Maharashtra Three Women Kidney Damage For Use Skin Lightening Creams : सतत बदलत्या वातावरणात चेहरा आणि त्वचा सुंदर ठेवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. त्यासाठी काहीजण वेगवेगळ्या प्रकारच्या सौंदर्य प्रसाधनांनी ऑनलाईन खरेदी करतात. मात्र, चेहऱ्याला झटपट उजळवणारी प्रसाधने आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतात. या उत्पादनांचा वापर केल्याने त्वचेच्या गंभीर आजारासह मूत्रपिंड निकामी होत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. चेहऱ्याला क्रीम लावल्याने महाराष्ट्रातील तीन महिलांची किडनी निकामी झाल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले आहे. नेमके काय आहे यामागचे कारण? तज्ज्ञांनी काय इशारा दिला? त्या संदर्भातील हा आढावा…

मानवी आरोग्य आणि पर्यावरणावर होणारे पाऱ्याचे दुष्परिणाम टाळण्यासाठी जागतिक स्तरावर ‘मिनामाता करार’ करण्यात आला. या कराराच्या बैठकीपूर्वी ‘झिरो मर्क्युरी वर्किंग ग्रुप’ या संस्थेने एक नवीन अहवाल प्रसिद्ध केला. ऑनलाइन विकल्या जाणाऱ्या सौंदर्यप्रसाधन क्रीममध्ये कायदेशीर मर्यादेपेक्षा तब्बल हजार पट अधिक प्रमाणात पारा असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले. जगभरातील ऑनलाइन कंपन्यांच्या संकेतस्थळावरून पारामिश्रित उत्पादने बेकायदा विकली जात असल्याचा मुद्दाही त्यात अधोरेखित करण्यात आला.

क्रीम्समध्ये धोकादायक पाऱ्याचे प्रमाण

त्वचा गोरी करणाऱ्या क्रीम्सवरील नव्या जागतिक तपासणीत अत्यंत धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहेत. एकूण ३१ पैकी तब्बल २५ क्रीम्समध्ये कायदेशीर मर्यादेपेक्षा हजार पट अधिक पारा असल्याचे आढळून आले आहे. भारतातील ‘टॉक्सिक्स लिंक’ या संस्थेने भारत, पाकिस्तान व थायलंडमध्ये तयार करण्यात आलेल्या आठ विविध कंपन्यांच्या चेहरा उजळवणाऱ्या क्रीम्सची तपासणी केली. या आठपैकी सात नमुन्यांमध्ये विषारी पाऱ्याचे प्रमाण ७,३३१ ते २७,४३१ पीपीएम या अत्यंत धोकादायक श्रेणीत आढळले. याउलट अमेरिका आणि युरोपियन युनियनमधील ऑनलाइन संकेतस्थळावर पाऱ्याची भेसळ असलेली उत्पादने फारच कमी आढळली. त्यावरून असे लक्षात येते की, सौंदर्य उत्पादने खरेदी करणाऱ्या आशियातील अनेक ग्राहकांना आरोग्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा : Pakistan Afghanistan War : पाकिस्तान-अफगाणिस्तानमध्ये पुन्हा युद्ध भडकणार? तालिबानचा इशारा काय? पाकिस्तानला कशाची भीती?

महाराष्ट्रात तीन महिलांच्या मूत्रपिंडांना गंभीर नुकसान

टॉक्सिक्स लिंकचे सहसंचालक सतीश सिन्हा यांनी या परिस्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली. “भारतातील संघटित क्षेत्रातील ब्रँड्स प्रामुख्याने सर्व नियमांचे पालन करतात; पण परदेशी व असंघटित क्षेत्रातील उत्पादकांनी तयार केलेले अत्यंत विषारी आणि नियमबाह्य क्रीम्स ऑनलाइन बाजारात सहजपण विकले जाणे हे राष्ट्रीय नियमांचे गंभीर उल्लंघन आहे”, असे सिन्हा यांनी म्हटले आहे. या क्रीम्समध्ये असलेल्या अतिरिक्त पाऱ्यामुळे किडनीचे आजार उदभवत असल्याची बाबही त्यांनी अधोरेखित केली आहे. सिन्हा यांनी महाराष्ट्रातील एका धक्कादायक घटनेचा उल्लेख केला आहे. “अकोला येथील एकाच कुटुंबातील तीन महिलांना पाऱ्याचे जास्त प्रमाण असलेली क्रीम वापरल्यामुळे त्यांच्या किडनीचे नुकसान झाले होते”, असे सिन्हा यांनी सांगितले आहे.

