अनिकेत साठे

राजस्थानच्या हनुमानगढ येथील एका घरावर कोसळलेल्या मिग-२१ लढाऊ विमानामुळे भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील जुनाट विमानांना त्वरेने निरोप देणे किती आवश्यक आहे, हे नव्याने अधोरेखित झाले. राजस्थानच्या सुरतगढ हवाई तळावरून मिग-२१ हे लढाऊ विमान नियमित प्रशिक्षणासाठी आकाशात झेपावले होते. काही वेळात आणीबाणीची स्थिती उद्भवून ते नियंत्रणाबाहेर गेले. आपत्कालीन स्थितीत वैमानिकासह सहवैमानिक बाहेर पडले. हे विमान हनुमानगढ येथील एका घरावर कोसळून तीन महिलांचा मृत्यू तर, अन्य तिघे जखमी झाले. हवाई दलाने अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश दिले आहेत.

अपघातांची मालिका कशी?

भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातील मिग-२१ हे सर्वांत जुने आणि आजही सेवेत असणारे एकमेव विमान आहे. १९६०च्या दशकापासून रशियन बनावटीची मिग श्रेणीतील विमाने ताफ्यात समाविष्ट झाली होती. जवळपास ८०० विमानांवर दीर्घकाळ दलाची मुख्य भिस्त राहिली. अनेक युद्धात त्यांनी महत्त्वाची कामगिरी केली. संख्यात्मक दृष्टीने अधिक असल्याने अपघातग्रस्त होण्यात ती पुढे राहिल्याचे दिसून येते. गेल्या सहा दशकात या विमानांचे तब्बल ४०० अपघात झाले. त्यामध्ये कित्येक वैमानिकांसह सामान्य नागरिकांनाही प्राण गमवावे लागल्याचा इतिहास आहे. २०२१ या एकाच वर्षात हवाई दलाची ११ विमाने कोसळली. त्यात पाच मिग-२१ होती. दरवर्षी कमी-अधिक फरकाने मिगच्या अपघातांचे सत्र कायम आहे. त्यामुळे ‘उडत्या शवपेट्या’ असा त्यांचा उल्लेख होऊ लागला. हवाई दलात मिग-२१ च्या सध्या तीन तुकड्या (स्क्वॉड्रन) असून ५० विमाने आहेत.

अपघाताची कारणे काय?

प्रत्येक विमान अपघाताची स्वतंत्रपणे चौकशी होते. यात मुख्यत्वे तांत्रिक दोष, मानवी चुका आणि पक्ष्यांनी धडक देणे वगैरे कारणे समोर येतात. ताफ्यात मिग श्रेणीतील विमानांची संख्या मोठी होती. त्यांचा अधिक काळ वापर झाला. प्रत्येक विमानाचे विशिष्ट उड्डाण तासांचे आयुष्य असते. मिग-२१ विमानांची उपयोगिता कधीच संपुष्टात आलेली आहे. मात्र, तरीही सातत्याने त्यांचा होत असलेला वापर अपघातांना कारक ठरतो. चौकशीत त्याचा गांभिर्याने विचार होत नाही. सध्या ताफ्यातील मिग-२१ ही साडेतीन दशके जुनी विमाने असल्याचे सांगितले जाते. मधल्या काळात त्यांचे नूतनीकरण झाल्याचा दाखला दिला जातो. पण हे नूतनीकरण लढाऊ क्षमता, इलेक्ट्रॉनिक प्रणालीशी संबंधित होते. इंजिनाशी त्याचा कुठलाही संबंध नसल्याकडे तज्ज्ञ लक्ष वेधतात.

MIG-21 Crash : राजस्थानात लष्कराचं मिग 21 विमान घरावर कोसळलं, दोन महिलांचा मृत्यू तर एक जण जखमी

साशंकता का?

