Madhya Pradesh Government to Count Snakes : मध्य प्रदेशमध्ये सापाच्या दंशामुळे होणाऱ्या मृत्यूंचं प्रमाण चिंताजनक पातळीवर पोहोचलं आहे. गेल्या वर्षभरात ग्रामीण भागात सर्पदंशाने अनेकांना आपले प्राण गमावावे लागले आहेत. हीच बाब लक्षात घेता, मुख्यमंत्री मोहन यादव यांनी एक आगळीवेगळी योजना आखली आहे. सापाच्या दंशाने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्राणिसंग्रहालयांमध्ये असलेले किंग कोब्रा साप पुन्हा जंगलात सोडण्याच्या विचार सुरू केला आहे. तसेच राज्यातील विषारी सापांची गणना करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. दरम्यान, सर्पदंशाने होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढत असतानाही मुख्यमंत्री कोब्रा साप जंगलात सोडण्याचा विचार का करीत आहेत? सापांची जनगणना करण्यामागचे नेमके कारण काय? ते जाणून घेऊ…

गेल्या वर्षी मध्य प्रदेश सरकारने कर्नाटकातील मंगळुरू येथील प्राणिसंग्रहालयातून एका वाघाच्या मोबदल्यात विषारी किंग कोब्रा साप आणला होता. वन विहार राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आलेला हा साप १८ जून रोजी त्याच्या पिंजऱ्यात मृतावस्थेत आढळून आला. ही घटना मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या योजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली आहे. एकीकडे राज्यातील ग्रामीण भागात सर्पदंशाने होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण वाढलं असताना दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जंगलांमध्ये विषारी कोब्रा साप सोडण्याचा विचार सुरू केला आहे.

मध्य प्रदेशात होणार सापांची गणना?

  • मुख्यमंत्र्यांच्या मते, किंग कोब्रा हा साप इतर सापांचा नैसर्गिक भक्षक आहे.
  • कोब्रा सापांना पुन्हा जंगलात सोडल्यामुळे विषारी सापांची संख्या नियंत्रणात राहू शकते.
  • डिंडोरी जिल्ह्यात दरवर्षी सर्पदंशाने सुमारे २०० मृत्यू घडतात, असे मुख्यमंत्री यादव यांनी स्वतः नमूद केलं आहे.
  • इतकंच नाही, तर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विषारी सापांची जनगणना करण्याचा निर्णयही घेतला आहे.
  • कोणत्या भागात विषारी सापांचं किती प्रमाण आहे, हे जाणून घेण्यासाठी विषारी सापांच्या गणनेचा निर्णय घेण्यात आला आहे.

आणखी वाचा : कोण आहेत पायतोंगटार्न शिनावात्रा? थायलंडच्या पंतप्रधानांवर राजीनाम्याची वेळ का आली?

मुख्यमंत्र्यांनी नेमका काय दावा केला?

मुख्यमंत्री मोहन यादव यांनी असाही दावा केलाय की, किंग कोब्रा साप जमिनीवरून रेंगाळू लागला की, इतर छोटे-मोठे विषारी साप आपापल्या बिळातून बाहेर पडतात. त्यानंतर कोब्रा या सापांची शिकार करून त्यांना फस्त करतो. ज्या भागात कोब्रा सापांची संख्या सर्वाधिक आहे, तिथे सर्पदंशाने होणाऱ्या मृत्यूचं प्रमाणही कमी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. गेल्या वर्षभरात कोब्रा सापांची संख्या कमी झाल्यानं डिंडोरी जिल्ह्यात सर्पदंशानं २०० नागरिकांचा मृत्यू झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

कोब्रा हा जगातील सर्वांत लांब विषारी साप असून, तो सुमारे १५ फुटांपर्यंत वाढू शकतो. (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)

तज्ज्ञ म्हणतात- सापांची गणना करणे अशक्य

मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या या योजनेवर सर्पमित्रांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, मुख्यमंत्र्यांच्या या संकल्पनेत दोन मोठे वैज्ञानिक अडथळे आहेत. पहिला म्हणजे – जंगलात सापांची अचूक मोजणी करण्यासाठी कोणताही वैज्ञानिक प्रोटोकॉल अस्तित्वात नाही. कारण- साप लपून राहणारा संकोचशील प्राणी असल्यामुळे ही मोजणी व्यवहार्य किंवा आवश्यक मानली गेली नाही. दुसरं म्हणजे- मध्य प्रदेशातील जंगलं उष्ण, कोरडी आणि विरळ आहेत. त्यामुळे इथे कोब्राच्या अस्तित्वाचे कोणतेही पुरावे आजवर आढळून आलेले नाहीत.

