गेल्या वर्षी इराणमध्ये तरुणी महसा अमिनी यांचा मृत्यू झाल्यामुळे जगभरात खळबळ उडाली होती. इराणमधील संस्कृतीरक्षक पोलिसांच्या मारहाणीत २२ वर्षीय महसा अमिनी यांचा मृत्यू झाला होता. या घटनेला आता एक वर्ष पूर्ण झाले आहे. अमिनी यांच्या मृत्यूनंतर अनेक संघटना, नागरिक रस्त्यावर उतरले होते. त्यांनी संस्कृतीरक्षक पोलीस तसेच महिलांसाठीच्या नियमांचा कडाडून विरोध केला. संपूर्ण इराणमध्ये हे आंदोलन पेटल्यामुळे तेथील सरकार अडचणीत सापडले होते. याच पार्श्वभूमीवर महसा अमिनी यांचा मृत्यू का झाला होता? इराणी नागरिकांच्या आंदोलनानंतर संस्कृतीरक्षकांचा अत्याचार कमी झाला का? सध्या येथे महिलांविषयीचे नियम काय आहेत? यावर नजर टाकू या….

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इराणमध्ये आंदोलनाला सुरुवात कशी झाली होती?

गेल्या वर्षी १६ सप्टेंबर रोजी महसा अमिनी या २२ वर्षीय कुर्दीश तरुणीचा मृत्यू झाला होता. हिजाब संदर्भातील नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महसा अमिनी यांना संस्कृतीरक्षक पोलिसांनी (मोरालिटी पोलीस) अटक केली होती. अटकेनंतर प्रकृती खालावल्यानंतर रुग्णालयात महसा यांचा मृत्यू झाला. कट्टरपंथीय संस्कृतीरक्षकांनीच अमिनी यांचा जीव घेतल्याचा आरोप करत इराणमधील महिला तेव्हा संतापाने पेटून उठल्या होत्या. इराणमध्ये संस्कृतीरक्षक पोलिसांना ‘गश्त-ए-अरशाद’ म्हटले जाते. इस्लामिक कायद्यानुसार बनवण्यात आलेल्या कपड्यासंबंधी नियमांच्या अंमलबजावणीसाठी इराण सरकारने या पोलिसांचे पथक तयार केले आहे.

अमिनी यांची हत्या केल्याचा, कुटुंबीयांचा आरोप

अमिनी फार लाजाळू होत्या. त्या राजकारणापासून दूर होत्या. तसेच कामाशी काम असा त्यांचा स्वाभाव होता. तेहरानमधील रेल्वे स्टेशनहून बाहेर पडल्यानंतर त्यांना संस्कृतीरक्षक पोलिसांनी अटक केली होती. अमिनी यांच्या मृत्यूचे वृत्त समोर आल्यानंतर इराणमध्ये नागरिक पेटून उठले होते. अमिनी यांच्या अंत्यविधीवेळी त्यांच्या साकेझ या मूळ गावी लोक मोठ्या संख्येने जमले होते. यावेळी ‘महिला, जीवन, स्वातंत्र्य’ अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. दुसरीकडे अमिनी यांची हत्या केल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. डोक्यावर आणि हात-पायांवर मारल्यामुळे अमिनी यांचा मृत्यू झाला असा दावा त्यांच्या कुटुंबीयांनी केला होता. तर अगोदरच असलेल्या आजारांमुळे अमिनी यांचा मृत्यू झाला, असा दावा इराण सरकारने केला होता.

आंदोलकांनी काय मागणी केली होती?

अमिनी यांच्या मृत्यूनंतर तरुणांसह अनेक महिला आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी शासकीय कार्यालये तसेच शासनाच्या मालकीच्या संस्थांना लक्ष्य केले. तसेच या आंदोलनांदरम्यान इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खमेनी यांचे पुतळे जाळण्यात आले. यावेळी ‘हुकूमशाहाचा अंत व्हायला हवा’ अशी घोषणाबाजी आंदोलकांनी केली. या आंदोलनात शाळेतील मुलींदेखील उडी घेतली होती. मुलींनी आपल्या डोक्यावरील स्कार्फ काढून त्यांची होळी केली. तसेच अनेक महिलांनी डोक्यावर स्कार्फ तसेच सैल कपडे परिधान करणे बंधनकारक करणाऱ्या कायद्याचा निषेध केला.

