ‘वर्ड ऑफ द इयर’?