दत्ता जाधव

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

देशभरात अंडयांच्या दरांत वाढ झाली आहे. ती का झाली, अंडयांच्या उत्पादनात घट झाली आहे का,  या दरवाढीचा कुक्कुटपालन व्यवसायाला फायदा होतो आहे का, याविषयी..

अंडयांच्या दराची सद्य:स्थिती काय ?

पुणे शहरात सद्य:स्थितीत अंडयांचा दर शेकडा ६८० ते ७०० रुपये इतका आहे, म्हणजे प्रति अंडयाचा दर ६.८० रुपये ते ७.० रुपये इतका आहे. राष्ट्रीय अंडी समन्वय समितीने (एनईसीसी) दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी, ९ जानेवारी रोजी प्रति शेकडा अंडयाचा भाव अहमदाबादमध्ये ६३० रुपये, बेंगळूरुमध्ये ५७५, चेन्नईत ५९० रुपये, कोलकातामध्ये ६२५, मुंबईत ६२० रुपये, वाराणसीत ६३३ रुपये, रांचीत ६२९ रुपये आणि लखनौमध्ये ६६० रुपये इतका दर होता. ३ जानेवारी ते ६ जानेवारी दरम्यान अंडयांचे दर प्रति शेकडा सरासरी ६४२ ते ६८० रुपयांवर गेले होते. किरकोळ बाजारात अंडी सात रुपये प्रति नग दराने विकली जात होती. डिसेंबर २०२३ अखेरीस अंडयांचे प्रति शेकडा दर सरासरी ५८७ ते ६३० रुपये इतका होता. आठवडाभरात साधारण ५० पैसे ते एक रुपयांपर्यंत दरवाढ झाली आहे.

हेही वाचा >>> ‘घरबसल्या पैसे कमवा’च्या नावाने नेमकी कशी फसवणूक होते? काय काळजी घ्यावी?

अंडयांच्या उत्पादनात घट का झाली?

राज्यात दररोज सरासरी १.५० कोटी अंडयांचे उत्पादन होते. मात्र सद्य:स्थितीत अंडी उत्पादन १.२५ कोटींवर आले आहे. राज्यात दररोज ७० ते ८० लाख अंडी आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातून येतात. देशात दररोज सुमारे २८ कोटी अंडयांचे उत्पादन होते. पण, देशाची दररोजची गरज ३२ कोटी इतकी आहे. पण, देशाच्या विविध भागांत साजरे होणारे सण-उत्सव, व्रत-वैकल्यांमुळे अंडयांची मागणी आणि उत्पादनात मेळ बसतो. हिवाळयात दरवर्षी अंडयांची मागणी वाढून त्यांच्या दरात वाढ होते. तर उन्हाळयात मागणी कमी होऊन त्यांचे दर पडतात. आपल्या देशातील अंडयांची गरज भागल्यानंतर  दर महिन्याला २० ते २५ कंटनेरमधून सुमारे २.२५ कोटी अंडयांची बांगलादेश, श्रीलंका या देशांमध्ये आणि आखाती देशांमध्ये निर्यात होते.

कुक्कुटपालकांना फायदा होतोय का?

कुक्कुटपालकांसाठी २०२३ हे वर्ष अत्यंत अडचणीचे, संकटांचे आणि आर्थिक नुकसान करणारे ठरले. उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळाल्यामुळे वर्षभर कुक्कुटपालकांचे नुकसान होत राहिले. त्यामुळे अंडी देणाऱ्या कोंबडयांची संख्या कमी झाली. नव्या कोंबडयांची मागणी घटली. त्यामुळे अंडी देणाऱ्या कोंबडयांच्या संख्येत मोठी घट झाली. सध्या ग्राहकांना ६८० ते ७०० रुपये शेकडा दराने अंडी मिळत आहेत. प्रत्यक्षात अंडी उत्पादक शेतकरी, कुक्कुटपालकांना सरासरी ५६० रुपये शेकडा दर मिळतो आहे. हा दर मार्चअखेपर्यंत मिळाल्यास मागील वर्षभरात झालेले नुकसान भरून निघेल आणि कुक्कुटपालक आर्थिक संकटांतून बाहेर येतील. आता मिळणारा दर अंडी उत्पादकांना दिलासा देणारा आहे.

हेही वाचा >>> मकर संक्रांतीनिमित्त मोदींनी गोसेवा केलेल्या पुंगनूर गाईंची ‘ही’ आहेत खास वैशिष्ट्ये; जाणून घ्या सविस्तर…

कोंबडी खाद्याचे दर आवाक्याबाहेर ?

कोंबडी खाद्याच्या दरात सतत वाढ होत आहे. कोंबडी खाद्यात मक्याचे प्रमाण ५० टक्क्यांहून जास्त असते. मक्याच्या दरात २५ टक्क्यांहून जास्त वाढ झाली असून, मक्याचे दर प्रति किलो २५ रुपयांवर गेले आहेत. सोयापेंडीच्या दरात पाच टक्के वाढीसह प्रति किलो ४५ रुपयांवर गेले आहेत. औषधे आणि खनिज द्रव्यांच्या दरात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. हे वाढलेले दर कमी होण्याची शक्यता नाहीच, उलट दरवाढ कायम राहण्याचा अंदाज आहे. राज्य सरकार कुक्कुटपालकांना खाद्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालात कोणतीही सवलत देत नाही. त्या उलट कर्नाटकमध्ये मका मोठया प्रमाणावर उत्पादित होतो, त्यामुळे मका स्वस्तात उपलब्ध होतो. सरकारही वाढीच्या काळात सवलतीच्या दरात मका उपलब्ध करून देते. आंध्र प्रदेशात मका उत्पादन कमी होते, मात्र, राज्य सरकार कुक्कुटपालकांना सवलतीच्या दरात तांदूळ उपलब्ध करून देते. त्यामुळे आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील कुक्कुटपालकांना खाद्याच्या दरात झालेल्या वाढीचा थेट फटका बसत नाही.

अंडी आणखी किती दिवस महाग ?

मागील वर्षभरात झालेल्या आर्थिक तोटयामुळे राज्यात आणि देशाच्या विविध भागांत अंडी देणाऱ्या कोंबडयांचे प्रमाण कमी झाले आहे. शेतकऱ्यांनी कोंबडया वाढविणे किंवा नव्या पिल्लांचे संगोपन करणे थांबविले आहे. त्यामुळे अंडयांच्या उत्पादनात आणि मागणीत काहीशी तूट निर्माण झाली आहे. ही तूट भरून काढायचे ठरविल्यास आणि अंडयांना जो दर मिळत आहे, तो कायम राहिल्यास अंडयांच्या उत्पादनात वाढ होण्यास आणखी किमान वर्षभराचा काळ जाईल. केंद्र सरकारने साखरेचा रस आणि पाकापासून इथेनॉल निर्मिती करण्यावर निर्बंध लादले आहेत. केंद्राने मक्यापासून इथेनॉल उत्पादनास परवानगी दिली आहे. त्यामुळे मक्यापासून इथेनॉल निर्मिती सुरू झाल्यास पशुखाद्य आणि कोंबडी खाद्यासाठी मक्याचा तुटवडा निर्माण होऊन पुन्हा अंडयांचा उत्पादन खर्च वाढण्याची भीती आहे.

dattatray.jadhav@expressindia.com

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Loksatta analysis reason behind eggs prices rising across in india print exp zws