खेळाडू, सेलिब्रिटींवर कारवाई

ज्या लोकांना दीर्घकाळापासून अन्याय अत्याचार सहन करावा लागलेला आहे, असे पारंपरिक अल्पसंख्याक या आंदोलनात पुढे होते. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून बुद्धीबळपटू आणि अनेक गिर्यारोहकांनी डोक्यावर कोणताही हेडस्कार्फ न घालता स्पर्धेत सहभाग नोंदवत या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. दुसरीकडे हे आंदोलन दडपून टाकण्यासाठी तेथील सरकारी यंत्रणांकडून पूर्ण ताकदीने प्रयत्न केला जात होता. ज्या खेळाडूंनी या आंदोलनाला पाठिंबा दिला तसेच स्पर्धेत भाग घेताना डोक्यावर स्कार्फ घालण्यास विरोध केला, अशा खेळाडूंवर निर्बंध लादण्यात आले. त्यांना प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली. अनेक सेलिब्रिटींना तुरुंगात डांबण्यात आले.

आंदोलन दडपण्यासाठी बळाचा वापर, अनेकांना मृत्यूदंडाची शिक्षा

या आंदोलनाला इराण सरकार तसेच तेथील सुरक्षा यंत्रणेने चिरडण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला. आंदोलन सुरू असलेल्या परिसरात मेसेजिंग अॅप्सवर बंदी, कोणतेही नेतृत्व नसलेल्या आंदोलनांना बळाचा वापर करून चिरडण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यासाठी अश्रूधुराचा वापर, शस्त्रांचाही वापर करण्यात आला. अशा आंदोलनात ५०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला. यामध्ये ७१ आंदोलक हे अल्पवयीन होते. इराण सरकारने या आंदोलनांशी संबंध असलेल्या सात जणांना मृत्युदंडाची शिक्षाही दिल्याचे म्हटले जाते.

या आदोलनानंतर नियमांत, कायद्यांत काही बदल झाला का?

या आंदोलनाला चिरडण्यासाठी इराण सरकारने सर्व प्रयत्न करून पाहिला. मात्र आंदोलकांच्या आक्रमक भूमिकेनंतर इराणमध्ये संस्कृतीरक्षक पोलीस दिसेनासे झाले होते. कालांतराने हे आंदोलन शिथील झाल्यानंतर पुन्हा एकदा सीसीटीव्हीच्या माध्यमातून नियम मोडणाऱ्या महिलांवर पाळत ठेवली जाते. इराणी अधिकारी मात्र अजूनही महिलांच्या डोक्यावरील बुरख्याचे समर्थन करतात. इस्लामिक रिपब्लिकमध्ये हे एक तत्त्व आहे, असे इराणी अधिकारी म्हणतात. इराणी प्रशासनाने सार्वजनिक तसेच खासगी संस्थाना डोक्यावर स्कार्फ, बुरखा परिधान न करणाऱ्या महिलांना कामावर घेऊ नका, असा आदेश दिला होता. त्यानंतर अनेक कंपन्या बंद करण्यात आल्या होत्या.

स्कार्फ न बांधणाऱ्या महिलांची संख्या वाढली

इराण सरकारकडून महिलांना स्कार्फ परिधान करण्यास सांगितले जात असले तरी महसा अमिनी यांच्या मृत्यूनंतर स्कार्फ परिधान नकरणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. तर दुसरीकडे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या महिलांविरोधात कारवाई करण्यासाठी कायदा आणखी कठोर करण्याचा सरकार विचार करत आहे.

अस्थितरतेमागे परदेशी हात असल्याचा दावा

दरम्यान, या आंदोलनानंतर कायद्याला विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आम्हाला धमकी दिली जात आहे, अटक केली जात आहे, आमच्यावर गोळीबार केला जात आहे, असा आरोप केला आहे. तर पत्रकार, वकील, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, कलाकार, सेलिब्रिटी तसेच आंदोलनात मारले गेलेल्यांचे कुटुंबीय यांना लक्ष्य केले जात आहे. या आंदोलनाला तसेच या आंदोलनामुळे निर्माण झालेल्या अस्थिरतेमागे परदेशी हात आहेत, असा आरोप सरकारकडून केला जातो. विशेषत: अमेरिकेकडून हे मुद्दामहून केले जात असल्याचे इराणचे म्हणणे आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mahsa amini death anniversary where are morality police prd