अपघातांच्या चौकशीत निष्पन्न झालेल्या कारणांवर अनेकदा आक्षेप नोंदविले गेले आहेत. वास्तव लपवून दोष वैमानिकाच्या माथी मारण्याचा प्रयत्न केला जातो, असे आरोप होतात. हवाई दलाच्या कार्यपद्धतीविरोधात शहीद वैमानिक अभिजित गाडगीळ यांच्या आई कविता गाडगीळ यांनी संघर्ष केला होता. सप्टेंबर २००१ मध्ये राजस्थानच्या सुरतगढ येथे मिग-२१ बायसन अपघातग्रस्त होऊन फ्लाईट लेफ्टनंट अभिजित गाडगीळ शहीद झाले होते. या दुर्घटनेला सभोवतालची स्थिती व स्थान निश्चित करण्यात वैमानिक असमर्थ ठरल्याचे दर्शविले गेले. तांत्रिक बिघाडामुळे अपघात झाला असताना हवाई दल सत्य लपवून आपल्या मुलाला दोष देण्याचा प्रयत्न करीत असल्याची तक्रार कविता गाडगीळ यांनी केली होती. या संदर्भात हवाई दलाच्या (उड्डाण सुरक्षा) तत्कालीन महानिरीक्षकांच्या पत्रातील दिशाभूल करणाऱ्या टिप्पणीवर त्यांनी तीव्र नाराजी प्रगट केली होती. मानवाधिकार आयोगाकडे दाद मागितली. संरक्षण दलाकडे पाठपुरावा केला. अखेर तत्कालीन हवाई दल प्रमुखांनी त्यांची पत्राद्वारे माफी मागून आधीचे पत्र मागे घेतले होते.

जुनाट मिगचा वापर का होतो?

चार दशकांपासून सेवेत असणाऱ्या मिग-२१ ला खरे तर यापूर्वीच दलातून निरोप देणे अपेक्षित होते. हवाई दल १९८०च्या दशकातील मिग-२१, मिग-२९, मिराज आणि जॅग्वार या विमानांचा वापर करीत आहे. त्याचे मुख्य कारण विमानांच्या कमतरतेत आहे. ४२ स्क्वॉड्रनचे (तुकड्या) लक्ष्य हवाई दलास अद्याप गाठता आलेले नाही. जवळपास १० स्क्वॉड्रनचा आज तुटवडा आहे. त्यामुळे दलाची ताकद कायम राखण्यासाठी मिगचा वापर करावा लागतो. मिग-२१ च्या तुकड्यांना २०२५पर्यंत निवृत्त करण्याचे नियोजन आहे. पाठोपाठ मिग-२९ आणि अन्य जुनी विमाने पुढील काळात टप्प्याटप्प्याने बाहेर पडतील. देशांतर्गत विमान निर्मितीला विलंब आणि नवी विमाने वेळेवर खरेदीत करण्यात अपयश यामुळे जुन्या विमानांचा वापर करावा लागतो. पुढील काळात जुन्या विमानांची जागा नवीन विमाने घेतीलही. मात्र, तुकड्यांचे उद्दिष्ट गाठता येणे अवघड आहे.

विश्लेषण : २० महिन्यांत ६ वेळा अपघात, MiG-21 लढाऊ विमानांसोबत असं का होतंय, जाणून घ्या सर्वकाही

नवी विमाने कधी येणार?

हवाई दलाच्या आधुनिकीकरणात, विमान खरेदीतील विलंब हा सर्वात मोठा अडसर असल्याचे संसदेत सादर झालेल्या अहवालातून अधोरेखित होते. अलीकडच्या काळात हवाई दलात केवळ तेजस आणि राफेल विमानाचा समावेश झाला. त्यांची संख्याही तुलनेत बरीच कमी आहे. तेजसच्या १० तुकड्या (स्क्वाॅड्रन) स्थापण्याचे नियोजन आहे. एचएएलकडे ८३ विमानांची मागणी नोंदविली गेली आहे. हवाई दलाची गरज लक्षात घेऊन त्यांच्या उत्पादनाला गती दिली जात आहे. तेजसचा प्रकल्प चार दशके रखडला होता. या व्यतिरिक्त ११४ बहुद्देशीय लढाऊ विमाने खरेदी केली जाणार आहेत. रशियाशी साधारणत: ३० सुखोई विमानांचा करार मार्गावर आहे. हे विषय मार्गी लागल्यानंतर नव्या विमानांची प्रतीक्षा संपुष्टात येईल.