लोकसत्ता विश्लेषण : वर्ध्यात सापडलेल्या अर्भकांच्या १२ कवट्या आणि ५४ हाडांच्या चाचणीतून काय खुलासा होणार?

वर्धा प्रकरणात अर्भकांच्या कवट्या आणि हाडांच्या चाचण्या या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी नेमकी काय आणि कशी भूमिका पार पाडणार याचा हा खास आढावा.

वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे कदम रुग्णालय परिसरात ९ जानेवारीला पोलिसांना अर्भकांच्या १२ कवट्या आणि ५४ हाडं सापडली. यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. यानंतर पोलिसांनी या रुग्णालयातील डॉक्टर रेखा कदम आणि निरज कदम या दाम्पत्याला अटक केली. पोलिसांना हे अवशेष अर्भकांचे असून रुग्णालयात बेकायदेशीर गर्भपात झाल्याचा संशय आहे. या संशयाची तपासणी करण्यासाठी पोलिसांनी हस्तगत केलेल्या कवट्या आणि हाडं न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठवलीत. त्यामुळे या चाचण्यांचा अहवाल हे प्रकरण सोडवण्यात नेमकी काय आणि कशी भूमिका पार पाडणार असा प्रश्न अनेकांना पडत आहे. याचाच हा खास आढावा.

अटकेनंतर आरोपी डॉक्टर दाम्पत्याचा दावा काय?

अटकेनंतर आरोपी कदम दाम्पत्याने हे सर्व अवशेष कदम रूग्णालयात केलेल्या कायदेशीर गर्भांचे असल्याचा दावा केलाय. तसेच मागील अनेक दिवसांपासून स्थानिक वैद्यकीय कचरा (बायो मेडिकल वेस्ट) गोळा करणारे येत नसल्याने रुग्णालय परिसरात हे अवशेष पुरल्याचा दावा केला. आपल्या दाव्याला आधार देण्यासाठी आरोपी डॉक्टरांनी रुग्णालयाला कायदेशीर गर्भपात करण्याची परवानगी असल्याचे आणि गर्भपात केलेल्या व्यक्तींचे रेकॉर्ड देखील दाखवले आहेत.

अवशेषांच्या चाचणीतून काय खुलासा होणार?

आर्वीतील कदम रूग्णालयात सापडलेले हे अवशेष नेमके कशाचे आहेत हे जाणून घेण्यासाठी या नमुन्यांची प्रयोगशाळेतील चाचणी आवश्यक आहे. याशिवाय हे अवशेष अर्भकांचे निघाल्यानंतर ते मुलांचे आहेत की मुलींचे हेही तपासले जाईल. जर चाचणीत सर्व हाडांचे अवशेष मुलींचे निघाले तर हा स्त्रीगर्भ हत्येचा प्रकार असल्याचं स्पष्ट होईल.

हेही वाचा : खळबळजनक! वर्ध्याच्या कदम हॉस्पिटलमध्ये आढळल्या ११ अर्भकांच्या कवट्या

याशिवाय या अवशेषांच्या डीएनए चाचणीची तुलना रुग्णालयात कायदेशीर गर्भपात केलेल्या व्यक्तींच्या डीएनएशी केली जाईल. ते सारके आढळले तर ते गर्भपात कायदेशीर असल्याचं सिद्ध होईल. मात्र, तसं न झाल्यास आढळलेले अवशेष बेकायदेशीर गर्भपातातील असल्याचा निष्कर्ष निघेल.

चाचणीतून अर्भकाच्या वयाचाही अंदाज येऊ शकतो

वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, या चाचण्यामधून अर्भकांच्या वयाचाही अंदाज येऊ शकतो. यासाठी सांध्यातील हाडांचा उपयोग होऊ शकतो. मात्र, हे सर्वस्वी अर्भकांचं वय काय होतं यावरच अवलंबून असल्याचंही नमूद करण्यात आलं.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Loksatta explained on importance of forensic test of skulls bones of foetuses found at wardha kadam hospital pbs

Next Story
लोकसत्ता विश्लेषण : कृषी शेत्रात आता High Tech शेती; केंद्र सरकार घेणार ड्रोनची मदत
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी