राखी चव्हाण

मानव आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाने एक ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’वर आधारित उपाय शोधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच ‘मन की बात’मध्ये, हा प्रयोग जगात प्रथमच होत असल्याचा उल्लेख केला…

याच प्रकल्पात हा प्रयोग का?

चंद्रपूर जिल्ह्यातील सुमारे ९०० गावे जंगलव्याप्त आहेत. त्यामुळे बाराही महिने येथे मानव-वन्यजीव संघर्ष सुरू असतो. या गावांमध्ये कायम वन्यप्राण्यांची दहशत असते. संरक्षण व संवर्धनामुळे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प तसेच लगतच्या परिसरात वाघ आणि बिबट्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे हा संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यात सुमारे ५० लोक मागील वर्षात मृत्युमुखी पडले, तर त्याहून अधिक पाळीव जनावरांचा देखील मृत्यू झाला. गेल्या दहा वर्षांतला हा उच्चांक आहे. उन्हाळ्यात हा संघर्ष आणखी शिगेला पोहोचतो. त्यामुळे हा संघर्ष टाळण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा- ‘आर्टिफिशियल इन्टेलिजन्स’चा (एआय) वापर करून जंगल आणि गावांमध्ये आभासी भिंत तयार करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : ‘इंटरपोल’च्या नोटिसांचा वापर राजकीय हेतूने केला जातो? या संस्थेचं नेमकं काम काय? जाणून घ्या…

आभासी भिंत कशी असेल?

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली बफर क्षेत्रातील सीताराम पेठ या गावात आभासी भिंतीचा प्रयोग राबवण्यात आला आहे. या गावाभोवती सहा कॅमेरे आणि संवेदक (सेन्सर) वापरून ‘आभासी’ संरक्षक भिंत तयार करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांत या व्याघ्र प्रकल्पात मानव-वन्यजीव संघर्ष वाढल्याने मोठ्या प्रमाणात वन विभागाचे मनुष्यबळ आणि निधी हा संघर्ष थांबवण्यासाठी खर्च होत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या आभासी भिंती माणूस आणि वन्यप्राण्यांना एकमेकांपासून दूर ठेवण्यास मदत करतील, वाघ, बिबट आणि अस्वल हे प्राणी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेजवळ आल्यास ते वनरक्षकांना सतर्क करतील. यामुळे संघर्षाचा धोका टळेल. या उद्देशाने हा प्रयोग करण्यात आला आहे.

आभासी भिंतीमुळे काय होणार?

जंगलालगतच्या गावासभोवताली असलेल्या आभासी भिंतीच्या आत जंगली जनावर शिरताच एकीकडे वन खात्याला त्याची माहिती मिळते, तर दुसरीकडे संवेदकाच्या मदतीने भोंगा (सायरन) वाजल्यामुळे गावकरीसुद्धा सजग होतात. हा सायरन वाजताच गावकरी, शेतकरी आणि गुराखी तातडीने सुरक्षित जागेचा आश्रय घेतात. त्यामुळे होणारा संघर्ष टाळणे सहज शक्य होते. यात शेतकरी, गावकरी यांचा जीव वाचतो. तसेच गावातील पाळीव जनावरांनादेखील वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातून वाचवता येते. शेतपिकांचे नुकसान टाळले जाते. जंगलाबाहेर उभारलेल्या आभासी कुंपणातील थर्मल लहरींच्या आधारे वाघ, बिबट्यांच्या आगमनाचा इशारा मिळेल. जंगलातून एखादा वाघ गाव-शहराकडे निघाला तर थर्मल लहरींद्वारे इशारा मिळेल.

हेही वाचा >>> बिटकॉइन हॉल्व्हिंग म्हणजे काय आणि क्रिप्टोसाठी त्याचा अर्थ काय?

यंत्रणेचा तपशील काय, खर्च किती?

ही प्रणाली नियुक्त वन अधिकाऱ्यांना ईमेल आणि संदेशच्या स्वरूपात अलर्ट देण्यास सक्षम असेल. या प्रणालीमार्फत प्रतिमा पाठवल्या जातील. तसेच तारीख, वेळ आणि प्राण्यांच्या वर्गीकरणासह क्लाउडवर संग्रहित केल्या जातील. या संदर्भात वनाधिकारी आणि ग्रामस्थांसाठी एक ‘वेब अॅप्लिकेशन’ आणि डॅशबोर्डसह भ्रमणध्वनी अॅप्लिकेशन तयार केले आहे. यासाठी गावात आणि परिसरात अनेक कॅमेरे, खांब, इंटरनेट यंत्रणा आणि सौरऊर्जा मॉड्युल बसवण्यात येत आहेत. ग्रामस्थांना सावध करण्यासाठी सायरन वाजवणारी यंत्रणाही बसविण्यात येणार आहे. एका गावात ही यंत्रणा उभारण्यासाठी सुमारे ३० लाख रुपये खर्च आहे.

ही यंत्रणा किती गावांत उभारणार?

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या पाच गावांमध्ये ही यंत्रणा कार्यरत असून आणखी पाच गावांमध्ये ती लवकरच सुरू होणार आहे. वाघ-बिबटयांचे वाढते हल्ले व लोकप्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर वन खात्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत वाघ-बिबट्यांच्या आगमनाचा अलर्ट देण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेण्याची योजना आखली होती. त्यानुसार ताडोबा व्याघ्र प्रकल्पाबाहेरील काही गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधार घेत वाघांच्या आगमनाची सूचना देणारी यंत्रणा लावण्यात येत आहे.

प्रयोगाचे परिणाम काय?

आभासी भिंतीचे आश्वासक परिणाम दिसू लागले आहेत. संवेदक (सेन्सर) बसवल्यापासून वनरक्षकांनी मानव-वन्यजीव संघर्षाच्या घटना नोंदवण्याचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसत आहे. हा प्रकल्प अभयारण्याच्या अधिक क्षेत्रांना व्यापण्यासाठी वाढवला जाण्याची अपेक्षा आहे. जगभरातील इतर वन्यजीव अभयारण्यांसाठी ते एक प्रतिरूप (मॉडेल) म्हणून काम करू शकेल.

rakhi.chavhan@expressindia.com