मकर संक्रांतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवासस्थानी पुंगनूर गाईंची गोसेवा करीत गोसंवर्धनाचा संदेश दिला. समाजमाध्यमांवर पंतप्रधानांचा हा व्हिडीओ आणि फोटो चर्चेचा विषय ठरत आहे. त्या निमित्ताने याच पुंगनूर प्रजातीच्या गाईंचे वैशिष्ट्य जाणून घेऊ…

भारतात प्राचीन काळापासून घरोघरी गाई पाळण्याची प्रथा आहे. हिंदू धर्मात गाईंना अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतात देशी गाईंच्या अनेक प्रजाती पाहायला मिळतात. त्यातीलच एक प्रजाती म्हणजे पुंगनूर गाय. या गाईची प्रजाती आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

vijaysinh mohite patil marathi news, vijaysinh mohite patil solapur lok sabha marathi news
मोहिते-पाटलांच्या महायुती नेत्यांशी गाठीभेटी, भाजप सावध; राजन पाटलांना प्रचारात जुंपले
mallikarun kharge on bjp
“अनेक मंदिरांमध्ये आजही दलितांना प्रवेशबंदी”; भाजपावर आरोप करताना मल्लिकार्जुन खरगेंनी सांगितला अनुभव
Police dressed as priests in Uttar Pradesh
अन्वयार्थ : पोलीस पुजारी.. की पुजारी पोलीस!
Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया

पंतप्रधान मोदींनी गोसेवेच्या माध्यमातून एक प्रकारे भारताचे वैभव असणाऱ्या पुंगनूर गाईच्या संवर्धनाचा संदेशच दिला आहे. मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुंगनूर गाईंना चारा खाऊ घातला. या छायाचित्रांमध्ये पंतप्रधान नवी दिल्ली येथील आपल्या ७, लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानी असलेल्या लॉनमध्ये गाईसह वावरताना दिसले. मान्यतेनुसार, हिंदू संस्कृतीत मकर संक्रांतीच्या दिवशी गाईला चारा खाऊ घालणे शुभ मानले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उचललेल्या या पावलामुळे नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या पुंगनूर प्रजातीच्या गाई प्रकाशझोतात आल्या आहेत.

पुंगनूर गाईचे महत्त्व

पुंगनूर गाईची प्रजाती आंध्र प्रदेश येथील चित्तूर जिल्ह्यातील पुंगनूर महानगरपालिका येथे आढळते. या अतिशय दुर्मीळ प्रजातीच्या गाई आहेत. पुंगनूर प्रजातीच्या गाई त्यांच्या छोट्या उंचीसाठी ओळखल्या जातात. ७० ते ९० सेंमीची उंची असलेल्या पुंगनूर गाईचे वजन ११५ ते २०० किलोच्या घरात असते. रुंद कपाळ आणि लहान शिंगे असलेल्या या गाई दूध उत्पादन आणि सेंद्रिय शेतीत महत्त्वाची भूमिका निभावतात. या गाईला जगातील सर्वांत कमी उंचीच्या गाईचा मान मिळाला आहे.

जी. के. व्ही. के. कृषी विज्ञान विद्यापीठातील पशुविज्ञानाचे निवृत्त प्राध्यापक डॉ. बी. एल. चिदानंद हे ‘न्यूज१८’ला दिलेल्या माहितीत म्हणाले की, ही गाय म्हणजे सोन्याची खाण आहे. या गाईच्या दुधात एयू हे मूलद्रव्य आहे; जे सोन्याचेच रासायनिक नाव आहे. आजही प्रसिद्ध तिरुपती तिरुमला मंदिरासह आंध्र प्रदेश येथील अनेक मंदिरे पुंगनूर प्रजातीच्या गाईचे दूध क्षीराभिषेकासाठी (देवाला अर्पण) वापरतात, असे जाणकार सांगतात.

पुंगनूर गाईंचा जगातील सर्वांत लहान प्रजातीच्या गाईंमध्ये समावेश होतो. या गाईंच्या हाय फॅट दुधाचा उपयोग तूप, लोणी व दही बनविण्यासाठी केला जातो. इतर प्रजातींच्या तुलनेत या गाईच्या दुधात फॅटचे प्रमाण अधिक असते. पुंगनूर गाईच्या दुधात आठ टक्के; तर इतर गाईंच्या दुधात तीन ते चार टक्के फॅट आढळते. त्यासह पुंगनूर गाईच्या दुधात अनेक औषधीय गुणही आढळतात.

