चिन्मय पाटणकर

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) नववी ते बारावीच्या शैक्षणिक आराखडयात नव्या धोरणानुसार बदल करण्याचे नियोजन केले आहे. यातून दहावी/ बारावीचा अभ्यास वाढेल का?

सीबीएसईत श्रेयांक पद्धत कशासाठी?

व्यावसायिक आणि सर्वसाधारण शिक्षणामध्ये समकक्षता आणणे, दोन शिक्षण पद्धतींमध्ये समन्वय आणणे हा श्रेयांक (अकॅडमिक क्रेडिट) पद्धतीचा उद्देश आहे. या पद्धतीची शिफारस राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०मध्ये करण्यात आली होती. या श्रेयांक पद्धतीची अंमलबजावणी करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) गेल्यावर्षी राष्ट्रीय श्रेयांक आराखडा सादर केला. व्यावसायिक शिक्षणाचा समावेश शालेय आणि उच्च शिक्षणात करण्यासाठी राष्ट्रीय श्रेयांक आराखडा उपयुक्त आहे. या आराखडयानुसार नववीतून दहावीत जाण्यासाठी विद्यार्थ्यांला काही ठरावीक श्रेयांक प्राप्त करावे लागतील. तसेच पदवीपूर्व अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठीही विद्यार्थ्यांला पुरेसे श्रेयांक मिळवावे लागतील. विद्यार्थ्यांने मिळवलेले श्रेयांक अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटमध्ये डिजिटल पद्धतीने साठवले जातील. तसेच ते ‘डिजिलॉकर’ खात्याद्वारे वापरता येतील. श्रेयांक पद्धतीची अंमलबजावणी संलग्नित शाळांमध्ये करणे, तसेच सध्याचा आराखडा राष्ट्रीय श्रेयांक आराखडयानुसार करणे यासाठी सीबीएसईने २०२२मध्ये उपसमितीची स्थापना केली होती.

हेही वाचा >>> विश्लेषण : ‘भारतरत्न’च्या मागे फायद्याचं राजकारण? या पुरस्काराचा इतिहास नेमका कसा राहिला आहे? जाणून घ्या…

उपसमितीने काय बदल सुचवले?

सध्याच्या शालेय शिक्षण, अभ्यासक्रमात श्रेयांक पद्धत नाही. मात्र सीबीएसईच्या नियोजनानुसार शैक्षणिक वर्ष १२०० तासांचे आणि ४० श्रेयांकांचे करण्यात येणार आहे. हे १२०० तास म्हणजे विद्यार्थ्यांने अपेक्षित निष्पत्ती साध्य करण्यासाठी दिलेला वेळ आहे. म्हणजेच एखाद्या विषयासाठी वर्षभरात काही ठरावीक तास दिले जातील. या १२०० शिक्षणाच्या तासांमध्ये शाळेतील शिक्षण आणि शाळेबाहेरील अनुभव शिक्षणाचा समावेश असेल. त्यानुसार विद्यार्थ्यांना प्रत्येक विषय शिकवण्याचे तास आणि श्रेयांक निश्चित केले जातील. या अनुषंगाने समितीने सध्याच्या विषयांसह बहुविद्याशाखीय आणि व्यावसायिक विषय समाविष्ट करण्यावर भर दिला आहे. अंतिम परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी नववी आणि दहावीतील विद्यार्थ्यांना १० विषय पूर्ण करावे लागतील. त्यात तीन भाषा आणि अन्य सात विषय असतील. सध्या नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना पाच विषय घ्यावे लागतात. त्यातील तीन मुख्य विषय आणि दोन भाषा असतात. आता सक्तीच्या तीन भाषांपैकी दोन भाषा भारतीय भाषांपैकी असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी अशा भाषा विद्यार्थी निवडू शकतात. त्याशिवाय गणित, समाजशास्त्र, विज्ञान, कला शिक्षण, शारीरिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, पर्यावरण शिक्षण असे सात विषय असतील. अकरावी आणि बारावीसाठी विद्यार्थ्यांला सहा विषय शिकावे लागतील. त्यात दोन भाषा आणि चार विषयांसह एक पर्यायी विषय असेल. दोन भाषांपैकी एक भाषा भारतीय असणे आवश्यक आहे. सध्याच्या ‘सीबीएसई’ पद्धतीमध्ये बारावीला एक भाषा आणि चार विषयांमध्ये उत्तीर्ण व्हावे लागते.

हेही वाचा >>> नझूल जमिनीवरील अवैध बांधकामामुळे उत्तराखंडमध्ये हिंसाचार, पण ‘नझूल जमीन’ म्हणजे काय? वाचा सविस्तर…

प्रस्तावित पद्धतीत परीक्षा कशा होतील?

विद्यार्थ्यांनी परीक्षेत मिळवलेले गुण आणि प्राप्त केलेले श्रेयांक स्वतंत्र असतील. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सीबीएसईकडून तीन भाषा, गणित, समाजशास्त्र, विज्ञान आणि पर्यावरण शिक्षण या विषयांची परीक्षा घेतली जाईल. तर कला शिक्षण, शारीरिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण यासाठी सीबीएसईची परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापन असे मिश्रण असेल. मात्र पुढील वर्गात जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्व दहा विषयांत उत्तीर्ण व्हावे लागेल. बारावीसाठी सर्व विषयांची चार गटांत विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार भाषा विषयांचा पहिला गट असेल. दुसऱ्या गटात कला शिक्षण, समाजशास्त्र आणि व्यावसायिक शिक्षण आहे. तिसऱ्या गटात समाजशास्त्र आणि चौथ्या विषयात गणित, विज्ञानाचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना किमान दोन भाषा, चार मुख्य विषय, एक पर्यायी विषय निवडावा लागेल. भाषा, गट तीन आणि चारसाठी बाह्य परीक्षा असेल. विद्यार्थ्यांने गट दोनमधील विषय निवडल्यास अंतर्गत मूल्यमापन आणि परीक्षा अशा मिश्र पद्धतीने परीक्षा घेतली जाईल.

सध्याच्या पद्धतीचे काय होणार?

सध्या सीबीएसई संलग्नित शाळांतील विद्यार्थ्यांचे मूल्यमापन विद्यार्थ्यांनी परीक्षेत मिळम्वलेल्या गुणांच्या आधारे केले जाते. श्रेयांक पद्धतीमुळे ही पद्धत बदलणार नाही. प्रत्येक विषयासाठी विद्यार्थ्यांना ए१ ते ई अशी श्रेणी दिली जाईल. विद्यार्थ्यांची क्रमवारी करून श्रेणी दिली जाईल.

chinmay.patankar@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta analysis changes in cbse educational plan print exp zws