कर्नाटकातून आणलेला साप ‘Ophiophagus kaalinga’ या वेगळ्या प्रजातीचा होता, जो फक्त केरळ, कर्नाटक, तमिळनाडू, गोवा व महाराष्ट्र यांसारख्या राज्यांतच आढळतो. मध्य प्रदेशातील कोरड्या जंगलांमधील हवामान कोब्रा सापांसाठी किती पोषक ठरेल हे सांगता येणं कठीण आहे. नवीन संशोधनानुसार, सर्व विषारी कोब्रा साप एकसारखे नसतात. वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशांनुसार त्यांचे चार वेगळे प्रकार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री यादव यांची ही योजना केवळ पर्यावरणीय दृष्टिकोनातून नव्हे, तर शास्त्रीयदृष्ट्याही अतिशय शंकास्पद आणि अयोग्य ठरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

कोब्रा साप कोणकोणत्या भागात आढळतो?

कोब्रा हा जगातील सर्वांत लांब विषारी साप असून, तो सुमारे १५ फुटांपर्यंत वाढू शकतो. त्याचा नैसर्गिक अधिवास आर्द्र आणि गडद जंगलांमध्ये असतो. जिथे दाट झुडपं, दलदल, तसेच बांबूच्या विस्तार असलेल्या भागात तो जास्त वेळ वास्तव्य करतो. भारतामध्ये कोब्राचा नैसर्गिक प्रसार पश्चिम घाट, उत्तर भारतातील तराई पट्टा, ईशान्य भारत, पश्चिम बंगाल व ओडिशाचा किनारपट्टी भाग, अंदमान आणि निकोबार बेटे, तसेच पूर्व घाटातील काही भागांमध्ये झाला आहे. थंड, दमट आणि घनदाट जंगलातच त्याचे अस्तित्व आढळून येते.

कोब्रा सापाच्या चार वेगवेगळ्या प्रजाती

२०२१ मध्ये जीवशास्त्रज्ञ गोवरी शंकर यांच्या नेतृत्वाखालील अभ्यासात असे आढळून आले की, कोब्रा सापाच्या चार वेगवेगळ्या भौगोलिक प्रजाती आहेत. पश्चिम घाटात आढळणारा कोब्रा हा इतर भागातील सापांपेक्षा पूर्णत: वेगळा आहे. या प्रजातीचा नाग मध्य प्रदेशात आणणे म्हणजे त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासापासून तोडून टाकण्यासारखं होईल, ज्यामुळे भविष्यात इतर प्रजातींशी हायब्रिडायजेशन (मिश्र प्रजाती निर्माण होणे) होण्याचा धोका संभवतो. जैवविविधतेच्या दृष्टिकोनातून ही बाब अतिशय घातक आहे.

आणखी वाचा : न्यायमूर्ती यशवंत वर्मा प्रकरणातील चौकशी अहवाल समोर; समितीने नेमकं काय म्हटलंय?

सर्पमित्र व तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त

पश्चिम घाटातील कोब्रा सापाची प्रजाती फारच मर्यादित क्षेत्रात आढळणारी आणि धोक्यात आल्याचं मानली जात आहे. युरोपियन जर्नल ऑफ टॅक्सोनॉमीमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका आंतरराष्ट्रीय अभ्यासात स्पष्ट सांगण्यात आलंय की, प्राणिसंग्रहालयात ठेवलेल्या विषारी सापांचे प्रजनन व संकर करताना योग्य प्रजातीचीच निवड झाली पाहिजे. चुकूनसुद्धा मिश्र प्रजाती निर्माण होऊ देऊ नयेत. भोपाळचे सर्पतज्ज्ञ विवेक शर्मा यांच्या मते “जर खरोखरच मध्य प्रदेशात कोब्रा साप पुन्हा आणायचा असेल, तर किमान छत्तीसगढ किंवा ईशान्य भारतात आढणाऱ्या सापाच्या योग्य प्रजातीची निवड झाली पाहिजे होती. कर्नाटकातील कोब्रा मध्य प्रदेशात आणणं हे वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचं आहे.”

“कोब्रा हा असा एकमेव साप आहे की, जो स्वतःच्या अंड्यांसाठी घरटे तयार करतो आणि तो मानवी वस्तीपासून दूर राहतो. त्यामुळे जर हा साप मध्य प्रदेशातील जंगलात सोडण्यात आला तरी त्याचा इतर विषारी सापांवर परिणाम जाणवायला अनेक दशके लागू शकतात. त्याशिवाय प्राणिसंग्रहालयात असताना त्याचे प्रजनन होणे फारच कठीण आहे”, असे एका सर्पमित्राने सांगितले. राज्यातील सर्पदंशाने होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण रोखण्यासाठी सर्पदंश प्रतिबंधक जनजागृती, लसीकरण, अँटीव्हेनमची उपलब्धता व आरोग्य सेवांचा विस्तार यांवर लक्ष केंद्रित करणं अधिक परिणामकारक ठरेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.