पाऱ्यामुळे शरीरावर होणारे गंभीर परिणाम

त्वचा गोरी करणाऱ्या अनेक क्रीम्समध्ये ‘पारा’ या अत्यंत विषारी धातूचा वापर केला जातो. हा धातू यकृत आणि मूत्रपिंडांसाठी अतिशय घातक असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो रुग्णालयाचे वरिष्ठ त्वचारोग तज्ज्ञ डॉ. महाजन सांगतात, “क्रीममध्ये असलेला पारा हा सूर्याच्या हानिकारक किरणांपासून त्वचेचे संरक्षण करतो, त्यामुळे चेहरा सुंदर आणि गोरा दिसायला लागतो. पण अशा प्रकारच्या क्रीम्समुळे त्वचेचे नैसर्गिक संरक्षण कवच नष्ट होते. कालांतराने क्रीम वापरणे बंद केल्यास त्वचा अधिकच खराब होऊ लागते. परिणामी चेहऱ्यावर जळजळ होणे, लाल चट्टे पडणे, पुरळ येणे, खाज सुटणे, झिणझिण्या येणे किंवा केस गळणे यांसारख्या समस्या निर्माण होतात.”

डॉ. महाजन पुढे म्हणाले, क्रीममधील पाऱ्यामुळे केवळ त्वचेवरच नव्हे तर शरीराच्या इतर भागांवरही गंभीर परिणाम होतात. पाऱ्याच्या दीर्घकाळ संपर्कामुळे ‘नेफ्रोटिक सिंड्रोम’ नावाचा गंभीर आजार उदभवण्याचा धोका असतो. या आजारामुळे मूत्रपिंडातून जास्त प्रमाणात प्रोटीन बाहेर पडत असल्याने ते निकामी होते. त्याशिवाय क्रीम वापरणाऱ्या व्यक्तीच्या तोंडात कालांतराने जखमा निर्माण होतात आणि चेतासंस्थेवर परिणाम होऊन थरकाप किंवा खाज यांसारख्या समस्या उदभवू शकतात. आम्ही अशा प्रकरणांची नोंद केलेली आहे.”

पारा मानवी शरीरात कसा प्रवेश करतो?

त्वचा गोऱ्या करणाऱ्या क्रीम्समध्ये असलेला विषारी पारा शरीरात प्रवेश करून इतर अवयवांचे कसे नुकसान करतो, याबाबतही तज्ज्ञांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. साधारणतः पारा हा श्वसनाच्या मार्गाने शरीरात प्रवेश करून फुप्फुसांचे नुकसान करतो. मात्र, क्रीमच्या माध्यमातून तो अनेक मार्गांनी शरीरात प्रवेश करू शकतो. क्रीम किंवा लोशन चुकून ओठांवर लागल्यास किंवा ते चाटल्यास पारा पचनसंस्थेत शोषला जातो असे डॉ. महाजन यांनी स्पष्ट केले आहे. “मानवी त्वचेचा सरासरी पृष्ठभाग सुमारे १.७३ चौरस मीटर असतो. त्यामुळे एखादी व्यक्ती पारा असलेली क्रीम किंवा लोशन वापरत असेल, तर तो त्वचेवाटे शरीरात प्रवेश करतो. परिणामी इतर अवयवही निकामी होऊ शकतात”, असा इशाराही डॉ. महाजन यांनी दिला आहे.

हेही वाचा : Muttaqi: १५०० वर्षांपूर्वी ‘त्या’ गझनवी गुलामाने हिंदू राजाचा भर बाजारात मांडला लिलाव …आणि अफगाणिस्तान भारताच्या हातून निसटले!

जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा काय?

जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या सौंदर्यप्रसाधनात पारा आहे की नाही हे ओळखण्यासाठी त्या उत्पादनावरील घटक तपासणे अत्यावश्यक आहे. जर क्रीममध्ये कॅलोमेल, सिन्नाबारिस, हायड्रार्जायरी ऑक्सिडम रुब्रम, क्विकसिल्व्हर असे लिहिलेले असेल, तर त्यात पारा असण्याची दाट शक्यता आहे. त्याशिवाय पारा असलेली उत्पादने सोने, चांदी, रबर, ॲल्युमिनियम व दागिने यांपासून दूर ठेवण्याचा इशारा दिला जातो. कारण- पारा हा मौल्यवान धातूंना नुकसान पोहोचवू शकतो, त्यामुळे क्रीमच्या लेबलवर मौल्यवान धातूचा इशारा दिला असल्यास त्याचा वापर करणे टाळायला हवे. निरोगी त्वचा आणि चेहऱ्याला सुंदर ठेवण्यासाठी नेहमीच आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घ्यायला हवा, असेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.