“पुंगनूर गाईच्या दुधात उच्च पौष्टिक मूल्ये असतात. हे दूध ओमेगा फॅटी अॅसिड, कॅल्शियम, पोटॅशियम व मॅगनेशियम यांसारख्या पोषक घटकांनी समृद्ध असलेल्या आणि आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या ए२ दुधासाठी ओळखले जाते”, असे डॉ. बी. एल. चिदानंद यांनी सांगितले.

‘अॅग्री फार्मिंग’च्या लेखानुसार, या गाई दुष्काळ परिस्थितीतही जगू शकतात. कारण गवत, पेंढा यांसारख्या कोरड्या चाऱ्यावरही त्या तग धरू शकतात. या प्रजातीच्या गाईंचा स्वभाव नम्र असल्यामुळे त्यांना हाताळणेही सोपे असते. त्यासह पुंगनूर गाई सामान्य रोगांना सामोऱ्या जाण्यास सक्षम असतात.

स्टेटस सिम्बॉल म्हणून पाहिल्या जाणाऱ्या या गाईंचा सेलिब्रिटी आणि लोकप्रिय व्यक्तींनी पाळीव प्राणी म्हणून स्वीकार केला आहे. या प्रजातीच्या गाईंची किंमत त्यांची शुद्धता आणि आरोग्यावरून ठरते. ही किंमत एक लाख ते १० लाख रुपयांदरम्यान आहे. ‘न्यूज१८’ने शेतकऱ्यांचा हवाला देत, हा अहवाल दिला आहे.

पुंगनूर गाईंचा संकटातून पुनरुज्जीवनापर्यंतचा प्रवास

‘इंडियन टाइम्स’नुसार, दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दुग्धोत्पादनात वाढ करण्यासाठी पुंगनूर गाईंचा समावेश केल्याने, त्यांच्यावर विविध प्रयोग करण्यात आले. ज्यामुळे ही प्रजाती नामशेष होण्याचा धोका निर्माण झाला. जास्त दूध देणाऱ्या इतर प्रजातींच्या गाईंच्या तुलनेत पुंगनूर गाई शेतकऱ्यांसाठी अधिक महत्त्वाच्या ठरल्या.

शेतकऱ्यांनी या गाईंना विकायला आणि सोडायला सुरुवात केल्यामुळे या गाईंची संख्या काहीशेवर गेली. या गाईंची संख्या वाढवण्यासाठी २०२० साली आंध्र प्रदेश सरकारने ‘मिशन पुंगनूर’ सुरू केले. या उपक्रमांतर्गत राज्य सरकारने आयव्हीएफ तंत्रज्ञानाचा वापर केला. पुंगनूर प्रजातीची संख्या वाढविण्यासाठी ‘एपी सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड रिसर्च ऑफ लाइव्ह स्टॉक लिमिटेड’ला ६९.३६ कोटी रुपये मंजूर केले. पीएमओही पुंगनूर गाईंच्या संगोपनासाठी महत्त्वाची पावले उचलत असल्याची माहिती पीटीआयने दिली आहे.

‘द हिंदू’च्या रिपोर्टनुसार कमी आनुवंशिक गुणवत्ता असलेल्या गाईंचा ‘सरोगेट’ म्हणून वापर करणे आणि उच्चभ्रू संतती निर्माण करणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. आंध्र प्रदेश सरकारने या गाईंची प्रजनन क्षमता तीन ते चार पट वाढवण्याची योजना आखली आहे. पाच वर्षांत प्रत्येक गाईला होणाऱ्या वासरांची संख्या सरासरी २.५ ऐवजी किमान ८.५ करण्याचेही या अभियानाचे उद्देश आहे.

२०० मोठ्या देणगीदारांकडून मिळालेल्या आर्थिक मदतीच्या उपयोगातून तब्बल १६९० वासरांना आयव्हीएफमधून जन्म दिला जाण्याचीही शक्यता आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा : मल्लिकार्जुन खरगेंची नरेंद्र मोदी, भाजपावर टीका; म्हणाले, “मोदींनी मतांसाठी…”

न्यूज१८ नुसार, पंतप्रधान कार्यालयही (पीएमओ) पुंगनूर गाईंच्या संवर्धनाच्या प्रयत्नांचा एक भाग आहे आणि या प्रजातीच्या गाईंचे संगोपन केले जात आहे, असे आंध्र प्रदेशमधील पशुवैद्यक तज्ज्ञाने सांगितले.